अडचणींना करा ‘ओव्हरटेक’

जीवन जगत असताना आलेल्या अडचणींना दूर करण्यापेक्षा त्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे आपण लोकांनाही दुर्लक्षित करायला लागतो.

एखादी अडचण आपल्याला आली की आपण कुणाला तरी ते सांगतो आणि कुणीतरी त्यावर उत्तर देते. ते उत्तर ऐकल्यावर आपण तेवढ्यापुरते खुश होतो. पण नेमकी अडचण काय होती याकडे लक्ष देत नाही. जीवन जगत असताना आलेल्या अडचणींना दूर करण्यापेक्षा त्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे आपण लोकांनाही दुर्लक्षित करायला लागतो. घरात जर कुणाशी भांडण झाले असेल तर घरातील लोकांना टाळण्यासाठी उशिरापर्यंत ऑॅफिसेसमध्ये काम करतो. एकटे राहायला लागतो. एक खोटे लपविण्यासाठी दुसरे खोटे बोलायला लागतो. हेवेदावे, जास्त पझेसिव्ह होणे, यात आपण इतके गुरफटलो जातो की आपण स्वत:लाही विसरून जातो आणि हेही विसरून जातो की, आपल्याला नेमके काय हवे आहे. यामुळे आपले सर्वस्व गमावून बसतो. समोर आलेल्या अडचणींना अव्हॉईड करतो, पण त्या दूर करण्याचा प्रयत्न करत नाही. पाहिजे तर सगळेच पाहिजे नाही तर काहीच नको, अशी आपली मानसिकता होऊन बसते. अनावश्यक विचारांमुळे आयुष्य कठीण करतो

पर्सनली घेऊ नका
अनेकदा तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांच्या वागण्यावर नकारात्मक विचार करायला लागता. एखाद्या वेळी जर तुमचा सहकारी तुम्हाला न सांगता बाहेर जेवायला गेला तर त्यात तुम्हाला राग येण्याचे काहीच कारण नाही. कुणाचे असे करणे तुम्ही वैयक्तिकरित्या घेता. कोणत्याही गोष्टी पर्सनली घेऊ नका. तुम्ही प्रत्येक दिवशी ज्या लोकांना भेटता त्यात चांगल्या गोष्टी बघा.

चुकांवर अडून बसणे
तुम्ही तुमच्याकडून झालेल्या चुकांबद्दल स्वत:ला क्षमा करणे खूप आवश्यक आहे. तुम्ही तुमच्याकडून घडलेल्या चुकांमधून शिकायला हवे आणि त्या चुका पुन्हा घडू नये, याची काळजी घेत पुढे जायला हवे. बरेचदा तुम्ही केलेल्या मेहनतीने तुम्हाला खूप मोठ्या गोष्टी मिळतात, पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, तुम्ही त्यातून काय शिकलात.

इतरांना प्रोत्साहन द्या
आपल्याला अनेक कारणांनी टेन्शन, त्रास, अपयशाला सामोरे जावे लागते. हे टेन्शन, त्रास घालवण्यासाठी एक चांगला उपाय आहे. तो म्हणजे इतरांसाठी चांगले करायला शिका. स्वयंसेवक व्हा. आयुष्यात व्यस्त राहा. यासाठी खूप वेळ, खूप मोठे असे काही करण्याची गरज नाही. एखाद्याला एखादा प्रेमाचा शब्दच अपुरा आहे. आजूबाजूला असलेल्या लोकांना प्रोत्साहन द्या. जे लोक जीवनात एकटे आहेत, त्यांना भेट द्या. या जगात दोन प्रकारची लोक आहेत. एक देणारी आणि दुसरी घेणारी. देणारी लोक आनंदी आहेत. पण घेणारी आनंदी नाहीत. कारण त्यांना देण्यात काय आनंद असतो, हे माहितीच नाही.

टीकाकारांना जीवनात जागा
तुमच्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. ज्यात अनेक लोक हे तुमच्या सुंदर आयुष्यात विष घालणारी किंवा तुमच्याविषयी वाईट चिंतणारी वा तुमचे स्पर्धकही असतात. असे लोक तुमच्या आयुष्यात असतील तर उगाच त्याचे टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही. नातेवाईक, मित्र, प्रेयसी, सहकारी मग यातील ते कुणीही असोत. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जज करणाऱ्या, टीका करणाऱ्या किंवा तुम्हाला कमी लेखणाऱ्या लोकांसाठी जागा ठेवा. कारण अशा लोकांमुळे तुम्ही तुमच्यातील चांगल्या गोष्टी बाहेर काढू शकता. तुमच्यावर टीका करणारे लोक जर तुमच्याजवळ असतील तरच तुम्हाला स्वत:ला आणखी चांगले करता येते.

सर्वस्व मिळवण्याचा हव्यास
जगात पूर्णपणे यश आणि पूर्णपणे अपयश अशी काही संकल्पनाच अस्तित्वात नाही. अशा प्रकारचे विचार तुमच्या मनावर खूप मोठा आघात करत असतात. हवे तर पूर्णच हवे नाही तर नको, अशी तुमची मानसिकता होऊन बसलेली असते. जी तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे.