सोफ्यावर झोपण्याची सवय आहे?; मग हे नक्की वाचा

दीर्घकाळ सोफ्यावर झोपल्याने पाठदुखी, मानदुखीची समस्याही भेडसावू शकते. कदाचित हे दुखणे त्वरित जाणवणार नाही; पण कालांतराने ते डोके वर काढेल हे निश्चित.

    आपल्याकडे पूर्वीच्या काळी आलिशान बंगल्यांमध्येच सोफा दिसायचा. पण हल्ली घराघरात सोफे आले आहेत. त्यात असंख्य व्हरायटी पाहायला मिळतात. सोफ्यावर तासनतास बसून टीव्ही पाहणे, मोबाईल पाहणे हा हल्ली अनेकांचा दिनक्रम बनला आहे.

    यापुढे जात अनेकजण  रात्री सोफ्यावर झोपतातही ! मात्र मंडळी सोफ्यावर सातत्याने झोपल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. सोफ्यावर आरामदायक झोप मिळत नाही. कारण ते झोपण्याच्या हेतूने डिझाइनच केलेले नसतात. तसेच बहुतांश सोफ्यांमध्ये फोमचा वापर केलेला असतो.

    साहजिकच ते पलंगावरील कापसाच्या गाद्यांप्रमाणे उष्णाताही शोषून घेऊ शकत नाही. रोजच्या वापराच्या गाद्या या आरामशीर झोप प्रदान करण्यासाठी तयार केलेल्या असतात. तसे सोफ्याचे नसते. सोफ्याचे आकारमान ठरलेले असते. तेवढय़ा जागेत अवघडूनच झोपावे लागते. आरामदायक स्थितीमध्ये रात्रभर झोपल्याने शरीराच्या अवयवांमध्ये वेदना होतात.

    दीर्घकाळ सोफ्यावर झोपल्याने पाठदुखी, मानदुखीची समस्याही भेडसावू शकते. कदाचित हे दुखणे त्वरित जाणवणार नाही; पण कालांतराने ते डोके वर काढेल हे निश्चित. याखेरीज शांत झोप न मिळाल्यामुळे होणारे तोटेही सहन करावे लागू शकतात. त्यामुळे बेडवर झोपायचे नसेल तर एकवेळ खाली सतरंजी, चटई टाकून झोपा; पण सोफ्यावर झोपणे टाळा!