ही आहेत भारतातील १२ ज्योर्तिलिंग, जाणून घ्या वैशिष्ट्ये

पौराणिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि शक्ती यांचा विवाह झाला होता आणि हा त्यांच्या मिलनाचा दिवस असतो. तर या शुभदिनी देशातील १२ ज्योर्तिलिंगांविषयी (12 Jyotirlinga) जाणून घेऊया. या ठिकाणी महाशिवरात्रीला भक्तांची जत्राच भरते.

  हिंदू धर्मात वर्ष सुरू झाल्यानंतर सण-उत्सवांनाही सुरुवात होते. अशातच महाशिवरात्री (Mahashivratri) चे विशेष पर्व या वर्षी ११ मार्च (11 March) ला साजारा करण्यात येणार आहे. हा सण सनातन धर्मासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. या दिवशी देवाधिदेव महादेव (Lord Shiva) यांची विशेष पूजा-अर्चना केली जाते. शिवाचे प्रतिक शिवलिंगावर (Shivalinga)वर पंचामृताने अभिषेक केला जातो.

  त्यानंतर त्याचा शृंगारही केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि शक्ती यांचा विवाह झाला होता आणि हा त्यांच्या मिलनाचा दिवस असतो. तर या शुभदिनी देशातील १२ ज्योर्तिलिंगांविषयी (12 Jyotirlinga) जाणून घेऊया. या ठिकाणी महाशिवरात्रीला भक्तांची जत्राच भरते.

  १. सोमनाथ ज्योर्तिलिंग (गुजरात)

  सोमनाथ मंदिर १२ ज्योर्तिलिंगापैकी एक आहे. जे गुजरातच्या काठियावाड परिसरात समुद्रकिनारी वसलेले आहे. अशी मान्यता आहे की, येथे चंद्राने भगवान शंकराला आराध्य मानून त्यांची पूजा केली होती आणि चंद्राला सोमही म्हटले जाते. म्हणूनच या नावावरून या ज्योर्तिलिंगाचे नाव सोमनाथ पडलेलं आहे.

  २. मल्लिकार्जुन ज्योर्तिलिंग

  मल्लिकार्जुन मंदिर आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या तीरावर वसलेलं आहे. असं म्हणतात की, या ज्योर्तिलिंगाच्या दर्शनाने मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि दैहिक, दैविक व भौतिक पापांचा नाश होतो.

  ३. महाकालेश्वर ज्योर्तिलिंग

  १२ ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेलं हे ज्योर्तिलिंग मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये आहे. हे क्षिप्रा नदीच्या काठावर स्थित महाकालेश्वर स्वयंभू दक्षिणमुखी ज्योर्तिलिंग आहे. देशभरात हे तीर्थस्थान बाबा महाकाल या नावानेही प्रसिद्ध आहे.

  ४. ओंकारेश्वर ज्योर्तिलिंग

  ओंकारेश्वर मंदिरही मध्यप्रदेशातच आहे. हे मंदिर नर्मदा नदीच्या किनारी मान्धाता पर्वतावर वसलेले आहे. असं म्हणतात की, याच्या दर्शनाने उत्तम पुरुषार्थ प्राप्ती होते.

  ५. केदारनाथ ज्योर्तिलिंग (उत्तराखंड)

  केदारनाथ धाम उत्तराखंडमध्ये अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या काठावर स्थित आहे. भगवान शिवाचे हे मंदिर प्राकृतिक सौदर्याने नटलेल्या ठिकाणी वसलेलं आहे. सोबतच हे श्री नर आणि नारायण यांचे तपाचे स्थानही आहे. असं म्हणतात की, यांच्या प्रार्थनेमुळेच शंकराने या ठिकाणचे वास्तव्य स्वीकार केले होते.

  ६. विश्वनाथ ज्योर्तिलिंग

  धर्म नगरी काशी (वाराणसी) तही काशी विश्वनाथचे मंदिर गंगा नदीच्या किनारी वसलेले आहे. या मंदिराची अशी आख्यायिका आहे की, हिमालय सोडून भगवान शंकराने या ठिकाणी कायमचे वास्तव्य केले होते. म्हणूनच प्रयलाच्या काळातही या नगरीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.

  ७. भीमाशंकर ज्योर्तिलिंग (महाराष्ट्र)

  भीमाशंकर ज्योर्तिलिंग महाराष्ट्रात पुण्याहून जवळच १०० किलोमीटरवर वसलेलं आहे. या मंदिराची खासियत ही आहे की, या ठिकाणी स्थित शिवलिंगाचा आकार तुलनेने खूपच मोठा आहे. म्हणून हे मंदिर मोटेश्वर महादेवाच्या नावानेही ओळखले जाते.

  ८. त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग (महाराष्ट्र)

  त्र्यंबकेश्वर मंदिर महाराष्ट्रातल्या नाशिकहून ३० किमी अंतरावर पश्चिम भागात वसलेलं आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठी वसलेलं आहे आणि काळ्या कातळात साकारलेलं आहे. असं म्हणतात की, गौतम ऋषी आणि पवित्र नदी गोदावरीच्या प्रार्थनेमुळेच भगवान शंकराने या ठिकाणी वास्तव्य केले होते.

  ९. वैद्यनाथ ज्योर्तिलिंग (झारखंड)

  वैद्यनाथ मंदिर झारखंडच्या देवघर जिल्ह्यात स्थित आहे. हे मंदिर बाबा वैद्यनाथ यांच्या नावानेही ओळखले जाते. एकदा रावणाने तपाच्या जोरावर भगवान शंकराला लंकेत नेण्याचा प्रयत्न केला होता, पण रस्त्यातच अडथळे आल्याने अटीनुसार शंकराची या ठिकाणी स्थापना करण्यात आली अशी आख्यायिका सांगितली जाते.

  १०. नागेश्वर ज्योर्तिलिंग (गुजरात)

  नागेश्वर मंदिर गुजरातमध्ये द्वारकापुरीपासून १७ मैल अंतरावर स्थित आहे. असं म्हणतात की, भगवान शंकराच्या इच्छेनुसारच या ज्योर्तिलिंगाचे नामकरण करण्यात आले आहे.

  ११. रामेश्वरम ज्योर्तिलिंग (तामिळनाडू)

  रामेश्वरम मंदिर तामिळनाडू राज्यात स्थित आहे. रावणाच्या लंकेवर स्वारी करण्याआधी भगवान रामाने या ठिकाणी या शिवलिंगाची स्थापना केली होती, तेव्हापासूनच हे मंदिर विश्वविख्यातही आहे अशी आख्यायिका सांगितली जाते.

  १२. घृष्‍णेश्‍वर ज्योर्तिलिंग (महाराष्ट्र)

  १२ वे ज्योर्तिलिंगांपैकी एक घृष्‍णेश्‍वर मंदिरही आहे. जे महाराष्ट्रातील दौलताबादपासून अवघे १८ किलोमीटर अंतरावर आहे. आख्यायिकेनुसार, आपल्या भक्तांच्या विनंतीनुसार भगवान शंकराने आपल्या अंशरुपी शिवलिंगाची या ठिकाणी कायमस्वरुपी स्थापना केली.