The benefits of drinking coffee regularly

दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी शिवाय होत नाही. तसचं सतत रिफ्रेश राहण्यासाठी दिवसभरात अनेकवेळा चहा किंवा कॉफीचे सेवन केले जाते. मात्र, नियमीत कॉफी सेवनाचे अनेक फायदे आहेत. कॉफी तुम्हाला विस्मृतीच्या आजारांपासून दूर ठेवू शकते.

  मुंबई : दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी शिवाय होत नाही. तसचं सतत रिफ्रेश राहण्यासाठी दिवसभरात अनेकवेळा चहा किंवा कॉफीचे सेवन केले जाते. मात्र, नियमीत कॉफी सेवनाचे अनेक फायदे आहेत. कॉफी तुम्हाला विस्मृतीच्या आजारांपासून दूर ठेवू शकते.

  डिमेन्शियासारखा विस्मृतीचा आजार जडण्याचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या वितंचकाला (एन्झाइम) चालना देणारी 24 संयुगे शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहेत, ज्यामध्ये कॅफेनचाही समावेश आहे. अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठातील संशोधकांनी 1280 संयुगांचा अभ्यास केला. त्यातील 24 संयुगांमध्ये मेंदूमधील ‘एनएमएनएटी 2’ हे एन्झाइम वाढविण्याची क्षमता असल्याचे आढळून आले आहे.

  ‘एनएमएनएटी 2’ हे एन्झाइम मेंदूमधील दोन महत्त्वाच्या भूमिका पार पाडते. चेतापेशींवर ताण येण्यापासून त्यांना वाचविण्याचे महत्त्वाचे काम हे एन्झाइम करते; तसेच वाढत्या वयामुळे मेंदूमध्ये साठणाऱ्या ताउ नावाच्या चुकीच्या प्रथिनांशी लढा देण्यासाठी हे एन्झाइम उपयुक्त ठरते. मेंदूत साठणाऱ्या या चुकीच्या प्रथिनांमुळे अल्झायमर्स, पार्किन्सन्स आणि हंटिग्टन आजार होण्याची शक्यता बळावते, असे संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे त्यावर मात करणाऱ्या एन्झाइमची भूमिका महत्त्वाची आहे. ‘या संशोधनामुळे चुकीच्या प्रथिनांशी लढणाऱ्या मेंदूतील या एन्झाइमची पातळी वाढविण्यासाठीचे औषध तयार करणे शक्य होईल. या औषधांमुळे चेतासंस्थेचे काम मंदावणाऱ्या दुष्परिणामांविरोधात रासायनिक अडसर निर्माण करता येऊ शकेल,’ असे इंडियाना विद्यापीठाचे हुइ-चेन लू या संशोधकांनी सांगितले.

  एन्झाइमचे उत्पादन वाढविण्यासाठी उपयुक्त असलेल्या पदार्थांपैकी एक पदार्थ कॅफेन आहे. मोठ्या प्रमाणावर ताउ प्रथिने निर्माण करण्यासाठी अनुवांशिक सुधारणा केलेल्या उंदरांची स्मरणशक्ती कॅफेनमुळे सुधारत असल्याचे समोर आले आहे.

  नियमीत कॉफी पिण्याचे फायदे

  • मूड रिफ्रेश होतो.
  • डोक्यावरील तणाव कमी होऊन डिप्रेशनपासून दिलासा मिळतो.
  • कॉफीमुळे इम्युनिटी पावर वाढते
  • कॉफी कॅफेनमुळे मेंदुला चालना मिळते.
  • मधुमेहाचा धोका सुमारे 50 टक्के कमी होतो.
  • हृदयविकारासाठी फायदेशीर आहे. यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.
  • वजन कमी करण्यासही कॉफीचे सेवन फायदेशीर ठरते
  • कॉफीमध्ये असणाऱ्या विटामिन बी 3 मुळे कॉफी त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी असतो