चटकदार गावराण झुणका रेसिपी नक्की ट्राय करा!

  साहित्य :

  • १ वाटी बेसन पीठ
  • २ ते ३ मोठा चमचा तेल
  • ८ ते ९ लसून पाकळ्या ( चेचलेल्या )
  • ५ ते ६ कडीपत्ता पाने
  • दिड वाटी पाणी
  • दीड चमचा लाल मिरची पावडर किंवा १ चमचा टेचलेली हिरवी मिरची
  • १/२ चमचा मोहरी
  • एक चिमुटभर हिंग
  • साखर ( चवीनुसार )
  • मीठ ( चवीनुसार )
  • कोथिंबीर ( आवश्यकतेनुसार )

  कृती :

  सर्वप्रथम एक कढई घ्या आणि ती मध्यम आचेवर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये २ मोठे चमचे तेल घाला आणि तेल गरम होऊ द्या. तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी टाका आणि ती चांगली तडतडू द्या आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच कडीपत्ता आणि लसून घाला आणि तो चांगला भाजून घ्या.

  लसून चांगला भाजला की त्यामध्ये हिंग, हळद आणि लाल मिरची पावडर घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि आता त्यामध्ये पाणी घाला आणि ते उकळेपर्यंत वाट पहा. त्या फोडणीच्या पाण्यामध्ये थोडी साखर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा आणि ते चांगले एकत्र करून फोडणीच्या पाण्याला उकळी येवू द्या.

  पाण्याला उकळी आली कि त्यामध्ये एक हाताने पीठ टाका आणि एका हाताने ते चांगले मिक्स करा. पीठ टाकते वेळी पिठाची गुठळी होणार नाही याची काळजी घ्या. पीठ चांगले हलवून ते गुसळून घ्या आणि ते जोपर्यंत हलवा की त्याचा गोळा चांगला एकत्र होणार नाही. पिठाचा गोळा झाला कि त्याच्यावर झाकण ठेवून त्याला एक वाफ येवू द्या. चांगली वाफ आली कि गॅस बंद करा आणि तो चमच्याने सुट्टा करून घ्या आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून मिक्स करा आणि भाकरी किंवा चपाती सोबत सर्व्ह करा.