सोरायसिस लक्षणे आणि कारणे काय ते जाणून घ्या

    सोरायसिस (Psoriasis) हा एक असा त्वचाविकार आहे, जो तुम्हाला हात, पाय, पाठीवर अथवा केसांमध्ये जाणवतो. जरी याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसत असला तरी त्याचा गंभीर परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होत असतो. या रोगामध्ये त्वचापेशीची अतिरिक्त आणि जलद गतीने वाढ होते. ज्यामुळे त्वचेवर लालसर पापुद्रे निर्माण होतात. काहींच्या त्वचेवर यामुळे लालसर चट्टे निर्माण होतात. त्वचेला प्रंचड खाज येते. काही संधोशनात असं आढळलं आहे की, सोरायसिस हा संक्रमणातून होणारा आजार नसून तो तुमच्या प्रतिकार शक्तीमध्ये होणाऱ्या बदलातून निर्माण होतो. आपल्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाऊन नवीन पेशी निर्माण होण्यासाठी जवळजवळ 28 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र सोरायसिस झालेल्या लोकांमध्ये चार ते पाच दिवसांमध्ये नवीन पेशींची निर्मिती होते. ज्यामुळे त्वचेवर या नवीन त्वचापेशींचा थर जमा होऊ लागतो. पुढे त्याचे रूपांतर खाज, लालसरपणा, चट्टे यामध्ये होत जातं. सोरायसिस हा गंभीर त्वचा रोग असल्यामुळे याबाबत तुम्हाला आधीच सर्व काही माहीत असणं आवश्यक आहे.

    सोरायसिस लक्षणे

    सोरायसिस हा त्वचारोग होण्यामागची कारणं आणि त्याचे प्रकार वेगवेगळे असल्यामुळे तुम्हाला त्याची प्राथमिक लक्षणे आधीच माहीत असायला हवी. ज्यामुळे यावर लवकर निदान करणे शक्य होईल. यासाठी जाणून घ्या सोरायसिस लक्षणे

    त्वचेला खाज येणे (Itchiness)
    सोरायसिसचे लक्षण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे असू शकते. मात्र साधारणपणे सर्वांनाच या त्वचा विकारा मध्ये त्वचेवर भयंकर खाज येते. एवढंच नाही तर अती खाजवण्यामुळे त्वचेचे पापुद्रे निघतात आणि त्वचेवर सूज दिसू लागते.

    कोरडी आणि भेगाळलेली त्वचा (Cracked And Dry Skin)
    त्वचेवर नवीन होणाऱ्या त्वचापेशींचा थर जमा झाल्यामुळे त्वचेचं योग्य पोषण होत नाही आणि त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. काही जणांमध्ये त्वचेवर भेगा पडलेल्या दिसू लागतात तर काहींची त्वचा या रोगामध्ये कोरडी झाल्यामुळे तिचे पापुद्रे सुटू लागतात.

    स्काल्पमध्ये खाज (Scaly Scalp)
    सोरायसिस हा आजार केसांमध्येदेखील होत असल्यामुळे त्यामुळे तुमच्या स्काल्प लालसर होतो. केसांमध्ये लालसर आणि जाडसर चट्टे उठतात, केसांमध्ये कोंड्याप्रमाणे पांढरा पदार्थ तयार होतो. स्काल्प कोरडा झाल्यामुळे केसांचे नुकसान होते, केस भरपूर प्रमाणात गळू लागतात. त्वचेला प्रंचड खाज येते आणि दाह जाणवतो.

    त्वचेतून येणाऱ्या वेदना (Skin Pain)
    सोरायसिसमध्ये त्वचेला खूप खाज येते ज्यामुळे त्वचेमध्ये दाह निर्माण होतो आणि जळजळ जाणवते. सहाजिकच या दाह आणि वेदनेतून मुक्तता मिळावी असं रोग्याला वाटू लागतं. या त्वचारोगाने गंभीर रूप धारण करू नये यासाठी खाज आल्यावर त्वचा हाताने खाजवू नका.

    नखे ठिसूळ होतात (Pitted Nails)
    जर तुम्हाला नखांचा सोरायसिस झाला तर यामुळे तुमची नखे ठिसूळ होतात. नखांच्या वरील आवरण हे केरॅटिन सेल्समुळे कठीण असते. मात्र या रोगात तुमच्या या नखांच्या पेशींचे नुकसान होते आणि नखे ठिसूळ आणि भेगाळतात. नखांचा आकार, जाडसरपणा आणि रंग नेहमीपेक्षा वेगळा दिसू लागतो. नखं ठिसूळ झाल्याने पटकन तुटतात.

    सांधे दुखी (Joint Pain)
    सोरायसिस तीव्र झाल्यास त्यामुळे तुम्हाला सोरायटिक आर्थ्राटीसचा त्रास जाणवू शकतो. सोरायटिक आर्थ्राटीसमुळे तुमच्या सांध्यावर वाईट परिणाम होतो. तुमच्या एक अथवा दोन्ही बाजूचे सांधे यामुळे दुखावले जाऊ शकतात. यामुळे हाता-पायाच्या सांध्यामध्ये सूज आणि वेदना होतात. वेदनेची तीव्रता इतकी वाढत जाते की यामुळे तुम्हाला दैनंदिन कामे करणेही कठीण होते.

    सोरायसिसची कारणे (Psoriasis Causes)

    सोरायसिस होण्यामागची कारणे प्रत्येक व्यक्तामागे वेगवेगळी असतात. त्यामुळे सोरायसिस होण्यामागचं नेमकं कारण कुणीच सांगू शकत नाही. मात्र ही काही कारणं आहेत ज्यामुळे सोरायसिस होऊ शकतो.

    अनुवंशिकता (Hereditary)
    काही संशोधनात असं आढळलं आहे की जर एखाद्याच्या आई-वडीलांना, आजी-आजोबांना अथवा भावंडांना सोरायसिस झाला असेल तर त्या व्यक्तीला सोरायसिस होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत जास्त असतो. यामागे त्यांच्यातील अनुवंशिकता कारणीभूत असू शकते. जरी तुमच्यामध्ये अनुवंशिक गुण असले तरी वातावरणातील बदलामुळेच हे गुणधर्म कार्यान्वित होतात. त्यामुळे जोपर्यंत वातावरणात असे बदल होत नाहीत तो पर्यंत सोरायसिस त्या व्यक्तीमध्ये सहज विकसित होत नाही.