‘चवीने खाणार त्याला वडापाव देणार’, मुंबईत ‘या’ ठिकाणी मिळतात जगातभारी वडापाव!

आज मुंबईत दिवसाला जवळपास १९ ते २० लाख वडापाव खपतात. आज अनेक ऑफिसेसच्या कॅन्टीनमध्ये, शाळांच्या कॅन्टीनमध्ये वडापावने कायमचे स्थान मिळवले.

  आज २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन. मुंबईकरांच्या पोटाची खळगी भरणारा आणि गरीबांसाठी, मजुरांसाठी, कष्टकऱ्यांसाठी वडापाव म्हणजे त्यांच्यासाठी जेवणच. या मायापुरीत अनेकजण फक्त एका वडापाववरती दिवस ढकलणारे त्यांच्यासाठी वडापाव म्हणजे मोठा आधार आहे. मुंबईचा वडापाव हा भारताच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. मुंबईचा वडापाव हा अनेकजण फार आवडीने खातात. परदेशातून मुंबईत आलेले पर्यटक सुद्धा वडापाववर ताव मारतात. वडापाव सुरुवातीला तो १० पैशाला मिळत असे. आज वडापाव पाच रुपयांपासून तर मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत मिळतो. आज वडापाव हा विविध पद्धतीने बनवला जातो. मुंबईत अनेकजण कामानिमित्त ऑफिसला किंवा बाहेर असताना जर त्यांनी घरचा डबा नेला नसेल तर, त्यांच्यासाठी वडापावचा मोठा आधार कारण कमी किंमतीत चविष्ठ आणि वडापावने पोट भरते. मुंबईकर ऑफिसला जाता येताना भूक लागली की, वडापाव खाऊन आपली भूक मिटवितात.

  अठरा तासांहून अधिक काळ मिळणारा वडापाव सुरुवातील केवळ सहा ते सात तास मिळायचा. दुपारी दोनच्या सुमारास गाडी लागायची आणि आठ-साडेआठ पर्यंतच ती गाडी सुरु असायची. दादर, परळ, गिरगावमध्ये मराठी उपाहारगृहांची संख्या वाढल्यानंतर तिथे बटाटावड्याला हक्काचं घर मिळालं. मात्र सुरुवातील बरीच वर्षे केवळ बटाटावडा खाल्ला जायचा. त्याला पावाने कधीपासून साथ दिली याबद्दल मतमतांतरे आहेत. दादर, लालबाग, परळ, वरळी, करीरोड, डिलाईल रोड, भायखळा, सातरस्ता, प्रभादेवी, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, शिवडी, काळाचौकी आदी भागात गिरणी कामगारांनी या मराठमोळ्या पदार्थाला अव्वल स्थान देत, चांगलेच उचलून धरले.

  वडापावचा इतिहास
  १९६६ साली म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेवेळी दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली. त्याला पावची साथ मिळाली आणि तेव्हापासून वडापाव खाण्यास सुरुवात झाली. जनमानसात वडापाव हा शब्द रुळू लागला आणि तेव्हा वडापावचा जन्म झाला.

  वडापाव रोजगाराचे साधन
  १९७० ते १९८० च्या काळामध्ये मुंबईतील गिरण्या बंद पडू लागल्याने अनेक तरुण वडापावच्या गाडीकडे रोजगाराचे आणि पोट भरण्याचे साधन म्हणून बघू लागले. त्यानंतर हळूहळू गल्लोगल्ली वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. मराठी माणसाचे हक्काचा पदार्थ म्हणजे वडापाव. नोकरी नाही लागली की, घरातील लोक सहज म्हणत, नोकरी नाही तर वडापावची गाडी टाक. मराठी मुलांच्या या धडपडीला शिवसेनेने पाठिंबा दिला. त्यामुळे मुंबईत असंख्य मराठी माणसाने वडापावच्या गाड्या टाकल्या. याचे व्यवसायात रुपातंर झाले आणि कित्येक मराठी मुलांना वडापावच्या गाडीवर रोजगार मिळाला. त्यामुळे त्यांच्या सुद्धा उदरनिर्वाह हा वडापावच्या गाडीवरच चाले

  वडापावला राजकीय पाठिंबा
  शिवेसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कायमच मराठी माणसाने उद्योगात उतरावे या मताचे होते. त्यामुळेच वडापावच्या गाड्या म्हणजे सुरु केलेले छोटा उद्योगच. त्याचवेळी सेनेने दक्षिण भारतीयांविरुद्ध भूमिका घेतल्याने मुंबईमधील दादर, माटुंग्यासारख्या परिसरामध्ये असणाऱ्या उडपी हॉटेल्समधील दाक्षिणात्य खाद्यपदार्थांना विरोध करण्यासाठी शिवसेनेने वडापाव प्रमोट कऱण्यास सुरुवात केली. उडप्यांचे पदार्थ खाण्याऐवजी आपला मराठमोळा वडापाव खा असे धोरण घेत सेनेने एकाप्रकारे वडापावचे राजकीय स्तरावर ब्रॅण्डींगच केले. शिववडा हा याच पाठिंब्यातून जन्माला आलेली गोष्ट. शिवसेनेने अगदी वडापावच्या गाड्या टाकण्यापर्यंतचे नियम बनवत या वडापावला राजकीय पाठिंबाच दिला.

