चेहऱ्याला तूप लावल्याने होतात ‘हे’ गुणकारी फायदे, जाणून घ्या सविस्तर

जेवणामध्ये जसा तूपाचा वापर केला जातो असाच तुपाचा वापर तुम्ही त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी करू शकता. त्वचेला तूप लावल्याने अनेक गुणकारी फायदे होतात. चेहरा सुंदर आणि चमकदार करण्यासाठी आपण अनेकदा बाजारातील महागडे क्रिम वापरतो.

  जेवणामध्ये जसा तूपाचा वापर केला जातो असाच तुपाचा वापर तुम्ही त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी करू शकता. त्वचेला तूप लावल्याने अनेक गुणकारी फायदे होतात. चेहरा सुंदर आणि चमकदार करण्यासाठी आपण अनेकदा बाजारातील महागडे क्रिम वापरतो. यामुळे काहींना फायदा होतो तर अनेकांच्या त्वचेवर काळे डाग किंवा त्वचा खराब होऊ लागते.

  त्वचा सुंदर दिसण्यासाठी अनेक जण त्रासदायक ट्रिटमेंट करून घेतात. यामुळे तात्पुरता चेहरा सुंदर दिसतो. मात्र कालांतराने चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. यामुळे टीव्हीवर दिसणाऱ्या महागड्या क्रिम लावण्यापेक्षा तुम्ही तुपाचा वापर करून चेहरा सुंदर आणि मुलायम बनवू शकता. चेहऱ्याला तूप लावल्याने अनेक गुणकारी फायदे होतात. तुपाचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. मात्र तूप चेहऱ्याला कसे लावायचे, यामुळे चेहऱ्याला कोणते फायदे होतात चला तर जाणून घेऊया.

  तुपाचे फायदे:-

  प्रत्येक घरात तूप हे असतंच. तुपापासून अनेक पदार्थ बनवले जातात. यामध्ये ए, डी, ई आणि के जीवनसत्त्वे आढळून येतात. तसेच ओमेगा -३ फॅटी ऍसिड असते. यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात. तुपामध्ये आढळून येणाऱ्या अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला नुकसान करणारे मुक्त रॅडिकल्स काढून टाकतात.

  चेहऱ्याला तूप लावण्याची पहिली पद्धत:-

  चेहऱ्याला तूप लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर दोन ते तीन थेंब तूप घेऊन ते त्वचेला चोळून घ्या. बोटांनी डोळ्याखाली तूप लावा. यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळ कमी होतील. तुमची त्वचा जर जास्त कोरडी असेल तर तुम्ही चेहऱ्यावर रात्रभर तूप लावून ठेवू शकता. पण तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तुम्ही १० ते १५ मिनिट तूप लावून त्वचा धुवून घ्या.

  चेहऱ्याला तूप लावण्याची दुसरी पद्धत:-

  त्वचेला तूप लावण्यासोबत याचा वापर फेसपॅक बनवण्यासाठी देखील केला जातो. २ चमचे बेसनात एक चमचा तूप घालून त्यात दोन थेंब दूध घाला. हे सर्व मिश्रण नीट मिक्स करून घ्या. नंतर हा फेस पॅक १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि स्वच्छ पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर दिसणारे काळे डाग कमी होऊन त्वचा चांगली होईल.

  चेहऱ्याला तूप लावण्याची तिसरी पद्धत:-

  एका ताटात देशी तूप टाका आणि त्यात थोडेसे पाणी घालून बोटाने गोलाकार दिशेने फिरवून घ्या. ताटामध्ये तूप काही वेळ फिरवून झाल्यानंतर तूप घट्ट होईल आणि फुगलेली पेस्ट दिसेल. ही पेस्ट चेहऱ्यावर क्रीमप्रमाणे लावून घ्या. यामुळे त्वचा मुलायम होते आणि सुंदर दिसते. हे तुम्ही ओठांवर देखील लावू शकता. यामुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर होईल.