विकेंड बनवा खास, घरी बनवा पनीर स्टफ्ड चिला, नोट करा रेसिपी

विकेंड बनवा खास घरी बनवा स्टुफ्ड पनीर चिला. हा चिला आरोग्यसाठी फार पौष्टिक आहे तसेच हा घरी अगदी सहज आणि कमी वेळेत बनवला जातो.

  विकेंड असला की, काही तरी स्पेशल चमचमीत खाण्याची इच्छा होत असते. अशा वेळी मुख्यतः सकाळी नाश्त्याला काय खास पदार्थ बनवायचा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो, पण विकेंड आणि मेहनत यांचाही काही मेळ बसत नाही. बऱ्याचदा चटपटीत खायचे तर असते मात्र कंटाळाही आलेला असतो, अशावेळी जितकी होईल तितकी मेहनत कमी लागावी असे वाटते. याचसाठी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास विकेंड स्पेशल रेसिपी. या रेसिपीचे नाव आहे ‘पनीर स्टफ्ड चिला’. हा चिला तुम्ही घरी अगदी सहज आणि कमी वेळेत बनवू शकता. हा चिला बनवण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घेण्याची गरज नाही. तसेच हा चिला चवीला फारच उत्कृष्ट लागतो.

  पनीर स्टफ्ड चिल्याचे फायदे

  पनीर आरोग्यासाठी फायदेकारक ठरते. यात पोटॅशियम, सेलेनियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक इत्यादी अनेक पोषक घटक असतात. याचबरोबर यात व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळली जातात. हाडे मजबूत करण्यासाठीही पनीरचा वापर केला जाऊ शकतो. पनीर चिला हा फायबरयुक्त असतो यात प्रथिने आणि कर्बोदके असतात जी आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. चला तर पाहुयात पनीर चिला बनवण्यासाठीचे साहित्य आणि कृती.

  साहित्य:

  • बेसन
  • रवा
  • दही
  • पनीर
  • गाजर
  • शिमला मिर्ची
  • टोमॅटो
  • मक्याचे दाणे
  • कांदा पात
  • कोथिंबीर

  कृती:

  • पनीर चिला बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीर किसून घ्या आणि त्यात बारीक चिरलेला गाजर, शिमला मिर्ची, मक्याचे दाणे, कांद्याची पात, टोमॅटो, कोथिंबीर असे सर्वकाही टाकून त्यांना नीट एकजीव करून घ्या. आता तुमचा चिला बनवण्यासाठीचे सारण तयार आहे
  • चिला बनवण्यासाठी एका बाउल मध्ये बेसन, रवा आणि दही घेऊन सर्व एकत्र करून घ्या. हे सर्व नीट एकत्र केल्यानंतर अर्धा तास या मिश्रणाला बाजूला ठेवून द्या
  • आता अर्ध्या तासानंतर गॅसवर पॅन ठेवा, त्यावर तेल पसरावा आणि पॅन हलका गरम झाला की त्यावर तयार मिश्रणाने गोलाकार चिला बनवा
  • यानंतर चिल्यावर तयार पनीरचे सारण टाका आणि चिला चांगला खरपूस शिजवून घ्या. लक्षात ठेवा चिला हा कधीही हाय फ्लेमवर न शिजवता, मध्यम किंवा लो फ्लेमवर शिजवून घ्या. असे केल्याने तुमचा चिला चांगला शिजला जाईल
  • चिला छान खरपूस झाला की त्याला प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याला खाण्यासाठी सर्व्ह करा. तुमचा गरमा गरम चिला तुम्ही ग्रीन चटणी अथवा सॉससोबतही खाण्यासाठी सर्व्ह करा करू शकता