
बऱ्याचदा आपण मुलांशी बोलत असतो, त्यांना हाका मारत असतो किंवा काहीतरी सांगत असतो पण मुलांकडून आपल्याला कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. हे तुमच्याही बाबतीत घडते का? असे का होत असेल बरे? हे कधी समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का? अशा वेळेस त्यांना दाटावले जाते किंवा त्यांच्यावर हात उचलला जातो जे अजिबात योग्य नाही. एक तर मुलं चुकीची वागत असतात त्यात तुम्ही त्यांना ओरडता किंवा मारता हे तुम्ही आणखी चुकीचे वागता.
त्याऐवजी तुम्ही त्यांच्याशी बोला. आपल्या मुलांना आपुलकीने प्रश्न विचारा. ते असे का वागत आहेत किंवा त्यांचे लक्ष कुठे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. सर्वात आधी मुलांना सांगा की तुम्ही त्यांच्यावर रागावले नाही. मुलं बकाय विचार करतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना हळूहळू बोलते करा. तुम्ही मुलांशी जितके कठोर वागाल तितकीच मुले मनाने तुमच्यापासून लांब जातील.
मागच्या भागात आम्ही तुम्हाला सांगितले की, जर तुमची मुले तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत नसतील किंवा तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतील तर त्यांच्यावर न ओरडता, न रागावता त्यांना प्रेमाने तसे वागण्याचे कारण विचारा. तुम्ही त्यांच्यावर रागावल्याचा आणि ओरडल्याचा त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुमचे असे वागणे हे तुमच्या मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले नसते.
यामुळे तुमची मुलं तुमच्यापासून मनाने दूर जाऊ शकतात. म्हणून तुमच्या मुलांशी प्रेमाने बोलून त्यांना काय वाटते, ते काय विचार करतात, काय आवडते, काय आवडत नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तसेच मुलांशी बोलताना नकारात्मक शब्दांचा वापर करू नका. त्यांना प्रत्येक गोष्टीत थांबवणे, नकार देणे बंद करा. कारण तुमच्या अशा वागण्याने मुलं मानसिकरित्या कमजोर होऊ शकतात. त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. म्हणून असे वागणे टाळा.
तुम्ही त्यांना सतत कोणत्याही गोष्टी करण्यासाठी थांबवल्याने त्यांच्या मनात भीती बसू शकते. ते कोणतेही काम करण्याआधी घाबरू शकतात. अशा वेळी ते तुमच्याकडे आपले मन मोकळे करणार नाहीत. म्हणून मुलांशी बोलताना योग्य आणि सकारात्मक शब्दांचा वापर करा. प्रत्येक काम करण्यासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्या. त्यांना थांबवू नका. ते चुकले तर त्यांना ओरडू नका. तर त्यांच्या चुकांतून ते शिकू शकतील अशाप्रकारे समजावून सांगा.