अशा प्रकारे सजवा घराची खिडकी; द्या आकर्षक लूक

    खिडकीच्या (Window) कट्ट्यावर बसून खाली रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या पाहणे असो किंवा रस्त्यावर लांब उभे राहून बोलणाऱ्या दोन व्यक्तींमधील संवादाचा अंदाज लावणे असो, वेळ कसा मजेत जातो. घराचा अविभाज्य भाग असणारी, घरात चैतन्य निर्माण करणारी, घराला जग दाखवणारी आणि भल्या मोठ्या जगाला आपल्या इवल्याशा चौकटीत बांधणारी ही खिडकी पुरातन काळापासून निरनिराळ्या रूपांत आपल्याला सामोरी आलेली आहे. आपण मात्र फार खोल इतिहासात न शिरता थेट आधुनिक काळातच येऊ या. आधुनिक खिडक्यांचा विचार करता सर्वप्रथम नजरेसमोर येते ती स्लायडिंग खिडकी.

    एकामागोमाग एक तावदाने असलेली ही खिडकी अत्यंत कमी जागा व्यापते आणि त्यामुळेच लोकप्रियदेखील आहे. अ‍ॅल्युमिनिअम किंवा यूपीवीसीमध्ये या खिडक्या बनवल्या जातात. जास्त जागा व्यापणारी असल्याने लाकडाचा पर्याय यात विचारात घेतला जात नाही. साधारणपणे चार किंवा पाच ट्रॅकमध्ये हिची तावदाने बसतात. ज्यातील एकात आपण डास किंवा कीटकरोधक जाळीही बसवू शकतो.

    ॲल्युमिनिअमचा वापर
    मात्र गंजरोधक, टिकाऊ, वजनाला हलका, पण मजबूत आणि तरीही परवडणारा म्हणून अ‍ॅल्युमिनिअमला या खिडक्यांमध्ये मानाचे स्थान आहे. अ‍ॅल्युमिनिअम खिडक्यांचा विचार करता तावदानाची जाडी, वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅल्युमिनिअमची शुद्धता आणि सर्वात शेवटी त्यावरचे कोटिंग किंवा मुलामा यावर त्यांची किंमत ठरते. अर्थात काच, तिची जाडी आणि टिकाऊपणा याही गोष्टी आहेतच. तावदानासाठी वापरल्या जाणाऱ्या पाइपला सेक्शन असे म्हणतात. यात पाऊण इंचापासून ते सव्वा इंच जाडीपर्यंत सेक्शन उपलब्ध होतात. अ‍ॅल्युमिनिअम खिडकी घेताना त्याचे सेक्शन ब्रँडेड आहेत याची खात्री करून घ्यावेत. कारण चांगल्या दर्जाच्या अ‍ॅल्युमिनिअमवर अनोडायझिंगसारखी प्रक्रिया करता येते. अनोडायझिंग ही एक इलेक्ट्रो केमिकल प्रोसेस आहे.

    यामध्ये अ‍ॅल्युमिनिअमच्या सेक्शनवर अनोडायझिंगचा एक पातळ थर चढवला जातो. याच्या उपयोगाने खिडकीचे रंगरूप तर पालटतेच, पण त्याचसोबत तिचा टिकाऊपणाही वाढतो. मुंबईसारख्या ठिकाणी जेथे खारी व दमट हवा आहे तिथे अनोडायझिंगमुळे खिडकीचे आयुष्य वाढते. या खिडक्या फक्त ओल्या फडक्याने जरी पुसून काढल्या तरी पुन्हा नव्यासारख्या दिसू लागतात. अनोडायझिंगमध्ये गोल्डन, कॉपर, सिल्वर असे निरनिराळे रंग देखील उपलब्ध होतात. अनोडायझिंगची महत्त्वाची बाब म्हणजे अनोडायझिंग हे त्या अ‍ॅल्युमिनिअम सेक्शनच्या पृष्ठभागाचाच एक भाग बनत असल्याने त्याचे कधीही पापुद्रे किंवा सालटी निघत नाहीत.

