
दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. याच दिवशी १९२८ साली प्रतिभावान शास्त्रज्ञ सी व्ही रामन यांनी गाजलेल्या ‘रामन इफेक्ट’ चा शोध लावला. त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान दिनाच्या निमित्ताने. जाणून घेऊया सी व्ही रामन यांच्याबद्दल…
विज्ञान दिन आणि सी व्ही रामन
रामन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचे वडील स्थानिक शाळेत शिक्षक होते आणि त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न नव्हता. अर्थात म्हणजे घरची श्रीमंती होती असेही नाही. मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीय रामन पदवीधर झाले; तेही इंग्रजी आणि पदार्थविज्ञान या विषयांत सुवर्णपदक पटकावीत. साहजिकच उच्च शिक्षणासाठी रामन यांनी परदेशात म्हणजेच इंग्लंडला जावे असे अनेकांनी सुचविले. मात्र आरोग्याच्या कारणामुळे भारतातच राहून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्याचवेळी त्यांनी एक शोधनिबंध लिहिला आणि तो लंडनच्या ‘फिलॉसॉफिकल मॅगझीन’मध्ये प्रसिद्ध झाला.
जातीयवादाला झुगारून केला आंतरजातीय विवाह
त्यावेळी रामन यांचे वय अवघे सोळा वर्षांचे होते. त्याच सुमारास रामन यांनी लोकसुंदरी यांच्याशी विवाह केला. तेंव्हा रामन हे सरकारी सेवेत होते. अर्थात लोकसुंदरी आणि रामन हे निरनिराळया जातींचे होते आणि जातीबाहेर विवाह हे तेंव्हा फार दुर्मीळ होते. मात्र रामन ठाम होते आणि अखेर हा विवाह संपन्न झाला. लोकसुंदरी यांनी अखेरपर्यंत रामन यांना साथ दिली.
चिकाटी, मेहनत, प्रतिभेचे धनी सि व्ही रामन
विज्ञान दिनाच्या दिवशी सी व्ही रामन यांचे स्मरण होणे अपरिहार्य आहे. याचे कारण नोबेल पुरस्कार मिळण्याच्या तोडीचे संशोधन त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर दोन दशकांपूर्वी केले होते. तेंव्हा संशोधनासाठी केवळ प्रयोगशाळा, निधी हे लागते असे नाही. त्यासाठी संशोधन करण्याची चिकाटी, मेहनत, प्रतिभा यांची आवश्यकता अधिक असते. रामन यांच्यापाशी ती होती आणि त्यामुळेच ते इतका क्रांतिकारक शोध लावू शकले. सी व्ही रामन यांचे जीवन बहुपेडी होते आणि त्यांच्या काही आगळ्या पैलूंचा वेध यानिमित्ताने घेणे औचित्याचे ठरेल.
प्रयोगशाळेत रमणारे रामन
पुढे रामन कोलकत्याला गेले आणि तेथे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कारण ‘इंडियन अससोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेशी त्यांचा संबंध आला. डॉ महेंद्र सरकार यांनी ही संस्था भारतीयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा या हेतूने स्थापन केली होती. या संस्थेचा त्यांनी कायापालट करून टाकला. त्यांची काही काळ रंगून आणि नागपूरला बदली झाली पण तो काळ सोडला तर कलकत्त्यातील वास्तव्यात रामन यांनी या संस्थेच्या प्रयोगशाळांत निरंतर प्रयोग केले; शोधनिबंध लिहिले. हाताशी असणारा फावला वेळ हा रामन या प्रयोगशाळांत व्यतीत करीत असत. अनेक तरुण विद्यार्थी या संस्थेकडे आकृष्ट झाले. रामन यांची ही तळमळ पाहून त्यांची नियुक्ती कलकत्त्यातील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्सच्या भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापकपदी करण्यात आली. आणि रामन यांनी सरकारी नोकरीला रामराम ठोकला. असे धाडस क्वचितच कोणी दाखविले असते.
