गरोदर महिलेला मुदत संपलेल्या गोळ्या; कळंब आरोग्य केंद्राचा धक्कादायक प्रकार

प्राथमिक आरोग्य केंद्र कळंबचे संबंधित कर्मचारी मुदत संपलेल्या गोळ्या देऊन अशिक्षित आदिवासींच्या जीवाशी खेळत असतील, तर अशा कर्मचाऱ्यांवर कारवाही व्हावी यासाठी वामन निरगुडा यांनी आदिवासी संघटनांकडे धाव घेतली.

    कर्जत-कशेळे : कर्जत-कळंब ग्रामपंचायत (Karjat) हद्दीतील मिरचूलवाडी आदिवासीवाडीतील प्रमिला वामन निरगुडा ही मागील सहा महिन्यापासून दवाखान्यातून दिलेल्या गोळ्या खात होती. तसेच, सदर महिला गरोदर (Pregnant Woman) असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) कळंब या ठिकाणी नावनोंदणी केली आहे. तशी दिलेल्या कार्डवर नोंद करण्यात आली असून, संबंधित कर्मचाऱ्याच्या सल्ल्यानुसार गोळ्या घेत असताना १५ जुलै रोजी गोळ्यांची मुदत संपल्याचे (Expired Pills) वामन निरगुडा आणि त्यांच्या पत्नीस निदर्शनात आले आहे.

    कर्जत तालुक्यातील कळंब परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज (Tribal) आहे. तसेच, मात्र आरोग्याबाबत समस्या कायम असल्याचे सर्रासपणे दिसून येते. कळंब येथे असाच प्रकार उघडकीस आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र कळंबचे संबंधित कर्मचारी मुदत संपलेल्या गोळ्या देऊन अशिक्षित आदिवासींच्या जीवाशी खेळत असतील, तर अशा कर्मचाऱ्यांवर कारवाही व्हावी यासाठी वामन निरगुडा यांनी आदिवासी संघटनांकडे धाव घेतली.

    आदिवासी जनजागृती विकास संघटनेचे संस्थापक बुधाजी हिंदोळा, रायगड जिल्हा उपाध्यक्ष भाऊ मेंगाळ, कर्जत तालुका अध्यक्ष जैतू पारधी, माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे, बबन भालेराव, महेश म्हसे यांनी तातडीने कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत डॉक्टरांना जाब विचारला. आपण आदिवासी समाजाच्या जीवाशी खेळत असाल, तर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल, असे सुनावले. गरोदर महिला प्रमिला निरगुडा यांना योग्य ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन डॉक्टर यांनी आदिवासी जनजागृती विकास संघटनेचे कार्यकर्ते यांना दिले.