कोरोनानंतर उद्भवलेल्या (फायब्रोसिस) फुफ्फुसाच्या संसर्गावर यशस्वी मात

मुंबई : कोरोना संक्रमणावेळी सर्वाधिक नुकसान हे श्वसनतंत्र आणि फुफ्फुसांना पोहोचते.  फुफ्फुसातील उती या डेमेज होतात. ज्याचा परिणाम म्हणून व्यक्ती योग्य प्रकारे श्वास घेऊ शकत नाही. ज्या रुग्णाला जीवनरक्षक प्रणाली (व्हेंटिलेटरवर) ठेवले आहे व ज्या रुग्णाच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे अशा रुग्णामध्ये फाइब्रोसिस (fibrosis) ची समस्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.

मुंबईतील ५७ वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह रुग्णामध्ये फुफ्फुसाचा फायब्रोसिसची गंभीर समस्या आढळून आली. यावेळी चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कोरोनाचे संकट असतानाही केवळ रुग्णाचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने योग्य ते उपचार करून या रूग्णाला नव्याने जीवनदान दिले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या रूग्णाला ऑक्सिजन थेरपी, स्टिरॉइड्स, पिरफेनिडोन, फिजिओथेरपी आदी उपचार देण्यात आले आहे.

वैद्यकीय भाषेत फुफ्फुसावर व्रण अथवा कडक होणे म्हणजे फायब्रोसिस. कोविड संसर्गानंतर फुफ्फुसांना झालेली इजा घेऊन येणारे रूग्ण आढळून आले . अशा विषाणूच्या संसर्गामुळे उपचारानंतरही काही वेळा फुफ्फुसातील जखम बरी झाल्यानंतरही त्याचवरचे व्रण कायम राहतात. त्यावेळी थोडया फार प्रमाणात फुफ्फुसाची कार्यशक्ती मंदावते. मग अशावेळी रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होतो, अशा स्थितीत रूग्णाला तातडीने रूग्णालयात दाखल करणं गरजेचं असतं.

चेंबूरचा रहिवासी श्रावण ओबेरॉय (नाव बदलले आहे) यांना एप्रिल महिन्यात श्वासोच्छवासाचा त्रास झाला. त्यांनी एका स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. परंतु, प्रकृतीत फारसा फरक पडला नाही. तब्येत खूपच खालावल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्या दिशेने उपचारास सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा कोविड चाचणी करण्यात आली आणि ती चाचाणी निगेटिव्ह दर्शविण्यात आली. त्यानंतर हा रुग्ण कोविड निगेटिव्ह असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्यावेळी रुग्णाला फुफ्फुसाचा फायब्रोसिसचे निदान झाले. फुफ्फुसविकार तज्ञ डॉ. अरविंद काटे आणि त्यांच्या टिमने या रुग्णावर पुढील उपचारासाठी सुरुवात केली.

झेन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटलचे फुफ्फुसविकार तज्ञ डॉ. अरविंद काटे सांगतात रुग्ण १२ दिवसांसाठी आयसीयुमध्ये होता आणि त्यानंतर काही काही आठवड्यातच त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येऊ लागली. रुग्णालयातून घरी सोडताना त्यांची ऑक्सिजन पातळी ९३% होती. डॉ काटे सांगतात काही लोकांच्या फुफ्फुसांवर जास्त प्रमाणात व्रण असतील आणि काही भाग निकामी झाला असेल तर त्यांना ऑक्सिजन मशीनचा वापर घरी देखील करावा लागतो.

तसेच, कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर रूग्णांमध्ये श्वसनाचा त्रास होत असल्याचे निदर्शनात येत असून गेल्या महिनाभरात ही समस्या उद्भवलेले ४ रूग्ण आढळून आले असून कोरोना नंतर बरं वाटत असेल तरी योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ.काटे यांनी सांगितले.