घरात कपड्यांचा पसारा आहे? मग असे करा मॅनेजमेण्ट

आपल्याकडे आता भरपूर पैसे असताना, असे जुने पाने शिवून, वस्तू दुरुस्त करून वापरणे, हे या पिढीला आवडत नाही. तेचतेच कपडे पुन्हा पुन्हा घालणे देखील त्यांच्या फॅशनमध्ये बसत नाही. नवीन वस्तूंची आवड कुणाला नसते? सगळ्यांना असते.

    या देशात सध्या कपडे फीव्हरची साथ आली आहे. पूर्वी, ‘एक नूरानी दस नूर कपडा’ म्हणत. पण, हल्ली मात्र एक नूर आदमी, सौ नूर कपडा झाले आहे. मुळात बायका खूप कपडे खरेदी करत असतात आणि तरीही त्या भरलेल्या कपाटातून, बाहेर जाताना काय परिधान करावे हा मोठा प्रश्न आहे, अस म्हणतात. कॅनडा एक मोठा देश आहे, मात्र त्यातील लोकसंख्या खूप कमी आहे.

    त्यांच्याकडे कुटुंब लहान झाली आहेत. मात्र, तरीही त्यांना एक वेगळीच समस्या भेडसावत आहे. त्यांच्याकडे इतके अति सामान, कपडेपट आहेत की, त्या सामानासाठी बाहेर जागा भाडय़ाने घेण्याची वेळ यावी.

    गोडाऊनमध्ये हे सामान ठेवावे अशी परिस्थिती आहे. मला तुमच्या घरी काय परिस्थिती आहे ते माहिती नाही? मी ही गोष्ट कॅनडातली सांगते आहे. ही गोष्ट मात्र थोडय़ा-फार फरकांनी आपल्याकडेसुद्धा काही अंशी हीच स्थिती आहे. दर रविवारी सुट्टी मिळाली की, लोक मॉलमध्ये जातात. खातात आणि खरेदी खूप करत सुटतात. ते कमी म्हणून ऑनलाईन खरेदीचे भूत त्यांच्यात शिरते. अशा रितीने कपडेच कपडे घरात साठतात.

    अनेकदा कुणी पाहुणे आले की खरेदी, फिरायला जायचे असेल तर खरेदी, खरेदीला निमित्त शोधले जाते. सोने खरेदी महाग असते, घर घेणं परवडतच नाही, सहलीला सुद्धा ब-यापैकी पैसा लागतो, त्यामुळे बरीचशी कपडे खरेदी केली की, बरेच सुख मिळते. काही अतिश्रीमंत घरी एकदा घातलेला ड्रेस परत घालत नाहीत.

    मात्र सामान्यपणे श्रीमंत लोक, एक ड्रेस फक्त नऊ वेळा घालतात. मग तो पडून राहतो. पडदा आवडला नाही, तो एक्स्चेंजमध्ये द्या. काढून फेकून द्या. कपडे आवडत नाहीत, बदलून टाका. त्याने काय होईल? घरातला पसारा कमी होईल. मात्र त्या कारणाने जी खरेदी करायची हौस आहे, ती थांबणार नाही. कपाटात रिकामी जागा झाली की, ती जागा भरण्यासाठी, परत खरेदी केली जाते.

    ही वस्तू उपयोगी आहे का? नसल्यास ती धर्मादाय संस्थेला दान द्यावी. बार्टर सिस्टीममध्ये एखाद्या मैत्रिणीकडून अथवा नातेवाइकाकडून बदलून अथवा एक्स्चेंजमध्ये द्यावी. उपयोगी होण्याची संधी त्या वस्तूला द्यावी, चालते की, असं म्हणून काम भागवावे.

    याचे कारण फेकलेल्या सामानाचा पसारा पृथ्वीला सोसेना झाला आहे. कार्बन फूट प्रिंटमध्ये हा पसारा जागा अडवून बसतो आहे. अनावश्यक कपडे, वस्तू ई वेस्ट सगळ्या गोष्टींनी जागा अडते आहे. बऱ्याच वस्तू आपण फक्त लोकांना दाखवण्यासाठी खरेदी करतो. हॉलमध्ये झोपायला दिवाण उपयोगी पडतो, पण आपणास पॉश आहोत असं जगाला दाखवायला सोफा सेट हवा असतो. शो पिसेस खरेदी करून जागा अडवली जाते. खुर्च्या, टेबल जागा अडवते.

    खुर्च्या जर एकावर एक ठेवून रचल्या, तर जागा कमी लागते, मात्र आपण खूप मोठ्या सोफ्याच्या खुर्च्या बनवतो. इतरांची कॉपी करून खरेदी करणे, साठवणे अशी सवय असणे या हल्लीच्या काळात कौतुकास्पद नाही. ते तुमची मंदबुद्धी दाखवते. यापुढे अधिक दुरुस्ती करणे शक्य नाही, असे होईपर्यंत वस्तू आपल्या पूर्वजांनी वापरल्या. आपल्या पिढीने थोडी उधळमाधळ सुरू केली. यापुढची पिढी तर सगळाच माल फेकावा, ओएलएक्समध्ये विकावा, अशी मनोवृत्ती ठेवते.

    आपल्याकडे आता भरपूर पैसे असताना, असे जुने पाने शिवून, वस्तू दुरुस्त करून वापरणे, हे या पिढीला आवडत नाही. तेचतेच कपडे पुन्हा पुन्हा घालणे देखील त्यांच्या फॅशनमध्ये बसत नाही. नवीन वस्तूंची आवड कुणाला नसते? सगळ्यांना असते. नवीन कपडे, नवीन वस्तू घेतली की, काही काळ तरी माणसाला आनंदी वाटत असते. मात्र, पृथ्वी आणि पर्यावरणाचा विचार करून अति खरेदी, अति सामान गोळा करणे टाळावे. उपभोक्त्यांनी त्यांचा उपभोग आणि खरेदी वाढवल्यामुळे निर्मिती पण वाढली आहे आणि त्याचबरोबर कचरा वेस्टसुद्धा वाढलेला आहे.

    ते टाळण्यासाठी पुन्हा आपल्या जुन्या भारतीय संस्काराकडे वळावे. ‘जुने, चालतेय की’ त्यातून आपली गरज भागतेय की, मग अति हाव नको. ही गोष्ट स्वत:च्या मनाला समजवावी. हा कपडे फिवर असा वाढत राहिला, तर या न लागणाऱ्या वस्तूंनी अधिकाधिक त्रास होईल. कपडे फिव्हरवर नियंत्रण करणे स्वत:पासून आजच सुरू करायला हवे.