सरकारने भरमसाठ नोटा छापून लोकांना वाटल्यास काय होईल परिणाम? जाणून घ्या माहिती

व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था पार कोमात जाऊन मृत्युशय्येवर पोहोचली. असं नोटा छापून अर्थव्यवस्था रुळावर येत नाही तर चलन फुगवटा होऊन उरली सुरली अर्थव्यवस्था डबघाईला जाते.

    ‘व्हेनेझुएला’ जगात तेलनिर्मितीमध्ये सर्वात अग्रेसर असा हा देश आज भिकेला लागला आहे. या दिवाळखोरीमागे अनेक कारणे आहेत आणि जास्तीत जास्त चलनी नोटा छापून बाजारात उतरवणं त्यातील एक प्रमुख कारण. जास्तीत जास्त नोटा छापून जनतेत वितरित केल्या आणि त्यांना खर्च करायला सांगितलं तर अर्थव्यवस्था जोमात येईल असा विचार राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी केला पण झालं उलटंच. व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था पार कोमात जाऊन मृत्युशय्येवर पोहोचली. असं नोटा छापून अर्थव्यवस्था रुळावर येत नाही तर चलन फुगवटा होऊन उरली सुरली अर्थव्यवस्था डबघाईला जाते. झिम्बाब्वे, सोमालिया हे देश सुद्धा अशाच प्रकारे चलन फुगवट्यामुळे बरबाद झाले.

     

    हे चित्र सोमालिया मधील आहे. या ट्रॉलीमधील नोटांच्या ५-६ गड्ड्या देऊन हा माणूस जास्तीत जास्त एक पाण्याची बाटली खरेदी करू शकतो. इतक्या प्रमाणात या नोटांचे अवमूल्यन झाले होते.

    झिम्बाब्वे या देशात नोटा छपाईचा जो धडाका सुरु झाला त्यामुळे तिथे २३ कोटी १० लाख टक्क्यांनी चलनाचे अवमूल्यन झाले होते. म्हणजे नोटा छपाईपूर्वी १ झिम्बाब्वे डॉलरला मिळणारे चॉकलेट बेधुंद नोटा छपाईमुळे २३ कोटी १० लाख झिम्बाब्वे डॉलरला मिळू लागले. ही महागाई नव्हती तर चलन फुगवटा होता. चलन फुगवट्यामुळे झिम्बाब्वे सरकारला १०० ट्रिलियन (१००,०००,०००,०००,०००) डॉलरची नोट छापावी लागली.