करिअरमध्ये बदल करताना ‘या’ गोष्टी ठेवा ध्यानात

करिअर एक फटक्यात बदलता येत नाही. आपल्या स्वभावानुसार आपण करिअर कोणत्या क्षेत्रात करू शकतो याचा विचार करा. कामाव्यतिरिक्त इतर शिक्षण, प्रशिक्षण आणि इतर कौशल शिकण्यावर सतत भर द्या. तुम्हाला उद्योग सुरू करायचा असल्यास योग्य ती आर्थिक तयारी करून ठेवा.

  जॉब करत असताना आपले काम अचानक नकोसे वाटू लागते. संस्थेबद्दलची आत्मीयता कमी होऊ लागते. कामात मन लागत नाही आणि काहीतरी वेगळे करावेसे वाटू लागते. कामातला रस निघून गेल्यावर मात्र आपली प्रगती खुंटते. काहीजण निव्वळ महिन्याच्या शेवटी पगार मिळतो, म्हणून कसेबसे दिवस ढकलतात. मग कधीतरी संस्थेमध्ये ‘कॉस्ट कटिंग’चे वारे वाहू लागतात.

  वरिष्ठांच्या नजरेत तुम्ही आलेले असतातच आणि मग अचानक कार्यसमाप्तीचे पत्र आपल्या हातात पडते. पुढे काय करावे याचा मोठा प्रश्न उभा राहतो. अशी परिस्थिती का आली याचा विचार न करता बरेचसे लोक संस्थेला दोष देऊन मोकळे होतात. कामातला रस निघून जातो, काम करण्याचा आनंद निघून जातो, तेव्हाच गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.

  कामातील रस जाण्याची कारणे…
  – कामात फारसे करण्यासारखे राहिले नाही.
  – पुढे काय करावे हे कळत नाही.
  – तुमचे कामातील पूर्ण शिक्षण थांबले आहे.
  – तुमच्या मनाप्रमाणे काम नाही.
  – तुमची आवड काहीतरी वेगळीच आहे.

  यावर उपाय
  १) नोकरी/जॉब सोडणे
  २) करिअर चेंज करणे

  नोकरी सोडताना
  नोकरी बदलल्यामुळे प्रश्न तात्पुरता सुटू शकेल. संस्था वेगळी, वेगळे लोक आणि काम करण्याची पद्धत शिकायला वेळ लागतो, पण नव्या नवलाईचे दिवस संपले, की परत तेच काम असल्यामुळे परत निराशा येऊ शकते. काम सारखेच असू असते. परत मध्यम वयात दुसऱ्या संस्थेत नोकरी मिळेल याची शाश्वती नाही.

  अशी करा तयारी

  योजना तयार करा

  करिअर एक फटक्यात बदलता येत नाही. आपल्या स्वभावानुसार आपण करिअर कोणत्या क्षेत्रात करू शकतो याचा विचार करा. कामाव्यतिरिक्त इतर शिक्षण, प्रशिक्षण आणि इतर कौशल शिकण्यावर सतत भर द्या. तुम्हाला उद्योग सुरू करायचा असल्यास योग्य ती आर्थिक तयारी करून ठेवा.

  व्यावहारिकपणे विचार करा
  नवीन करिअर करण्यासाठी आपली कौशल्ये आणि क्षमता योग्य आहेत का, याचा विचार करा.

  योग्य संधी शोधा
  भविष्यातील उपलब्ध असलेल्या नोकऱ्या शोधा. हे आपल्याला आपली दुसरी कारकीर्द सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याची कल्पना देईल.

  पगाराबाबत लवचिक राहा
  नवीन करिअर फील्ड सुरू करणे म्हणजे सहसा एन्ट्री-लेव्हल पगार. प्रथम लहान पावले उचला आणि त्यावर भविष्याची मांडणी करा. तुम्ही उद्योग करत असाल, तर सुरुवातीला खूप पैसे येतील असेही नव्हे. तुमचे दुसरे करिअर कोणतेही असू शकते. उद्योग अथवा नोकरी हा तुमचा निर्णय आहे. परंतु आयुष्यात किमान दोन तरी करिअर असावेत, या मताचा मी आहे.