रोजच्या जेवणात बनवली जाणारी चपाती पांढऱ्या रंगाची कशी बनवायची, जाणून घ्या सोप्या ट्रीक

जेवणाच्या थाळीमध्ये प्रत्येक ठिकाणी चपातीचा समावेश केला. गव्हापासून बनवली जाणारी चपाती आरोग्यासाठी हेल्दी आहे.

    भारतीय जेवणाच्या पदार्थांमध्ये चपाती हा अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे. जेवणात चपाती किंवा भाकरी नसेल तर जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे रोजच्या रोज घरी जेवणात सकाळ आणि संध्याकाळी चपाती बनवली जाते. दळलेल्या गव्हापासून चपाती हा पदार्थ बनवला जातो. गहू दळल्यानंतर त्याचे पिठामध्ये रूपांतर होते. पीठ मळण्यासाठी पाणी किंवा तेलाचा वापर करून कणिक भिजवली जाते. त्यानंतर तिचे छोटे छोटे गोळे तयार करून चपाती बनवली जाते.जेवणाच्या प्रत्येक थाळीमध्ये चपाती ही असतेच. पण प्रत्येक घरात बनवली जाणारी चपाती ही वेगळी असते. काहीजण मोठी चपाती बनवतात ते तर काही छोटी. अनेक घरांमध्ये बनवल्या जाणाऱ्या चपात्या या पांढऱ्या शुभ्र असतात. पांढऱ्या शुभ्र चपात्यांचे नेहमीच कौतुक केले जाते. तुम्हालासुद्धा वाटत का तुमच्या चपातीचे देखील कौतुक केले पाहिजे तर या टिप्स नक्की ट्राय करून पाहा.

    पीठ मळताना या गोष्टी वापर:

    चपात्या पांढऱ्या शुभ्र होण्यासाठी कणिक मळत असताना त्यामध्ये गव्हाचे पीठ, मैदा, तेल, चवीनुसार मीठ घालून घ्यावे. त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून कणिक मऊसर मळून घ्या. नंतर त्याला तेल लावून ठेवा. १५ ते २० मिनिटं तेल लावून ठेवल्यानंतर त्याचे छोटे गोळे करून चपात्या बनवून घ्या. गव्हाच्या पिठामध्ये मैद्याचा वापर केल्याने चपाती पांढरी दिसू लागते.

    पांढरी शुभ्र चपाती बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांडयात एक वाटी गव्हाचे पीठ चाळून घ्या. त्यानंतर त्यात अर्धा वाटी मैदा टाका. मैदासुद्धा चाळणीने चाळून घ्यावा. नंतर दोन्ही पीठ मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यावर त्यात तेल टाकून सर्व पीठ मिक्स करून घ्या. नंतर पीठामध्ये चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी टाकून पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर तेल लावून बाजूला ठेवा. १० ते १५ मिनिट झाल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित पीठ मळून चपाती करण्यासाठी गोळे तयार करा.

    छोट्या छोट्या गोळ्यांची चपाती लाटून त्या व्यवस्थित भाजून घ्या. चपाती भाजत असताना ती सारखी सारखी फिरवू नये. यामुळे चपाती कडक होण्याची शक्यता असते. दोन्ही बाजूने चपाती भाजून झाल्यावर तेल लावून चपातीच्या डब्यामध्ये ठेवा. पीठ मळत असताना पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा देखील वापर करू शकता. यामुळे चपाती पांढरी शुभ्र दिसेल.