सावधान! ‘डिसरप्टिव्ह मेटाबोलिझम’ मुळे वाढत आहे मधुमेहाचा धोका

मधुमेह अर्थात डायबेटिस हा एक आजार नव्हे तर एक स्थिती आहे. खरेतर डिसरप्टिव्ह मेटाबोलिझम म्हणजे चयापचय क्रियेमध्ये अडथळा निर्माण होणे हा या स्थितीसाठी कारणीभूत ठरणारा आजार आहे. अन्नाला ऊर्जेमध्ये परिवर्तीत करण्यासाठी आपल्या शरीरातील पेशींद्वारे पार पाडल्या जाणा-या बहुविध जैवरासायनिक प्रक्रियांना चयापचय किंवा मेटाबोलिझम असे म्हणतात.

    जैवरासायनिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी भरपूर ऊर्जेची गरज भासते आणि एखाद्या व्यक्तीला मिळणा-या ऊर्जेचे प्रमाण हे व्यक्तिगणिक वेगवेगळे असते व त्यासाठी वय, शरीराचे वजन आणि शरीराची रचना असे विविध घटक कारणीभूत ठरत असतात. तसेच चयापचय क्रिया निरंतर सुरू राहत असल्याने ती अत्यंत गुंतागुंतीची असते. थोडक्यात कोणत्याही व्यक्तीची चयापचय क्षमता ही कायम सारखीच राहत नाही आणि ती व्यक्तिगणिक बदलते.

    या जटिल प्रक्रियांदरम्यान अन्न आणि पेयांमधील उष्मांक अर्थात कॅलरीजचा ऑक्सिजनशी संयोग होतो व त्यातून तुमच्या शरीराचे कार्य सुरू राहण्यासाठी आवश्यक ऊर्जा उत्सर्जित होते. मात्र इथे हे ही नमूद करायला हवे ही प्रत्येक व्यक्तीची चयापचय क्षमता वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी असते. ती कधीही समान नसते. चयापचय क्रियेचे हे सतत बदलते, गतीमान स्वरूप लक्षात घेता त्यातील अडथळ्याचे अचूक मापन करणे हे खरोखरीच आव्हानात्मक ठरते. खरे सांगायचे तर सतत बदलणा-या या चयापचय क्रियेचे मापन करणे ही एक अशक्य बाब आहे.

    या स्थितीचा कशाप्रकारे सामना करता येईल हे पाहण्याआधी डिसरप्टिव्ह मेटाबोलिझम आपल्या शरीरावर कशाप्रकारे परिणाम करते आणि त्याची वाटचाल मधुमेह व इतर गंभीर आजारांच्या दिशेने कशी होत जाते हे आपण समजून घेऊया.

    चयापचय क्षमतेची हानी झाल्यास अशा व्यक्तीच्या शरीरातील बिटा पेशींचीही रचना बिघडते व त्यांच्या कार्यक्षमतेचीही हानी होते. असे झाल्याने शरीरातील इन्स्लुनिचे स्त्रवण आणि इन्सुलिन प्रतिरोध वाढतो. या स्थितीला ग्लुकोटॉक्सिसिटी असे म्हणतात. त्याचप्रमाणे शरीरातील फ्री फॅटी अॅसिडचे प्रमाण सातत्याने उच्च असल्यास पेशींची कार्यक्षमता नष्ट होते आणि या स्थितीला लायपोटॉक्सिसिटी असे म्हटले जाते. तुमच्या रक्तातील ग्लुकोटॉक्सिसिटी आणि लायपोटॉक्सिसिटीमुळे तुमच्या संपूर्ण पेशीयसंरचनेची हानी होऊ शकते आणि त्यामुळे यकृत व स्वादुपिंड खराब होऊ शकते.

    हीच बाब ध्यानात ठेवून या आजाराचे सरसकट दिसून येणारे लक्षण, म्हणजे रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण नियंत्रणात आणण्याशिवाय दुसरा पर्याय मधुमेहतज्ज्ञांसमोर नसतो. गोळ्या किंवा इंजेक्शन्सच्या सहाय्याने हे साध्य केले जाते, जेणेकरून चयापचय क्रिया सुरळीतपणे सुरू रहावी. उच्च रक्तदाब हे याचे सगळ्यात तीव्र लक्षण आहे, कारण त्यामुळे रक्त घट्ट बनते आणि रक्ताभिसरणाची क्रिया मंदावते. असे झाल्याने इंद्रियांच्या कार्यामध्ये अडथळा येतो व ती कमकुवत बनतात. परिणामी संपूर्ण शरीरामध्ये दाहकारक स्थिती निर्माण होते व यातून मूत्रपिंडे आणि यकृताला हानी पाहोचते. इतकेच नव्हे तर मधुमेहामधून बहुतेकदा उच्च रक्तदाब आणि कॉलेस्ट्रोलची समस्याही उद्भवते व त्यातून हार्ट अटॅक, मूत्रपिंडे निकामी होणे, स्ट्रोक आणि यकृत निकामी होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

