जसे फूड तसा मूड; मन आणि मेंदूच्या सजगतेसाठी घ्या ‘हा’ आहार

    आपल्या प्रत्येक मूडकरिता किंवा निरनिराळ्या मनस्थिती साठी निरनिराळे अन्नपदार्थ पूरक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? परीक्षेच्या काळामध्ये मुलांच्या मनावर अभ्यासाचा ताण असतो. अश्या वेळी मेंदू सजग राहणे आवश्यक असते. त्यावेळी प्रथिनांनी परिपूर्ण आहार घेतला, तर मनाची आणि मेंदूची सजगता वाढते. जर मनावर ताण असेल आणि मन शांत करण्याची आवश्यकता असेल, तर कर्बोदके जास्त प्रमाणात असणारा आहार घ्या. कर्बोदके जास्त असणारा आहार मन आणि मेंदू शिथिल होण्यास मदत करतो. तर अश्याच निरनिराळ्या मूडकरिता निरनिराळे खाद्यपदार्थ पूरक आहेत.

    मन-मेंदू सजगतेसाठी
    मन आणि मेंदू सजग, अलर्ट ठेवण्यासाठी प्रथिने अधिक मात्रेमध्ये घ्यावयास हवीत. मासे, अंडी, फॅट्स चे प्रमाण कमी असलेले (लो फॅट) पनीर, साय काढलेले दूध, दही, मटार, डाळी, ताजी फळे, सोयाबीन इत्यादी अन्नपदार्थांमध्ये प्रथिनांची मात्रा अधिक असते. जर परीक्षा असेल, किंवा ऑफिसमध्ये एखादे प्रेझेन्टेशन द्यायचे असेल, तर सकाळी नाश्त्यामध्ये दूध आणि अंडी यांचे सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ञ देतात. जे लोक अंडे खात नसतील त्यांनी पनीरचे सेवन करावे. सकाळी न्याहारीमध्ये प्रथिनांचे सेवन केल्यानंतर मेंदू सजग राहण्यास मदत होते.

    उत्साह वाढविण्यासाठी
    जर शरीरामध्ये उत्साह किंवा काम करण्याची क्षमता वाढवायची असेल, तर संत्रे, सफरचंद, सोया मिल्क, दही इत्यादी पदार्थांचे सेवन करावे, या सर्व पदार्थांमध्ये कर्बोदके आहेत, जी पचण्यास जास्त अवधीची गरज असते. त्यामुळे शरीराला सतत उर्जा मिळत राहते. त्यामुळे जास्त वेळ काम करण्याचा उत्साह शरीरामध्ये टिकून राहतो. शरीराला स्फूर्ती देण्यासाठी सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करणे ही उत्तम. या बियांच्या नियमित सेवानांतून शरीराला आवश्यक असणारे मॅग्नेशियम मिळते.

    मनस्थिती आनंदी ठेवण्यासाठी
    जर तुमची मनस्थिती आनंदी असावी असे वाटत असेल, तर केळ्याचे सेवन करा. केळ्यामध्ये असलेले ब६ हे जीवनसत्व मेंदूतील सेरोटोनीन वाढविते. सेरोटोनीन एक असे न्युरोट्रान्समीटर आहे, जे आपली मनस्थिती आनंदी ठेवण्यास मदत करते. चॉकोलेट्स चे सेवन केल्याने शरीरामध्ये एंडोर्फिन हार्मोन्स सक्रीय होतात. हे हार्मोन्स आपल्या आनंदी मनस्थितीसाठी सहायक आहेत.

    अन्नपदार्थ किती प्रमाणात खावे ?
    जसे अन्नपदार्थ निरनिराळ्या मनस्थितींसाठी पूरक आहेत हे आपण जाणून घेतले, तसेच कोणतेही अन्नपदार्थ किती प्रमाणात खावेत हे जाणून घेणे ही अगत्याचे आहे. आपण सेवन करीत असेलेल्या अन्नपदार्थांचे प्रमाण आणि आपला मूड यांचा सरळ संबंध आहे. यामागे वैज्ञानिक कारण आहे. आपण अन्नप्राशन केल्यानंतर आपल्या मेंदूचे कार्य काही वेळाकरिता शिथिल होते. विशेषतः जास्त स्निग्ध पदार्थ, म्हणजेच जास्त तेल किंवा तूप असणारे पदार्थ, पचण्यास जड असलेले पदार्थ खाल्ल्यानंतर मेंदूचे कार्य शिथिल होते. म्हणूनच सणासुदीच्या किंवा लग्नसमारंभातील मेजवानी नंतर एखादी डुलकी काढण्याची इच्छा आपल्याला अनावर होत असते.

    त्यामुळे अन्न सेवन करताना त्याच्या प्रमाणाकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे. मेंदू सजग ठेवणारे किंवा मनस्थिती आनंदी बनविणारे अन्नपदार्थ ठराविक प्रमाणापेक्षा अधिक मात्रेमध्ये सेवन केले, तर त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याचा संभाव अधिक आहे. त्यामुळे पदार्थ खाताना तो योग्य मात्रेमध्ये खाणे आवश्यक आहे.