थंडीमुळे दुखत असेल कान तर करा हे घरगुती उपाय

जर थंडीत वातावरण बदलल्यामुळे तुमचे कान दुखत असतील तर तुम्ही घरगुती उपाय करून यावर उपचार करू शकता.

  कानाचे दुखणे असह्य आणि वेदनादायी असते. कान दुखण्यामागची कारणे निरनिराळी असू शकतात. कधी इनफेक्शन तर कधी कानात मळ साचल्यामुळे कान दुखू लागतो. बऱ्याचदा थंडीत वातावरणात बदल झाल्यामुळे कानातून वेदना जाणवतात. कानात पाणी गेल्यास अथवा थंड हवा शिरल्यास कान प्रचंड दुखतात. कानात टाकण्यासाठी विविध प्रकारचे इअर ड्रॉप्स मिळतात. पण जर थंडीत वातावरण बदलल्यामुळे तुमचे कान दुखत असतील तर तुम्ही घरगुती उपाय करून यावर उपचार करू शकता.

  कानदुखीवर घरगुती उपाय –

  कान दुखी जर वातावरणातील बदलामुळे झालेली असेल अथवा कानात मळ साचल्यामुळे असेल तर हे काही घरगुती उपाय तुम्ही घरातच करू शकता. पण जर कानातून तीव्र वेदना येत असतील तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

  आल्याचा रस –

  कान दुखीपासून सुटका मिळण्यासाठी कानात आल्याचा रस टाकला जातो. कारण आलं हे अॅंटि इनफ्लैमटरी आहे. ज्यामुळे कानाचे दुखणे यामुळे लगेच बरे होते. यासाठी नारळाच्या तेलात थोडा आल्याचा रस मिसळा आणि थोडं कोमट करून थंड झाल्यावर कानात टाका.

  कान शेकवा –

  बऱ्याचदा थंडाव्यामुळे तुमचे कान ठणकू लागतात. अशा वेळी कानाजवळ हॉट पॅडने शेक देणं फायद्याचं ठरू शकता. जर तुमच्या घरी हीट पॅड नसेल तर तुम्ही गरम पाण्यात टॉवेल बुडवून त्याने शेक घेऊ शकता.

  लसूण –

  कानाचे दुखणे बरे करण्यासाठी लसूण अतिशय प्रभावी घरगुती औषध आहे. कारण लसणामध्ये अॅंटी बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत. ज्यामुळे कानात झालेले इनफेक्शन लगेच बरे होते. यासाठी तेलात चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून ते गरम करा आणि थंड झाल्यावर हे तेल कानात घाला.

  कांदा –

  कांद्यामध्ये शरीराला थंडावा देणारे गुणधर्म आहेत. कानात इनफेक्शन झाल्यास कान जोरात ठणकू लागतो. अशा वेळी कानातून येणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा वापर करू शकता. यासाठी कांद्याचा रस काढा आणि कानात त्याचे काही थेंब टाका.

  टी ट्री ऑईल –

  कानाचे इनफेक्शन कमी करण्यासाठी तुम्ही कानात टी ट्री ऑईल टाकू शकता. यासाठी तिळाच्या तेलात दोन ते चार थेंब टी ट्री ऑईल टाका आणि कोमट करून थंड झाल्यावर कानात टाका. ज्यामुळे काही वेळात तुमच्या कानातील वेदना नक्कीच कमी होतील.

  थंडीमुळे तुमचे कान दुखत असतील तर या घरगुती उपायाने तुम्हाला  चांगला आराम मिळू शकेल.