    मधुमेह हे विविध इंद्रियांच्या कार्यामध्ये गुंतागुंती निर्माण होण्यामागेही एक प्रमुख कारण आहे. या गुंतागुंतींची मायक्रोव्हॅस्क्युलर आणि मॅक्रोव्हॅस्क्युलर अशा दोन गटांत विभागणी केली जाते. या गुंतागुंतींमुळे मधुमेहींमध्ये अकाली आजारपण जडण्याचा आणि मृत्यूचा धोका वाढतो. यातून जीवनमान कमी होते आणि उपचारांचा खर्चही वाढत असल्याने आर्थिक भारही प्रचंड प्रमाणात वाढतो. जागतिक आरोग्य संघटना – डब्‍ल्‍यूएचओच्या ताज्या अहवालानुसार मधुमेह हे अनारोग्य आणि थेट मृत्यूंचे ९व्या क्रमांकाचे प्रमुख कारण ठरले आहे.

    अशाप्रकारे या स्थितीचे सर्व परिणाम जाणून घेतल्यानंतर डायबेटिस, प्री-डायबेटिस म्हणजे मधुमेहपूर्व स्थिती किंवा जेस्टेशनल डायबेटिस म्हणजे गर्भावस्थेत जडणा-या मधुमेहाचे निदान करण्यासाठी नियमितपणे रक्ततपासणी करणे आवश्यक आहे. काही व्यक्तींना सुरुवातीच्या टप्प्यावर या स्थितीची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, मात्र त्यांनाही या स्थितीचा तितकाच धोका असतो. तुम्ही वयाची पस्तिशी पार केली असेल, तुमचे वजन गरजेपेक्षा जास्त असेल किंवा तुम्ही स्थूल असाल किंवा तुम्ही गर्भावस्थेतील मधुमेहाने ग्रस्त महिला असाल तर तुम्हाला टाइप २ डायबेटिसचा धोका जास्त प्रमाणात संभवतो. मात्र टाइप २ डायबेटिसला प्रतिबंध करणे शक्य आहे. प्री-डायबेटिसचे निदान झालेल्या प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलांची टाइप २ मधुमेहासाठीची चाचणी दरवर्षी करून घेणे आवश्यक आहे.

    ताज्या पाहणीनुसार २०१९ साली भारतामध्ये अंदाजे ७.७ कोटी व्यक्ती मधुमेहग्रस्त असल्याचे दिसून आले आहे व २०४५ पर्यंत हा आकडा १३.४ कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. डायबेटिसच्या या सर्व रुग्णांपैकी ९० टक्‍के रुग्ण हे टाइप २ डायबेटिसचे असून ही स्थिती अपंगत्व आणि मृत्यूसाठीचे सर्वात मोठे कारण बनले आहे. अगदी तरुण वयातील व्यक्तींवरही याचा परिणाम होत आहे.

    आहारनियमनाच्या माध्यमातून शर्करेचा स्त्रोतच नष्ट करून साखरेची पातळी सर्वसामान्य पातळीवर आणल्यास मधुमेहाचे प्रमाण कमी होऊ शकेत ही बाब गेल्या दशकामध्ये डिजिटल आरोग्याच्या सकारात्मक दिशेने होत असलेल्या वाटचालीतून सिद्ध झालीच होती. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे अधिक नेमकेपणाने उपचार करणे शक्य झाले आहे व चयापचय क्रियेतील अडथळ्यांचे मापन करून मधुमेहाचे प्रमाण आटोक्यात आणल्यास आणि अचूक उपचार केल्यास मानवी शरीरामध्ये सर्वांगिण परिवर्तन घडून येऊ शकते हे यातून सिद्ध झाले आहे.

    अमेरिकन डायबेटिस असोसिएशन आणि युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ डायबेटिसच्या संयुक्त अहवालामध्ये टाइप २ डायबेटिसचे अचूक निदान आणि उपचार यांच्या शक्यतेवर तज्ज्ञांची मते सादर करण्यात आली. याखेरीज या अहवालात चिकित्सात्मक घटकांच्या माध्यमातून उपचारांना मिळणारा प्रतिसाद व टाइप टू मधुमेहाची वाटचाल यांचा आवाकाही सूचित करण्यात आला आहे.