महिलांना मोहनी घालणारी माहेश्वरी साडी

महेश्वरीच्या डिझाइन्समध्ये मध्य प्रदेशातील किल्ले, राजवड्यांवरच्या कलाकुसरीचा प्रभाव पाहायला मिळतो तसाच चमेलीसारख्या नाजूक फुलाची नक्षीही डोकावते.

    महिलांच्या अगदी मनाजवळ असणाऱ्या वस्तूंमध्ये साडी या वस्त्र प्रकाराचा समावेश होतो. कपाटात कितीही साड्या असल्या तरी त्या कमीच असतात. नवनवीन पॅटर्नच्या साड्या नेसणे त्यांना भावते. साड्यांचे कितीही वेगवेगळे ट्रेण्डस् आले तरी काही पारंपरिक साड्यांची मागणी कधीच कमी होत नाही.

    या साड्यांचा चाहत्या आपल्या कलेक्शनमध्ये भर घालण्यासाठी नवीन डिझाइन्सच्या साड्या अवश्य खरेदी करत असतील, पण खास प्रसंगी नेसण्यासाठी आपली त्यांची पसंती पारंपरिक साड्यांनाच असते. अशा पारंपरिक साड्यांच्या प्रकारामध्ये महेश्वरी साड्यांचा समावेश होतो.

    बहुतांश पारंपरिक साड्यांमध्ये भडकपणा नसतो आणि बडेजावही. पण त्यांचा क्लास काही वेगळाच असतो. हे वर्णन महेश्वरी साड्यांना चपखल लागू पडते. महेश्वरीला असणाऱ्या प्रतिष्ठेचे श्रेय संपूर्णपणे अहिल्याबाई होळकर यांचे आहे. या साड्या महेश्वर शहरात तयार व्हायच्या म्हणून त्यांना महश्वरी असे नाव पडले. 18 व्या शतकापासून आजतागायत स्त्रीवर्गावर महेश्वरीची मोहिनी कायम आहे. अहिल्याबाईंनी नऊवारी महेश्वरीची निर्मिती केली. आज महेश्वरी सहावारी, दुपट्टा आणि ड्रेस मटेरिअरलच्या रूपात दिसून येते.

    महेश्वरी साडीची खासियत म्हणजे ती दोन्ही बाजूंनी नेसता येते. याचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे या साडीच्या पदरावर पाच पट्टे असतात. सामान्यपणे पाच पट्ट्यांमधील दोन पट्टे पांढरे किंवा तीन इतर रंगांचे किंवा त्या उलटही असते. महेश्वरी साडी बहुदा प्लेन असते. जास्तीत जास्त तिच्यावर पट्टे किंवा चौकड्या असतात.

    महेश्वरीच्या डिझाइन्समध्ये मध्य प्रदेशातील किल्ले, राजवड्यांवरच्या कलाकुसरीचा प्रभाव पाहायला मिळतो तसाच चमेलीसारख्या नाजूक फुलाची नक्षीही डोकावते. वजनाला हलकी असणारी ही साडी कोणत्याही ऋतूत घालता येते आणि तिच्यातील अंगभूत डौलामुळे ती लग्नापासून पार्टीपर्यंत कोणत्याही प्रसंगी नेसता येते.