  वडापाव झाला ग्लमॅऱ
  २३ ऑगस्ट २००१ साली धीरज गुप्ता या व्यक्तीनं वडापावला इंडियन बर्गरचं रुप देत, जंबो वडापाव फूड सुरु केलं. त्यानिमित्तानंच त्यांच्या ९ शहरातल्या शाखा हा जागतिक वडापाव दिन साजरा करतात. इतरांनीही त्यांचं अनुकरण करायला सुरुवात केली आहे. वडापाव हे खरंतर सामान्यांचं फूड. मुंबईत गिरणी कामगारांच्या संस्कृतीत हे पटकन रुजलं. खायला काही प्लेट लागत नाही ना चमचा. जितकं लवकर बनतो, तितक्याच लवकर खाल्लाही जातो. त्यामुळेच मुंबईच्या कामगार संस्कृतीची तो ओळख बनला. आज मुंबईत दिवसाला जवळपास १९ ते २० लाख वडापाव खपतात. आज अनेक ऑफिसेसच्या कॅन्टीनमध्ये, शाळांच्या कॅन्टीनमध्ये वडापावने कायमचे स्थान मिळवले.

  विदेशातही पोचला वडापाव
  अमेरिकेच्या ऱ्होड आयलंडमधील ब्राऊन विद्यापीठात हॅरिस सॉलोमन हा तिशीतला विद्यार्थ्याने वडापाव या विषयावर पीएच.डी. केली आहे. लंडनमध्ये मुंबईतील रिझवी कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट २०१० रोजी वडापावचे हॉटेलच टाकले आहे. सुजय सोहनी (ठाणे) आणि सुबोध जोशी (वडाळा) या दोघांनी सुरु केलेल्या श्री. कृष्ण वडापाव नावाच्या या हॉटेलच्या उद्योगातून ते आज वर्षाला चार कोटींहून अधिक रुपये कमावतात. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. मात्र मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार नाही हेही खरचं.

  मुंबईतील वडापावची काही चविष्ट आणि प्रसिद्ध ठिकाणे पाहूया

  आराम वडापाव – सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या बाहेर, येथे खवय्यांची नेहमी गर्दी असते

  परब वडापाव – चिंचपोकळी रेल्वे स्टेशन (पश्चिम) येथे परब वडापाव खूप प्रसिद्ध आहे, अनेक ठिकाणांहून येथे परबांच्या वडापाव खाण्यास लोक येतात

  ग्रॅज्यूएट वडापाव – भायखळा रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस ग्रॅज्यूएट वडापाव मिळतो. हा वडापाव मुंबईमधील बेस्ट वडापावमधील एक आहे. गेल्या १७ वर्षांपासून लोक इथल्या वडापावचा अस्वाद घेत आहेत.

  अशोक वडापाव – प्रभादेवीमधील किर्ती कॉलेज जवळील अशोक वडापाव हा मुंबईतील प्रसिद्ध वडापावपैकी एक आहे. गेल्या ३५ वर्षांपासून येथे हा वडापाव विकला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील या वडापावचा अस्वाद घेतला आहे.

  सम्राट वडापाव – मिक्स भजींसोबत मिळणारा वडापाव म्हणजे सम्राट वडापाव. हा वडापाव विले पार्ले येथे मिळतो.

  कुंजविहार वडापाव – ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मिळणारा वडापाव म्हणजे कुंजविहारचा वडापाव. हा वडापाव मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव पैकी एक आहे.

  आनंद वडापाव – विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस मिठीबाई कॉलेजच्या समोर आनंद वडापाव मिळतो.

  शिवाजी वडापाव – मिठीबाई कॉलेज जवळील शिवाजी वडापावदेखील लोकप्रिय आहे

  बोरकर वडापाव – गिरगावातील बोरकर वडापाव हा देखील मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव आहे. या वडापावसोबत मिळणारी चटणी खवय्यांना प्रचंड आवडते.

  भाऊ वडापाव – भाडूंपमधील फेमस वडापाव सेंटर म्हणजे ‘भाऊ वडापाव’. वाल्मिकी नगर या परिसरात हा वडापाव मिळतो.

  लक्ष्मण वडापाव – घाटकोपर पूर्व भागात लक्ष्मण वडापाव मिळतो. लक्ष्मण वडापाव जैन वडापावसाठी देखील प्रसिद्ध आहे.

  गजानन वडापाव – चटणीसाठी लोकप्रिय असणारा वडापाव म्हणजे ठाण्यातील गजानन वडापाव. हा वडापाव ठाणे स्टेशनच्या पश्चिमेस मिळतो.