असा घडला ‘रामन आविष्कार’
१९२१ साली रामन यांनी ऑक्सफर्डला रवाना झाले. त्यावेळी समुद्राच्या पाण्याच्या निळ्या रंगाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. लॉर्ड रॅले यांनी असा सिद्धांत मांडला होता की समुद्राच्या पाण्याचा रंग निळा असतो कारण त्यात आकाशाचे प्रतिबिंब पडलेले असते. पण रामन यांचे कुतूहल जागे झाले. भारतात परतताना त्यांनी आपल्याबरोबर समुद्राच्या पाण्याचा नमुना आणला आणि निकोलाय प्रिझममधून त्या पाण्याचे अवलोकन केले. प्रतिबिंबित किरण पाहणाऱ्याच्या नजरेस पडत नाहीत अशी व्यवस्था असणारा हा लोलक. जेंव्हा पाण्याच्या नमुन्याचे अवलोकन रामन यांनी केले तेंव्हा त्यांना उलट पाण्याच्या रंग अधिकच गडद निळा दिसला. याचाच अर्थ रॅले यांच्या सिद्धांताला हे छेद होता. प्रकाश परिवर्तनाचे अनेक प्रयोग यातूनच रामन यांनी केले आणि त्यातूनच ज्याला ‘रामन आविष्कार’ असे नाव पडले तो शोध रामन यांनी लावला. हा शोध इतका अनन्यसाधारण महत्वाचा होता की रामन यांना १९३० साचा नोबेल पुरस्कार मिळाला.
रामन संशोधन संस्थेचा उगम
दरम्यान कोलकात्त्याहून रामन १९३३ साली बंगळुरुला आले आणि टाटांच्या कल्पनेतून साकारलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये संचालकपदी रुजू झाले. उल्लेखनीय भाग हा की स्थापनेपासून पहिल्यांदाच रामन यांच्या रूपाने एका भारतीयाची नियुक्ती संचालकपदी झाली होती. त्याच सुमारास हिटलरच्या राजवटीच्या जाचाला कंटाळून अनेक शास्त्रज्ञ जर्मनीतून पलायन करीत होते. रामन यांना भारतासाठी ही मोठी संधी वाटली आणि मॅक्स बॉर्न, श्रोडिंजर अशा महान शास्त्रज्ञांनी भारतात येऊन संशोधन करावे म्हणून रामन यांनी त्यांना निमंत्रण दिले. त्यात मॅक्स बॉर्न भारतात आले. अन्य अनेक शास्त्रज्ञांना आमंत्रण देण्याचा रामन यांचा मानस होता. पण रामन यांच्या या पावलांनी अस्वस्थ झालेल्यांनी रामन यांच्याविरोधात बंड पुकारले. या वादात अखेर रामन यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आपण स्वतःच विज्ञान संशोधनाला वाहिलेली संस्था स्थापन करावी असे रामन यांनी निश्चित केले. म्हैसूरच्या राजाने रामन यांना अकरा एकर जमीन त्यासाठी दिली आणि तेथे रामन संशोधन संस्था उभी राहिली. १९४९ साली या संस्थेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. ही संस्था रामन यांनी नावारूपाला आणली. रामन यांचे संशोधन हे चौफेर होते. रामन यांनी अनेक वाद्यांतून निघणाऱ्या आवाजाला कारणीभूत कंपनांचा अभ्यास केला आणि वीणा आणि तानपुरा ही वाद्ये सर्वाधिक निखळ सूर देणारी वाद्ये आहेत हे सिद्ध केले. अर्थात केवळ शास्त्रीय अभ्यासापुरता रामन यांचा वाद्यांकडे ओढा नव्हता. ते स्वतः व्हायोलिन वाजवायला शिकले होते आणि रामन यांची पत्नी उत्तम वीणावादन करीत असे.
द्रष्टे शास्त्रज्ञ
भारताला विज्ञानातील प्रगतीशिवाय तरणोपाय नाही आणि त्यासाठी भारतीय प्रतिभेला वाव देणाऱ्या सांथाची निकड आहे हे ओळखणारे रामन होते आणि भारतीयांनी केवळ पाश्चात्यांचे अनुकरण न करता आपल्या प्रतिभेने संशोधन करावे अशी त्यांची तळमळ होती. त्या अर्थाने रामन हे प्रतिभावान आणि तितकेच द्रष्टे शास्त्रज्ञ होते !