तुमचं देखील मूल बोलताना अडखळतय का? तर जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

लहान मूल बोलताना अडखळणे किंवा तोतरेपणा ही लहान मुलांमधील एक सामान्य घटना आहे. हा विकार मुलांच्या भाषाशैलीवर परिणाम करतो आणि विकासात अडथळा निर्माण करतो.

  बऱ्याच वेळा आपल्या घरातील, आजूबाजूची लहान मुलं छोटे-छोटे शब्द बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतात. नुकतीच बोलायला शिकलेली मुलं त्यांच्या बोबड्या आवाजात एक-दोन शब्द म्हणायला सुरूवात करतात, ते ऐकायला खूपच गोड वाटतं. त्यापैकी काही मुलं सुरुवातीची काही वर्ष बोबडं बोलतात. त्यानंतर हळूहळू त्यांचे उच्चार आणि भाषा स्पष्ट व्हायला लागते. मात्र काही वेळेस काही मुलांना आपण सांगितलेली गोष्ट समजत नाही. आणि त्यांची भाषा व उच्चार स्पष्ट नसतात, तेव्हा मात्र समस्या निर्माण होऊ शकतात.

  लहान मूल बोलताना अडखळणे किंवा तोतरेपणा ही लहान मुलांमधील एक सामान्य घटना आहे. हा विकार मुलांच्या भाषाशैलीवर परिणाम करतो आणि विकासात अडथळा निर्माण करतो.यामुळे मूल योग्यरित्या संवाद साधण्यास आणि त्याच्या भावना किंवा मत व्यक्त करण्यास सक्षम नसते. हा लेख या विकाराची लक्षणे, कारणे आणि उपचार यावर प्रकाश टाकतो.संवाद कौशल्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे मूल कोणत्याही सामाजिक किंवा शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होण्यात रस दाखवत नाही. अशी मूलं अनेकदा इतर मुलांशी संभाषण टाळण्याचा प्रयत्न करतात तसेच ते समाजात वावरण्यास संकोच बाळगताना दिसून येतात.

  काय आहेत लक्षण:

  • पुन्हा पुन्हा तेच बोलणे
  • अर्धवट वाक्य तयार करणे
  • तुटक शब्द, अवघड शब्दांचा उच्चार टाळणे
  • मुठ दाबणे, बोलताना जास्त डोळे मिचकावणे
  • नैराश्य येणे किंवा संकोच बाळगणे.

  बऱ्याचदा कौटुंबिक इतिहास, स्ट्रोक किंवा मेंदूला दुखापत, ठराविक औषधे आणि उच्च पातळीचा तणाव यामुळे देखील संवादासंबंधी विकार आढळून येऊ शकतो ज्यासाठी वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

  विकाराचा सामना करण्यासाठी वेळीच निदान महत्त्वाचे

  वेळीच उपचार केल्याने मुलाला आत्मविश्वास मिळतो आणि सार्वजनिक ठिकाणी निर्भयपणे बोलता येईल किंवा कोणत्याही अडचणीशिवाय संवाद साधता येतो. योग्य याकडे लक्ष दिले नाही तर नैराश्य येणे, मानसिकरित्या दडपण येणे तसेच नैराश्याचा सामना करावा लागतो.

  उपचार कसे कराल?

  संवाद कौशल्यामुळे मुलाच्या विकासात अडथळे येत असल्यास पालकांनी तज्ञांचा सल्ला घ्यावा. संवाद कौशल्य वाढवण्यासाठी स्पीच थेरपी पर्याय निवडणे योग्य राहिल. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT) देखील मुलांना तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्याची त्यांची क्षमता वाढवण्यासाठी, तोतरेपणाची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरते. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी ही आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणून मानसिक आजारांवर उपचार करण्यासठी ही पद्धती अतिशय उपयुक्त आहे.

  मुलांमधील तोतरेपणा:

  ही समस्या असलेल्या व्यक्ती वाक्याच्या सुरुवातीला अडखळतात, त्यांचे शब्द खेचल्या जातात किंवा पुन्हा पुन्हा उच्चारल्या जातात किंवा पहिलाच शब्द फुटत नाही, असे सर्वसाधारण दिसून येते. काहीजणांना बोलताना हाताची मुठी आवळण्याची सवय असते, तर काहींना पाय जमिनीवर दाबण्याची सवय असते. स्पीच थेरेपीने अशा मुलांना जर एखादा ठराविक शब्द म्हणण्यात किंवा त्याचा उच्चार करण्यात अडचण येत असेल , तर तो शब्द अर्धा-अर्धा तोडून त्याचा उच्चार करणे, तसेच तो वाचायला शिकवले जाते. हळूहळू या मुलांमधील उच्चार स्पष्ट होऊ लागतात.

  – डॉ जगदीश काथवटे, नवजात शिशु आणि बालरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, खराडी, पुणे