शहरात राहत असाल तर आहारात जायफळाचा समावेश अवश्य करा; जाणून घ्या कारण

पचनसंस्थेशी निगडीत काही त्रास, जुलाब होणे, पोटात वायू होणे, सूज येणे, पोट फुगणे आदी समस्यांनी ग्रस्त असाल, तर जायफळाचा नक्कीच फायदा होईल.

  स्वयंपाकघरात काही पदार्थांमध्ये विशेषतः गोड पदार्थांमध्ये जायफळ घातले जाते; मात्र फक्त पदार्थात घालण्यापुरताच जायफळाचा उपयोग केला जात नाही, तर अनेक शरीराच्या छोट्या-मोठ्या समस्यांचे निराकरण जायफळाने होऊ शकते. जायफळाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. पोटाच्या तक्रारी, त्वचेच्या तक्रारी दूर करण्यास जायफळाचा लाभ होतो. जायफळाचे आरोग्यासाठी काय महत्त्व आहे जाणून घेऊया!

  चेहऱ्यावरील सुरकुत्या
  आपल्या चेहऱ्यावर वाढणाऱ्या सुरकुत्यांनी चिंताग्रस्त असाल, तर त्यासाठी जायफळ उपयोगी आहे. जायफळ उगाळून त्याची पेस्ट एक महिना चेहऱ्याच्या सुरकुत्यांवर लावल्यास सुरकुत्या निघून जातात. त्याशिवाय चेहऱ्यावरील मुरूम, पुटकुळ्या यांचे चेहऱ्यावर पडणारे डाग घालवण्यासाठीही याचा उपयोग होतो.

  रक्तप्रवाहात वृद्धी
  जायफळाने मालिश केल्यास रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होतो. शरीरातील रक्तप्रवाह योग्य राहिल्यास झोप चांगली लागते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते. त्याशिवाय रोज रात्री दुधातून जायफळाची पूड घेतल्यास झोप चांगली लागते.

  दातदुखी दूर होते
  दातदुखीमध्ये जायफळाचे तेल खूप फायदेशीर ठरते. दात दुखत असतील कापसावर जायफळाचे तेल घेऊन दातांच्या मुळाशी लावल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदिक टूथपेस्टमध्येही दालचिनी आणि जायफळ टाकलेले असते.

  मुलांना हितकारी
  लहान मुलांना दूध पचायला जड जाते. अशा वेळी अर्धे दूध व अर्धे पाणी घालून त्यात एक जायफळ टाकून उकळून थोडे थंड करून पाजल्यास मुलांना दूध पचते.

  दृष्टी वृद्धिंगत होते
  डोळ्यांची दृष्टी कमी झाली असल्यास जायफळ खूपच फायदेशीर ठरते.  त्यासाठी जायफळ उगाळून त्याचा लेप तयार करा. हा लेप डोळ्यांच्या पापण्यांवर आणि डोळ्यांच्या चारही बाजूस लावल्यास दृष्टी सुधारते.

  ब्रेन टॉनिक
  प्राचीन काळात रोमन आणि ग्रीक या दोन्ही संस्कृतींमध्ये जायफळाचा वापर ब्रेन टॉनिक सारखा करत असत. कारण, जायफळ मेंदूला उत्तेजित करते. त्यामुळे थकवा, तणाव कमी करण्यासाठी मदत करू शकते. एखाद्या व्यक्तीला चिंता रोग किंवा औदासिन्य आले असेल, तर त्यावर जायफळाचा उपयोग होऊ शकतो. जायफळाच्या सेवनाने अल्झायमरसारखा आजारही होणार नाही.

  वेदनाशामक
  जायफळामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. त्यामुळेच पोटदुखी आणि सूज येणे या दोन्हींमध्ये जायफळाचा वापर केला जातो. आपल्याला सांधेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, गाठी, जखमा आणि इतर सर्व आजारांमध्येही जायफळाचा वापर केला जाऊ शकतो. वेदनाहारी म्हणून जायफळाचे तेल वेदना होणार्‍या जागी लावल्यास गुणकारी ठरते.

  पचनसंबंधी समस्या
  पचनसंस्थेशी निगडीत काही त्रास, जुलाब होणे, पोटात वायू होणे, सूज येणे, पोट फुगणे आदी समस्यांनी ग्रस्त असाल, तर जायफळाचा नक्कीच फायदा होईल. जायफळाचे तेल आतड्यातील अतिरिक्त वायू बाहेर टाकण्यास मदत करेल. त्यामुळे पोटदुखीपासून सुटका होते. जायफळाचे सेवन केल्यास भूक न लागण्याची समस्याही दूर होते.

  रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ
  जायफळाचा वापर पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी केला जातोच, शिवाय त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. जायफळात खनिजे आहेतच. त्याव्यतिरिक्त पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह आणि मॅग्नेशिअम हे सर्व धातूही शरीराला पोषक असतात.

  यकृत आणि मूत्राशय
  जायफळ शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे खूप महत्त्वाचे असते. आहार, प्रदूषण, तणाव, तंबाखू सेवन तसेच काही औषधे आणि इतर बाहेरील पदार्थांचे सेवन यामुळे शरीरातील विषारी घटकांचे प्रमाण वाढते. जायफळाचा येथे टॉनिकसारखाच फायदा होतो. मूत्राशय आणि यकृत यांच्यातील विषारी घटक ते शरीराबाहेर टाकून ते साफ ठेवण्यास जायफळ मदत करते. आपल्यापैकी कोणालाही यकृताचा काही त्रास असेल, तर जायफळ नक्कीच फायदेशीर ठरेल.