    अनोडायझिंगव्यतिरिक्त अ‍ॅल्युमिनिअम सेक्शनला पावडर कोटिंग देखील केले जाऊ  शकते. बऱ्याचदा अनोडायझिंगपेक्षा स्वस्त असल्याने या पर्यायाचा विचार केला जातो. यात अ‍ॅल्युमिनिअमवर चक्क रंगाचा एक थरच दिला जातो. याचा फायदा म्हणजे, हे कोणत्याही रंगात उपलब्ध होते, त्यामुळे आपल्याला आवडेल त्या रंगात आपण खिडकी बनवून घेऊ  शकतो. परंतु वरून रंगाचा जाड थर दिलेला असल्याने कालांतराने याचे टवके उडतात आणि खिडकी खराब दिसते.

    तावदानी खिडक्या
    अ‍ॅल्युमिनिअम खिडक्यांमध्ये ज्याप्रमाणे स्लायडिंग खिडक्या लोकप्रिय आहेत तशाच केसमेन्ट म्हणजेच आत किंवा बाहेर तावदाने उघडणाऱ्या खिडक्याही छान प्रकारे बनतात. अ‍ॅल्युमिनिअम खिडक्या कितीही परवडणाऱ्या आणि पटकन उपलब्ध होत असल्या तरीही लाकडी तावदानांच्या खिडक्याही आजही लोकप्रिय आहेत. हे थोडे महागडे काम असल्याने त्या मानाने मागणी मोजकीच. विशेषत: बे विंडो प्रकारच्या खिडक्या बनवताना लाकडी तावदानांना मागणी असते. बे विंडो ही थोडी घराच्या बाहेर काढलेली खिडकी असते. यामध्ये बऱ्याचदा तीन किंवा जास्त तावदाने विशिष्ट कोनांमध्ये बसविलेली आढळून येतात. यामध्ये काही फिक्स तर काही उघडझाप करता येण्याजोगी तावदाने बसविली जातात. परंतु लाकडी खिडकी बनवणे जितके महागडे काम तितकीच त्यांची निगा राखणेही जिकिरीचे.

    लाकूड असल्याने त्यावर ऊन-पावसाचा तर परिणाम होतोच, पण त्याचबरोबर त्याला नियमित पॉलिश करणे अथवा रंग देणे गरजेचे असते. थोडक्यात हे फारच श्रीमंती थाटाचे काम.

    यूपीवीसी
    खिडक्यांमध्ये यूपीवीसी हा देखील एक पर्याय आहे. यूपीवीसी म्हणजे अनप्लॅस्टिसाइज्ड पॉली विनायल क्लोराइड. हा प्रकार अत्यंत महागडा असून अजून तरी भारतात म्हणावा तितका प्रचलित नाही. याच्या खिडक्या देखील निरनिराळ्या रंगात मिळू शकतात, तसेच लाकूड व अ‍ॅल्युमिनिअम दोन्हीला हा पर्याय ठरू शकतो.

    खिडक्यांबद्दल बोलताना फ्रेम जितक्या महत्त्वाच्या तितक्याच किंबहुना थोडय़ा अधिक महत्त्वाच्या असतात काचा. खिडकीची काच जितकी नितळ तितके बाहेरील दृश्य सुंदर. खिडकीची काच निवडताना आपल्या घरात किती सूर्यप्रकाश गरजेचा आहे हे लक्षात घेऊनच निवडावी. क्लिअर काच घेतल्यास त्यातून पूर्ण सूर्यप्रकाश अथवा ऊन आत येऊ  शकते. घरात येणाऱ्या उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे थोडे स्वस्तात काम होण्यासाठी काचेवर एखादी गडद रंगाची फिल्म लावून घेणे. या फिल्म काचेवर बाहेरील बाजूने चिकटविल्या जातात.