children infected with corona

५ वर्षाखालील मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण हे अत्यल्प आहे. मात्र, काही राज्यांमध्ये लहान मुलांमधील संसर्गाचा आकडा हा ३५० च्यावर असून तेथे हा संसर्ग वेगाने पसरत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

मुंबई : लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी ते कोरोनाचे वाहक ठरु शकतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.  याबाबत भारतीय वैद्यकीय परिषदने माहिती दिली असून, लहान मुलांसह किशोरवयीन मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.

देशात लहान मुलांचे कोरोनाबधित होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. देशात १७ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण केवळ ८ टक्के इतके असून राज्यात हेच प्रमाण ६.७८ इतके असून राज्यात आतापर्यंत १,१७,९२९ किशोरवयीन मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. असे असले तरीही या मुलांपासून कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असून ते सुपर स्प्रेडसपेक्षा अधिक संसर्ग पसरवू शकतात असे मत परिषदेने व्यक्त केले आहे.

मागील काही महिन्यांपासून राज्यसह देशभरात कोरोना संसर्ग पसरला असला तरी लहान मुलांमध्ये कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याशिवाय मृत्यूदर ही नगण्य असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. ५ वर्षाखालील मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण हे अत्यल्प आहे. मात्र, काही राज्यांमध्ये लहान मुलांमधील संसर्गाचा आकडा हा ३५० च्यावर असून तेथे हा संसर्ग वेगाने पसरत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे,  कावासाकी आणि कोरोना संसर्गाची लक्षणे ही सारखीच आहेत. कावासाकी आजार हा लहान मुलांसाठी जीवघेणा ठरू शकतो.  मात्र, आपल्याकडे अजून  कोरोना बाधितांमध्ये कावासाकी आजार असलेले आढळलेले नाही. कावासाकी आजार हा ५ वर्षाच्या आतील लहान मुलांना अधिकतर होतो. यामुळे ताप, रक्तातील रक्तबिंबिकेचे प्रमाण वाढणे तसेच हदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या नष्ट होणे अशाप्रकारचा त्रास होतो. यातच कोरोनानाची बाधा झाल्यास ते जीवघेणे ठरू शकते,  त्यामुळे लहान मुलांची काळजी घ्यावी असा सल्ला महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उतुरे यांनी दिला आहे.