एका रुपयांत आरोग्य तपासणी; वन रुपी क्लिनिकला ५ वर्षे पूर्ण

डॉक्टर राहुल घुले यांनी २०१७ साली सरकारी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन वनरुपी क्लिनिक ही संकल्पना राबवण्याचा संकल्प सोडला. त्यांना त्यांचे बंधू डॉ.अमोल घुले यांनी साथ दिली. प्रारंभी घाटकोपर आणि कुर्ला या दोन रेल्वे स्थानकांवर वन रुपी क्लिनिकला सुरुवात झाली. परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा सर्वसामान्य रुग्णांना मिळावी या एकमेव हेतूने वन रुपी क्लिनिकची सुरुवात झाली.

    मुंबई – केवळ एक रुपयात आरोग्य तपासणीमध्ये (Medical Chekup) १० रुपयात शुगर, १०० रुपयात इसीजी (ECG) हे वाचायला विचित्र वाटत ना? एकीकडे आरोग्य क्षेत्रातील महागाई गगनाला भिडत असताना वन रुपी क्लिनिक (One Rupee Clinic) ही संस्था अत्यंत माफक दरात प्राथमिक आरोग्य सुविधा (Health Care Service) उपलब्ध करून देत आहे. गेली ५ वर्ष हे कार्य अव्याहत सुरू आहे. या कार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २०१७ ते २०२२ अशा पाच वर्षांच्या कालावधीत वन रुपये क्लिनिकने आजवर पाच लाख रुग्णांना आरोग्य सेवा पुरवली.

    डॉक्टर राहुल घुले (Dr. Rahul Ghule) यांनी २०१७ साली सरकारी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन वनरुपी क्लिनिक ही संकल्पना राबवण्याचा संकल्प सोडला. त्यांना त्यांचे बंधू डॉ.अमोल घुले यांनी साथ दिली. प्रारंभी घाटकोपर आणि कुर्ला या दोन रेल्वे स्थानकांवर वन रुपी क्लिनिकला सुरुवात झाली. परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा सर्वसामान्य रुग्णांना मिळावी या एकमेव हेतूने वन रुपी क्लिनिकची सुरुवात झाली.

    आज मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये ३० ठिकाणी वन रुपी क्लिनिक कार्यरत आहे. केवळ मुंबईतच नव्हे, तर उत्तर प्रदेश आणि बिहार येथील नऊ रेल्वे स्थानकांवर वन रुपी क्लिनिक कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत प्रतिनिधित्व करत असलेस्या बनारस रेल्वे स्थानकावर देखील वनरुपी क्लिनिक रेल्वे प्रवाशांना सेवा देणार आहे.

    फक्त एक रुपयात तपासणी
    शंभर रुपयात ईसीजी काढला जातो, फक्त दहा रुपयात शुगर टेस्ट केली जाते आणि याचा लाभ आजवर पाच लाख पेक्षा अधिक रुग्णांनी घेतला आहे. वनरुपी क्लिनिकमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत, रेल्वे अॅक्सीडेंटमध्ये अनेकदा इमर्जन्सी तयार होते, अशा रुग्णांना तात्काळ प्रथमोपचार मिळाले तर नक्कीच प्राण वाचू शकतात, अशा तीन हजाराहून अधिक इमर्जन्सी रुग्णांवर वन रुपी क्लिनिकमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. जवळपास शंभर ते दीडशे हार्टअटॅकच्या रुग्णांवर वन रुपी क्लिनिकमध्ये प्रथमोपचार झाल्याने त्यांचे देखील प्राण वाचले आहेत. आजवर १५ ते २० महिला प्रवाशांची प्रसूती करण्यात आले आहेत. वन रुपये क्लिनिकच्या माध्यमातून २०० जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.

    विस्तार झाल्यास सेवा वाढणार
    एका मराठी तरुणाने सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करण्याचे ठरवले आणि त्यातून वनरुपी क्लिनिकचे कार्य उभे राहिले. भविष्यात अशा प्रकारच्या कम्युनिटी क्लिनिक्सची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. त्यामुळे या संकल्पनेचा अधिकाधिक विस्तार झाल्यास आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ होऊ शकते असा विश्वास वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉक्टर राहुल घुले व्यक्त करतात.