‘मँगो राईस’ खाल्ल्यानंतर म्हणाल ये दिल मांगे मोअर, जाणून घ्या रेसिपी

मँगो राईस खाताना स्वादिष्ट तर लागतोच, सोबतच अतिशय कमी वेळात तो तयारही होतो. याच्या आंबट-गोड स्वादामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच ही डिश खूपच पसंतीस उतरते. जाणून घेऊया याची रेसिपी...

  सर्वसाधारणपणे लग्न, पार्टी किंवा एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमप्रसंगी पाहुण्यांना लंच किंवा डिनरमध्ये सर्व्ह करण्यासाठी अधिकाधिक लोकं फ्राईड राईस, पुलाव किंवा जिरा राईसलाच अधिकाधिक पसंती देतात. पण, प्रत्येक वेळी आपण विविध प्रकारचे राईस बोर झाला असाल, तर पुढल्यावेळी घरी आलेल्या पाहुण्यांना सर्व्ह करा मँगो राईस.

  मँगो राईस खाताना स्वादिष्ट तर लागतोच, सोबतच अतिशय कमी वेळात तो तयारही होतो. याच्या आंबट-गोड स्वादामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच ही डिश खूपच पसंतीस उतरते. जाणून घेऊया याची रेसिपी…

  साहित्य

  • १ कप उकडलेले तांदूळ
  • १ कप कच्चा आंबा
  • काही मोहरीचे दाणे
  • २ चमचे उडीद दाळ
  • २ चमचे चणा दाळ
  • २ चमचे शेंगदाणे
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • ४-५ कढीपत्त्याची पाने
  • तेल आवश्यकतेनुसार
  • मीठ चवीनुसार

  कृती

  ‘मँगो राईस’ तयार करण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ उकडून घ्या. तांदूळ उकडल्यानंतर जास्त झालेले पाणी काढून टाका. असे केल्याने तांदूळ सुट्टे होतील.
  लक्षात ठेवा, तांदूळ पूर्ण शिजवायची गरज नाही. यानंतर कच्चे आंबे सोलून ते कुस्करून घ्या. मँगो राईस तयार करण्यासाठी आपण एका पॅनमध्ये मोहरीचे तेलही वापरू शकता.

  हे तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरीचे दाणे, उडीद दाळ, चणा डाळ, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकून तडका द्या. जर तुम्हाला हिंग आवडत असल्यास, तडक्यात हिंग पावडरचाही वापर करू शकता. आता या तडक्यात कुस्करलेला कच्चा आंबा घाला आणि हे मिश्रण चांगले एकजीव करा. आता या मिश्रणात शिजवलेले तांदूळ घाला आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या.

  अशाप्रकारे मँगो राईस सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. आता गरमा-गरम मँगो राईस घरी आलेल्या पाहुण्यांना सर्व्ह करा.