रोज प्या हळदीचे दूध मिळतील असंख्य फायदे

  एखाद्या वेळी काही दुखले-खुपले, किंवा आजारपण आले, सर्दी खोकला झालेला असला, किंवा कुठल्याही प्रकारची शारीरिक इजा झालेली असली, तर हळद घातलेले दुध (Turmeric Milk) पिण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. हळदीच्या दुधाने जखमा लवकर भरून येण्यास मदत होते, तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने आजार लवकर बरा होण्यासही मदत मिळते.

  हळद घातलेले दुध किंवा हळदीचे दुध अनेक आरोग्यकारी गुणांनी युक्त आहे. हळदीमध्ये असलेल्या अँटी बायोटिक प्रॉपर्टीज आणि दुधामध्ये असलेले कॅल्शियम यामुळे शरीराला अनेक प्रकारच्या व्याधींपासून संरक्षण मिळते. हळदीच्या दुधाचे आणखी फायदे करून घ्यायचे असतील, तर हळदीच्या पावडर ऐवजी कच्ची हळद दुधामध्ये घालून ते दुध प्यावे.

  हाडांना बळकटी मिळते
  मासिक पाळीच्या वेळी अनेक महिलांना पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अशा त्रासांना सामोरे जावे लागते. अनेक महिलांना पायांमध्ये असह्य कळा येत असतात. हे त्रास पाळीच्या दिवसांमध्ये इतके जास्त होतात, की रोजची कामे करणे देखील महिलांना अवघड होऊन बसते. अश्या वेळी गरम दुधातून हळदीचे सेवन केल्याने आराम मिळेल. तसेच ज्या महिला आपल्या नवजात मुलांना स्तनपान करवीत असतील, त्यांनी देखील हळदीचे दुध घेतल्याने फायदा होईल. हळदीच्या दुधाच्या सेवनाने शरीरातील वेदना कमी होण्यास मदत होईलच, पण नियमित हळदीचे दुध घेतल्याने हाडांना बळकटी मिळण्यासही मदत होईल.

  शांत झोपेसाठी फायदेशीर
  हाडे फ्रॅक्चर झाल्यास किंवा मुका मार लागल्यास हळदीचे दुध घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अनेकदा हलका मार लागल्याने किंवा स्नायूवर ताण आल्याने, मुरगळल्याने शरीराच्या त्या भागातील रक्ताभिसरण काही काळ प्रभावित होते. हळदीच्या दुधाच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण पुनश्च सुरळीत होण्यास मदत होते. तसेच हळदीमध्ये असलेले करक्युमीन हे तत्व वेदनाशामक आहे. हळदीमध्ये असलेल्या अमिनो अॅसिडमुळे शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत मिळते, याच कारणास्तव रात्री शांत झोप लागण्यासाठी हळदीचे दुध घेण्याचा सल्ला तज्ञ देतात.

  इन्फेक्शन दूर राहण्यास मदत
  हळदीमधील अँटी सेप्टिक आणि अँटी बायोटिक तत्वे शरीरातील इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात, म्हणूनच बदलत्या हवामानामुळे उद्भविणारा सर्दी-खोकला झालेला असताना हळदीच्या दुधाच्या सेवनाने आराम मिळतो. तसेच घसा खवखवत असल्यासही हळदीच्या दुधाच्या सेवनाने आराम मिळतो. हळदीच्या दुधाच्या सेवनाने शरीराला मिळणारे क्षार आणि कॅल्शियम यांच्या मदतीने शरीरातील अतिरिक्त चरबी घटविण्यास मदत मिळू शकते.