कुठलीही मेहनत न करता थकवा जाणवतो? मग हे करा

तंदुरुस्त राहण्यासाठी 70 टक्के आहार आणि 30 टक्के व्यायाम या सूत्रानुसार दिनचर्या असली पाहिजे. अर्थात आहार आणि व्यायाम यांची गुणवत्ता आणि प्रमाणात फरक असतो.

  तुम्हाला जर कुठलीही मेहनत न करता थकवा जाणवत असेल तर सावध होण्याची वेळ आहे. अगदी कमी काम केल्याने थकवा येत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीराची कार्यक्षमता कमी झाली आहे. वर्तमान स्थितीत कुठला आजार नसला तरी येत्या काही काळात आरोग्य संबंधी गंभीर समस्या निर्माण होणार असल्याचे हे संकेत आहेत.  त्या साठी काही गोष्टींचा आपण विचार करायला हवा.

  तंदुरुस्त राहण्यासाठी 70 टक्के आहार आणि 30 टक्के व्यायाम या सूत्रानुसार दिनचर्या असली पाहिजे. अर्थात आहार आणि व्यायाम यांची गुणवत्ता आणि प्रमाणात फरक असतो. आयुष्याचा प्रवास करताना पावलापावलावर हताश व्हायला होते. थकवा येतो, निराश वाटते; पण अशा वेळी आयुष्यात उत्साहाची, आनंदाची कमतरता आहे, हे समजून घ्यावे. कारण, उत्साह आणि आनंद हे आयुष्यात ऊर्जेचे काम करत असतात. ते तसेच राहावे असे वाटत असेल तर काही नियम स्वतःसाठी ठरवून घ्यावे. त्यामुळे आपण नेहमीच उत्साही राहू शकतो.

  यासाठी काय करायला हवे?
  70 टक्के आहार नियोजन आणि 30 टक्के व्यायाम केल्यास व्यक्ती तंदुरुस्त राहू शकते. त्याचबरोबर महत्त्वाचे आहे ते घरचे जेवण करणे. आजारापासून दूर राहायचे असेल आणि तंदुरुस्ती राहायचे असेल तर मसालेदार आहार टाळावा. जास्तीत जास्त फळे खावीत. नियमितपणे 10-12 ग्लास पाणी प्यावे. सुकामेवा आणि सॅलड यांचाही आहारात समावेश करावा.

  कॅलरीज कशा जाळाव्या?
  कमी कर्बस् आणि जास्त प्रथिने सेवन करावे. कार्डियो व्यायाम 20-25 मिनिटे करावा. त्याचबरोबर व्यायाम जास्त तीव्रतेचा आणि रिपीटीशनही जास्त असावे. जितक्या जास्त वेळा व्यायाम कराल तेवढे जास्त मेद जळते. व्यायाम करण्यासाठी एक ते दीड तास पुरेसा आहे. मात्र, हे आपल्या जीवनशैलीवर अवलंबून आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे एक घड्याळ असते आणि ते व्यक्तिगणिक वेगळे असते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायामासाठीचा वेळ ठरवावा.

  आहार आणि जिम
  पहिल्यांदाच जिमला जात असाल तर एक ते दीड महिना हलके व्यायाम करावेत आणि व्यायामापूर्वी शरीर वॉर्मअप करावे. मधून मधून कार्डियो व्यायाम आणि वजन उचलण्याचे व्यायाम, कमी वजन घेऊन व्यायाम करावे. हळूहळू शरीराचे संतुलन होते. असे न करता थेट जास्त वजनाने व्यायामाला सुरुवात केल्यास शरीरात वेदना आणि इजा होऊ शकते.

  आहार
  कर्बस कमी खावेत; पण अगदीच बंद करू नये. कर्बस मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक असतात. मेंदूचे कार्य योग्यप्रकारे चालावे यासाठी कर्बस खाण्याची गरज आहे. कर्बस कमी प्रमाणात सेवन करताना खूप प्रथिने सेवन करावीत. अंडी, चिकन, प्रथिने, शेक्स, सोया, पनीर, टोफू आणि ग्रीन सॅलड किंवा टोमॅटो सूप आपल्या आहारात सामील करावे. किटो डाएट हा चविष्ट आहार नियोजनाचा प्रकार आहे. त्यात आपण सर्व काही खाऊ शकता. त्यात मेद जास्त घटते. त्यामुळे त्या आहार नियोजनाप्रमाणे आहार घेऊ शकता.