दात पिवळे पडत चाललेत? घरगुती उपाय करून पहा, मोत्यासारखे चमकतील दात

दातांमधील पिवळेपणा वाढतच चाललायं मग घरगुती उपाय करूनच बघा. काही दिवसांतच दात मोत्यासारखे चमकू लागतील.

  दातांचा पिवळेपणा कोणालाही आवडत नाही. आपण चेहऱ्याने कितीही सुंदर असलो तरी हसताना दात पिवळे दिसू लागले की, आपल्याला स्वतःचीच लाज वाटू लागते. आपला चेहरा कितीही सुंदर असला तरी त्यात सौंदर्याची भर पडते पांढऱ्या शुभ्र दातांनी! आपल्या दातांकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. शरीराप्रमाणेच दातांची निगाही राखायला हवी.

  अनेकदा दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपण डेंटिस्टकडे जातो जिथे आपल्या कडून बरेच पैसे आकारण्यात येतात तसेच काहीजण बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक पेस्ट, केमिकल्सचा आधार घेतात, जे दातांसाठी हानिकारक ठरते. मात्र आता काहीही न करता अगदी घरच्या घरी तुम्ही तुमच्या दातांमधील पिवळा थर दूर करू शकता. यासाठी जाणून घेऊयात काही सोप्या टिप्स.

  नारळ तेल

  पिवळे दात शुभ्र करण्यासाठी तुम्ही नारळ तेलाचा वापर करू शकता. यासाठी नारळ तेल घेऊन पाच मिनिटे ते दातांवर लावून ठेवा. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या टूथब्रशमध्ये काही थेंब नारळाचे तेल टाकून त्याने ब्रश करू शकता. यानंतर तोंड स्वच्छ धुवा. तुम्ही जर दररोज केले तर तुमच्या दातांवरील पिवळेपणा काही दिवसांतच दूर होईल.

  लिंबाची साल

  लिंबामध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात आणि लिंबाच्या सालामुळे आपले दात स्वच्छ होऊ शकतात. यासाठी तुमच्या दातांवर लिंबाची साल काही वेळ चोळा आणि नंतर तोंड स्वच्छ धुवाधुवून टाका. त्याचबबरोबर तुम्ही लिंबाच्या सालीची पावडर तयार करू शकता. ही पावडर तुम्ही दातांवर लावून काही वेळ ठेवू शकता. यामुळेही दातांचा पिवळेपणा दूर होईल.

  स्ट्रॉबेरी

  स्ट्रॉबेरी हे फळ अनेकांच्या आवडीचे आहे. हे फळ विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत बाजारात येते. स्ट्रॉबेरी दातांवरील पिवळेपणा काढण्यासाठी फायदेशीर मानले जाते. स्ट्रॉबेरीमध्ये बरेच फायदेशीर अँटिऑक्सिडेंट्स आढळले जातात.त्यामुळेच दातांवर स्ट्रॉबेरी घासल्याने दात नैसर्गिकरित्या पांढरे होतात आणि याने दातांमधील पिवळसरपणा दूर होण्यास मदत होते.

  बेकिंग सोडा

  बऱ्याचदा दातांच्या शुभ्रतेसाठी बेकिंग सोड्याची मदत होत असते. यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण तयार करुन, त्याची व्यवस्थित पेस्ट बनवा. ही पेस्ट टूथब्रशवर घेऊन, त्याने नेहमीप्रमाणे दात घासा. असे केल्याने अवघ्या काही मिनिटांतच आपले दात मोत्यासारखे चमकदार होतील.

  केळीची साल

  केळीच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीझ भरपूर प्रमाणात असते. हे घटक ब्लिचिंग एजंट असल्यामुळे आपल्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची साल उपयोगी पडते. म्हणूनच दातांचा पिवळेपणा असल्यास तुम्ही केळी खाल्ल्यानंतर त्याची साल न फेकता, ती साल तुमच्या दातांवर घासू शकता. आठवड्यातून किमान २ वेळा हा उपाय केल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा दूर होईल.