अभिजात भाषा म्हणजे काय? एखाद्या भाषेला हा दर्जा कसा मिळतो? आतापर्यंत कोणकोणत्या भाषांना मिळालाय दर्जा ?

    आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा होत आहे. परंतु, याच दिवसाला अनेक जण ‘मराठी राजभाषा दिन’ असेही म्हणतात.  ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. अभिजात भाषा म्हणजे काय? एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळतो? आतापर्यंत कोणकोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे? याबाबतीत आढावा घेणारा हा लेख.

    ‘मराठी भाषा गौरव दिन’ का साजरा केला जातो?

    महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून नमूद करण्यात आला आहे. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी कविता, मराठी बोलीला साहित्यात विशेष असे स्थान निर्माण करून देण्यात कुसुमाग्रजांचं मोलाचं योगदान आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. हा दिवस महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये अत्यंत उत्सहात साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. विष्णू वामन शिरवाडकर यांच्या मोठ्या बहिणीचे नाव कुसुम होते. त्या नावावरूनच त्यांनी आपले कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरले. कुसुमाग्र यांनी आपल्या आत्मनिष्ठ प्रतिभेने आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखणीने जागतिक दर्जाचे लेखन केले.

    ‘अभिजात भाषा’ म्हणजे काय?

    प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता म्हणजेच ‘अभिजात’ भाषा.

    एखादी भाषा ‘अभिजात’ कशी ठरते?

    कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. हा दर्जासाठीचे 4 निकष आहेत. मराठी भाषा ते सर्व निकष पुर्ण करते हे रंगनाथ पठारे समितीच्या 436 पृष्ठांच्या अहवालात सिद्ध केलेले आहे.

    भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.

    प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.

    दुसर्‍या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.

    अभिजात’ भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.

    भारतातील कोणकोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे?

    भारतात आतपर्यांत 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे.

    तामिळ (2004)

    संस्कृत (2005)

    कन्नड (2008)

    तेलुगु (2008)

    मल्याळम (2013)

    ओडिया (2014)

     

    मराठी भाषा ‘अभिजात’ आहे की नाही?

    मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी 2012 साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. 2013 साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला. महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षं जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या 128 पानी अहवालाच्या समारोपात समितीने काय म्हटलं आहे? अकरा कोटी लोकांची मराठी जगातली 10 व्या ते 15 व्या क्रमांकाची भाषा आहे. देशातली ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचं अभिजातपण स्वयंसिद्ध आहे.

    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास काय फायदा होणार?

    मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे.

    मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे.

    भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.

    प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.

    महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणे.

    ‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘मराठी राजभाषा दिन’ मधला फरक

    ‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘मराठी राजभाषा दिन’ हे दोन्ही वेगवेगळे आहेत. 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत असलेला ‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि 1 मे  रोजी साजरा होणारा ‘मराठी राजभाषा दिन’ आहे. त्याचप्रमाणे 21 फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा करण्यात येतो.