कमजोर रोगप्रतिकारक शक्तीची ‘ही’ आहेत लक्षणे

सध्या कोरोना व्हायरसने (corona virus) सर्वत्र विळखा घातलेला आहे. या व्हायरसच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक (immunity) शक्ती म्हणजेच इम्युनिटी बळकट असणे अतिशय महत्वाचे आहे.  इम्युनिटी कमजोर असणाऱ्यांना कोरोनाचा धोका वाढू शकतो. इम्युनिटी आपल्या शरीरातील टॉक्सिन्सशी लढण्यात मदत करते. चांगली इम्युनिटी, केवळ सर्दी, खोकल्यापासूनच वाचवत नाही, तर हेपेटायटिस, लंग इन्फेक्शन, किडनी इन्फेक्शनसह अनेक रोगांपासून बचाव करण्यास मदत करते. इम्युनिटी कमजोर असण्याची अनेक कारणे असू शकतात. आधीपासूनच असलेला एखादा आजार किंवा धुम्रपान, मद्यपानाची सवय, झोप पूर्ण न होणे , खाण्या-पिण्याची अयोग्य सवयही इम्युनिटी कमजोर करु शकते. जाणून घेउयात कमजोर रोगप्रतिकारक शक्तीची काय लक्षणे आहेत.

सतत संसर्ग होणे –

सतत आजारी पडणे , सतत सर्दी-खोकलाचा त्रास होणे , ताप येणे , घसा खराब होणे किंवा शरीरावर पुरळ-रॅशेस येणे अशा समस्या असल्यास, इम्युनिटी कमजोर असल्याची शक्यता असू शकते.

सतत थकवा जाणवणे –

झोप पूर्ण न होणे , तणाव  (Tension), एनिमिया (Anemia)अशी काही सतत थकवा जाणवणे , सुस्ती असण्याची कारणे असू शकतात. जर याची कारणे माहित नसल्यास किंवा झोप पूर्ण होऊनही थकवा जाणवत असल्यास हे इम्युनिटी कमजोर असल्याचं लक्षण असू शकतं.

जखम लवकर बरी न होणे –

जखम झाल्यास ती लवकर बरी होत नसेल, तर रोगप्रतिकारशक्ती कमी असणे हे यामागील कारण ठरु शकतं.

व्हिटॅमिन डीची कमी –

व्हिटॅमिन डी (Vitamin-D)इम्युनिटी वाढवण्याचं काम करतं. अनेकांमध्ये याची मोठी कमतरता असते. व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास ती भरुन काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. या व्यतिरिक्त, सतत थकवा, सुस्ती, निद्रानाश, नैराश्य आणि डार्क सर्कल्सदेखील कमकुवत प्रतिकारशक्तीची लक्षणे आहेत.

पचन समस्या –

आतड्यांमध्ये असणारे बॅक्टेरिया थेट इम्युन सिस्टमवर परिणाम करतात. जर सतत अतिसार, अल्सर, गॅस होणे , सूज येणे किंवा बद्धकोष्ठता असल्यास, हे इम्युन सिस्टम योग्यरित्या काम करत नसल्याचे संकेत ठरु शकतात.