आवळा म्हणजे अनेक आजार एक उपाय; जाणून घ्या अत्यंत गुणकारी फळाविषयी

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते आवळा हा एकच आयुर्वेदिक पूरक आहार नियमित घेतल्यास इतर पूरक आहारांची गरज उरत नाही.

    शरिरात योग्य ऊर्जा आणि पोषणतत्तवे असतील तरच शरीर योग्यरित्या काम करते. तसेच जीवनातही धैयप्राप्तीसाठी सुदृढ शरीर असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी संतुलित आहार गरजेचाच आहे. व्यायाम आणि योग्य संतुलित आहाराशिवाय आपल्या शरीराला इतरही पोषक तत्त्वांची गरज असते. दैनंदिन भोजनातून मिळत नसल्याने पूरक आहाराद्वारे ही गरज भागवावी लागते. मग असा योग्य पूरक आहार कोणता? त्याविषयी खूप माहिती व पूरक आहारही बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्यासाठी योग्य पूरक आहार कोणता, याबाबत आपला गोंधळ उडण्याची शक्यता असते. मात्र, आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते आवळा हा एकच आयुर्वेदिक पूरक आहार नियमित घेतल्यास इतर पूरक आहारांची गरज उरत नाही.

    तज्ज्ञांच्या मतानुसार आवळा हे एकमेव बहुपयोगी औषधी फळ आहे. आवळय़ाने ताजेतवाने तर वाटतेच पण नियमित आवळासेवनामुळे वृद्ध होण्याची प्रक्रिया मंदावते. आवळा हा पूरक आहार तर आहेच त्यासह त्यात उत्तम औषधी तत्त्वे आहेत. वात, पित्त, कफ अशा सगळय़ा प्रकृतींच्या व्यक्तींसाठी आवळा गुणकारी ठरतो. या तिन्ही दोषांचं संतुलन आवळा राखतो. आवळय़ात ‘क’ जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असते. आपली त्वचा, केस, डोळे, हृदय, स्वादुपिंड, यकृत, मूत्रिपिंड आणि पोटाच्या आरोग्यासाठी आवळा उपयोगी ठरतो.

    विविध प्रकृतीच्या व्यक्तींनी आवळासेवन कसे करावे, याविषयी आयुर्वेदिकतज्ज्ञ मार्गदर्शन करतात. त्यांच्या मतानुसार वात असंतुलन असल्यास भोजनाआधी तिळाच्या तेलासह पाच ग्रॅम आवळा पावडर घ्यावी. पित्त असंतुलनावर मात करण्यासाठी तुपासह पाच ग्रॅम आवळा पावडर जेवणानंतर खावी. कफ असंतुलन बरे करण्यासाठी जेवणानंतर मधासह पाच ग्रॅम आवळा पावडर घ्यावी. तज्ज्ञांच्या मतानुसार आवळा जरी आंबट-तुरट चवीचा असतो. मात्र पचनानंतर तो मधुर गुणधर्माचा होत असल्याने त्याने पित्त न वाढता पित्तशमन होण्यास मदतच होते. आवळा हा थंड असतो. तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी त्याचे औषधी उपयोग आहेत.