मोबाईलला बाजूला ठेऊन घ्या क्षणभर विश्रांती

स्मार्टफोनच्या अतिवापराचा परिणाम तुमच्या घनिष्ठ मैत्रीवरही होऊ शकतो, असे एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. एसएक्स विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मोबाईलचा जास्त वापर केल्यामुळे..

    ‘मोबाईल ही गरज राहिलेली नसून त्याचे रूपांतर व्यसनात झाले आहे’, या एका वाक्यात आजकालच्या तरुणांच्या मोबाईल व्यसनाचे वर्णन करता येईल. स्मार्टफोनमुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनात एक वेगळेच परिवर्तन घडून आले असले तरीही या परिवर्तनामुळे आपल्याला कळत-नकळत अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. मोबाईलमुळे होत असलेल्या दुष्परिणामांकडे शास्त्रज्ञदेखील अत्यंत गांभीर्याने पाहू लागले आहेत.

    सतत मोबाईल हाताळण्याच्या सवयीमुळे आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तर बिघडत आहे. तसेच याचा दुष्परिणाम आपल्या बुद्धिमत्तेवर आणि कल्पनाशक्तीवरसुद्धा होऊ लागला आहे. त्यामुळे मोबाईलपासून क्षणभर विश्रांती घेऊन आपण आपल्या आरोग्याला स्मार्टफोनच्या धोक्यापासून वाचवू शकतो.

    सांभाळा डोळ्यांना!
    मानवी डोळा ही निसर्गाने मानवाला दिलेली अमूल्य देणगी आहे. पण स्मार्टफोनमुळे त्यावर आघात होतोय. वारंवार मोबाइल बघितल्यामुळे आपल्याला काही इंचांवर लक्ष केंद्रित करायची सवय लागत असल्यामुळे आपण लांब अंतरावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता हरवून बसतोय.

    हमे निंद ना आये
    चॅटिंग करत किंवा मोबाईल हाताळत झोपण्याची अनेकांना सवय असल्यामुळे अनेक जणांना झोपताना आपल्या उशाशी आपला स्मार्टफोन ठेवण्याची वाईट सवय असते. पण एलसीडी स्क्रीन डोळ्यासमोर धरल्यामुळे आपल्या झोपेचे चक्र बिघडते, असे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे तुम्हाला ‘मला झोपच येत नाही’ ही समस्या भेडसावत असेल तर त्यामागे स्मार्टफोनचा अतिवापर हे कारण नक्कीच असू शकते.

    जंतूंचे घर
    दिवसभर आपण अनेक वस्तू हाताळत असल्यामुळे आपला दररोज जंतूंशी लढा सुरूच असतो, पण स्मार्टफोनचा नेहमीच कान आणि आपल्या तोंडाशी/ चेहऱ्याशी संबंध येत असल्याने स्मार्टफोन्समुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका अधिक आहे.

    ‘मान’ सांभाळा
    आपल्या डोक्याचे वजन पेलण्याचे काम आपल्या पाठीचा कणा करत असतो. मोबाईलमध्ये डोकावण्यासाठी-पाहाण्यासाठी ज्यावेळी आपण आपले डोके पुढे करतो किंवा झुकवतो, त्यावेळी आपल्या पाठीच्या कण्यावर ताण येतो. ज्यामुळे मानेच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला वेदना होतात. वैद्यकीय भाषेत याला ‘टेकस्ट नेक’ असेदेखील म्हणतात.

    जरा जपूनच!
    वाहन चालवताना कोणत्याही गोष्टीमुळे विचलित होणे धोकादायकच असते, पण स्मार्टफोनमुळे लक्ष विचलित होण्याचे प्रमाण तुलनेने जास्त असते. व्हर्जिनिया टेक ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासानुसार, गाडी चालवताना चालक फोन वापरत असल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक असते. स्मार्टफोन्समुळे रस्त्यावरून चालताना देखील तुमचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याचा धोका असतो.

    अतिवापर वाढवतो ताण
    स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे ताणतणावांच्या प्रमाणात वाढ होते. स्वीडनमधील गोथेनबर्ग विद्यापीठाने स्मार्टफोन वापरणाऱ्या विशीत असलेल्या तरुणांचा वर्षभर अभ्यास केल्यावर त्यातून पुढे आलेले निष्कर्ष खूपच धक्कादायक होते. या निष्कर्षांनुसार जास्त प्रमाणात मोबाईलचा वापर करणाऱ्यांमध्ये नैराशाचे प्रमाण जास्त दिसले. हे प्रमाण पुरुष आणि महिला दोघांमध्ये आढळले.

    इतर धोके कोणते?
    स्मार्टफोनच्या अतिवापराचा परिणाम तुमच्या घनिष्ठ मैत्रीवरही होऊ शकतो, असे एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. एसएक्स विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मोबाईलचा जास्त वापर केल्यामुळे लोकांमध्ये आपल्याबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते.