खूप घोरणे ही धोक्याची घंटा

आरोग्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. कारण घोरण्यामुळे रक्तदाब, हार्ट अटॅक, थायरॉईड, मधुमेह असे अनेक आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे खूपच जास्त घोरत असाल, तर वेळीच सावध व्हा.

    आपल्या सभोवती अशा अनेक व्यक्ती असतात, ज्या खूप घोरतात. कदाचित आपणही त्यांच्यातलेच एक असतो. काही लोक मंद सुरात घोरतात, तर काही लोक इतके जोरजोरात घोरतात की दुसऱ्यांना त्यांच्या आवाजामुळे झोपच लागत नाही. मग अशा व्यक्तींसोबत एका खोलीत झोपायलाही त्यांच्या जवळची मंडळी तयार होत नाहीत. आपण घोरतो, याची घोरणाऱ्या व्यक्तींना प्रचंड लाज वाटत असते. चारचौघात ते खूप जास्त ऑकवर्डही होतात. पण या सगळ्या गोष्टी झोपेत असताना त्यांच्याकडून नाईलाजाने होऊन जातात.

    मग त्यावर काय इलाज करायचा हेच माहिती नसते. बऱ्याचदा असं होतं की घोरण्याचा आवाज जितका मोठा, तितकी त्या व्यक्तीला गाढ झोप लागली आहे, असं वाटतं. वरवर पाहता घोरणे हे खूपच साधे नॉर्मल वाटत असले तरी असे खूप मोठ्या आवाजात घोरणे तब्येतीसाठी अजिबातच चांगले नाही. आरोग्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. कारण घोरण्यामुळे रक्तदाब, हार्ट अटॅक, थायरॉईड, मधुमेह असे अनेक आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे खूपच जास्त घोरत असाल, तर वेळीच सावध व्हा.

    एखादी व्यक्ती घोरते म्हणजे ती व्यक्ती झोपेत असताना त्या व्यक्तीच्या नाका, तोंडावाटे जोरात वारंवार आवाज येतो. झोपेत हवेच्या हालचालीत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे असा आवाज यायला सुरूवात होते. घसा आणि नाकामध्ये जास्त टिश्यू असल्यास कंपनं निर्माण होतात. त्यामुळे घोरल्या जाते. शिवाय प्रत्येकाचे घोरण्याचे आवाज आणि पद्धती वेगवेगळ्या असतात. हे कधीकधी फारच गंमतशीर आणि हास्यास्पद वाटते. लठ्ठपणा हे घोरण्याचे एक प्रमुख कारण आहे. झोपेत घशाचे स्नायू सैल होतात आणि त्यातून हवेचा मार्ग बंद पडतो. त्यामुळे व्यक्ती घोरायला लागते. पोटाच्या आणि छातीच्या मध्ये असलेल्या पडद्याची व्यवस्थित हालचाल झाली नाही, तरी माणूस घोरायला लागतो.