
पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि झिंक आढळतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतात.
सकाळी उठल्यावर अनेकजण भिजवलेले बदाम किंवा विविध ड्रायफ्रुटस् खातात. रिकाम्यापोटी ड्रायफ्रुट खाल्ल्याने आरोग्यही उत्तम राहतं. या ड्रायफ्रुटमध्ये (dryfruits) पिस्ता हा अप्रतिम प्रकार आहे. पिस्ता तुम्ही तसाच खाऊ शकता,किंवा दुधात घालून खाल्ला तर चव दुप्पट वाढते. सण, उत्सव किंवा लग्नाच्या शुभ मुहूर्तावर लोक एकमेकांना भेट म्हणून सुका मेवा नक्कीच देतात. काहींना भाजलेले पिस्ता आवडतात तर काहींना सॉल्टेड पिस्ता (salted pista)आवडतात. पौष्टिकतेने परिपूर्ण हा पिस्ता दिवसातून किती खावा ? केव्हा खावा? याचीच माहिती यातून तुम्हाला मिळणार आहे. (pista)
पिस्ते कधी खावेत? जेव्हाही पिस्ता खाता तेव्हा वेळेची काळजी घ्या. सकाळी रिकाम्या पोटी पिस्ता खा. जर तुम्ही रोज पिस्ते खाणार असाल तर, रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी खा. कारण भिजवलेले पिस्ते खाल्ल्याने तुमचे आरोग्य सुधारेल. तुम्ही एका दिवसात 15-20 ग्रॅम पिस्ता खाऊ शकता. जर एखाद्या व्यक्तीने ते जास्त प्रमाणात खाल्ले तर ते आपल्या आरोग्याशी संबंधित अनेक नुकसान करू शकते. मात्र, उन्हाळ्यात पिस्ता खाणं शक्यतो टाळा.
पिस्ता खाण्याचे फायदे
पिस्ता आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप चांगला असतो. यामध्ये कॉपर आणि व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे त्वचा आणि केस खूप निरोगी राहतात. तसंच त्वचा कोरडी होण्यापासून प्रतिबंधित करते. ज्या लोकांना अशक्तपणा, थकवा जाणवत असेल त्यांनी पिस्ते आणि बदाम खाणे आवश्यक आहे. कारण त्यात भरपूर लोह असते, ज्यामुळे अॅनिमियासारखे आजार दूर राहतात.
पिस्त्यातील गुणधर्म
पिस्ता खाल्ल्याने वजन किंवा कोलेस्ट्रॉल वाढू शकतं हा गैरसमज सर्वसामन्यांचा गैरसमज आहे. कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि झिंक आढळतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतात. पिस्ता हा नेहमीच फायबरचा समृद्ध स्त्रोत मानला जातो. त्यामुळे पोटाशी संबंधित आजार दूर राहतात. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी रोज पिस्ते खावे जेणेकरून त्यांना पोट भरलेले वाटेल. पिस्ता मेंदू आणि डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.