लेदरचे कपडे खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

खरे लेदर पाणी लगेच शोषून घेते. बनावट लेदरवरून पाण्याचे थेंब घसरून पडतात.

  लेदरचे कपडे कधीच आऊट ऑफ फॅशन होत नाहीत. व्यक्तिमत्त्व आकर्षक व प्रभावी बनवण्यासाठी लेदर हा उत्तम पर्याय आहे. लेदरच्या जॅकेटमध्ये अनेक प्रकार आणि पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे अनेकदा लेदर खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता असते. खऱ्या व नकली लेदरमधील फरक त्याचा पोत व गंध यावरून ओळखता येतो.

  – लेदर ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे दाब देणे. खरे लेदर दाबून पाहिल्यास ते चुरगळते व ताणलेले जाणवते. जर ते नकली असेल तर दाबल्यावरही त्यात फरक जाणवणार नाही. तसेच खरे लेदर लवकर फाटत नाही. ते खूप काळ टिकते. अगदी दहा वर्षापर्यंत खरे लेदर टिकते. नकली लेदर एका सीझनमध्ये वापरल्यावरच खराब झालेले जाणवेल.

  – लेदरची विश्वासार्हता तपासून पाहण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे त्यावर असलेल्या चुण्या, ओरखडे व काही उणीवा. या गोष्टी असल्यास ते खरे लेदर आहे असे समजावे. कारण लेदर ही नैसर्गिक गोष्ट असल्याने त्यात यांत्रिक परिपूर्णता असणे शक्य नाही.

  – खऱ्या लेदरला प्लास्टिक किंवा रसायनांसारखा वास येत नाही. असा वास कृत्रिम लेदरला येतो.

  – खरे लेदर ओढल्यास त्यात अगदी छोटी छिद्रे आढळतात. ही छिद्रे म्हणजे प्राण्यांच्या कातडीवरील केसांचे छिद्र असते. कृत्रिम लेदरवर ही छिद्रे मुद्दाम बनवलेली असतात व ओढल्यानंतर विरून जातात.

  – खरे लेदर त्वचेप्रमाणे मुलायम व कोमल असते. बनावटी लेदर कडक असते.

  – खरे लेदर पाणी लगेच शोषून घेते. बनावट लेदरवरून पाण्याचे थेंब घसरून पडतात.