ऑफिसमध्ये संघर्षाचा सामना करताना ‘या’ गोष्टी ठेवा कायम लक्षात

समोरचा कसाही वागला-बोलला तरीही तुम्ही ऑफिसमध्ये आहात, हे विसरू नका. शांत, प्रोफेशनल राहिल्याने तुमचीच बाजू वरचढ राहील.

बॉस किंवा सहकारी यांच्याबरोबर तुमचा संघर्ष होत असेल, तर त्याचा परिणाम स्ट्रेस येण्यावर आणि एकूणच परफॉर्मन्सवर होतो. संघर्षाला तोंड देणे आणि त्यातला एक घटक असणे त्रासदायक आहेच; पण त्याला कसे तोंड द्यायचे हे समजावून घेतले, तर संघर्षांना तोंड देणे सोपे होऊ शकते.

बी रिस्पेक्टफुल : समोरचा कसाही वागला-बोलला तरीही तुम्ही ऑफिसमध्ये आहात, हे विसरू नका. शांत, प्रोफेशनल राहिल्याने तुमचीच बाजू वरचढ राहील. कॉन्फिडन्स आणि सुसंस्कृतपणे वागणे फायद्याचे ठरते. केवळ नकारात्मक आणि तक्रारीची भूमिका न घेता परिस्थितीत कसा बदलाव घडवता येईल, याकडे लक्ष द्या.

स्वतःच्या वागण्याकडे डोळसपणे पाहा : वादाचे कारण आपले स्वतःचेच ऑफिसमधील वागणे तर नाही ना? कामाला उशीर होणे, टीममध्ये कामाची योग्य जबाबदारी पार न पाडणे, जास्त वेळेचा लंचअवर घेणे यामुळेसुद्धा वाद निर्माण होऊ शकतात. तेव्हा स्वतःच्या वागण्याकडे त्रयस्थपणे पाहायला शिका. बॉसने टीका केली, तर ती पर्सनली न घेता आपल्या कामात आपण कशी सुधारणा करू शकतो, हे पाहा. अनेकदा बॉस कामाबद्दल बोलला, तर ते बोलणे तुमच्याबद्दल नसून या कामाबद्दल असते हे विसरू नका.

संघर्ष सोडवण्याची भूमिका : एखादा संघर्ष सोडवताना केवळ वादाचा मुद्दा आणि तुमचे फ्रस्ट्रेशन न दर्शवण्याचे शक्यतो टाळा. त्याऐवजी कोणत्या कारणामुळे वाद, संघर्ष निर्माण झाला आहे आणि ती परिस्थिती कशी सुधारता येईल, हे पाहा. वादावर कोणते उपाय निघू शकतात याकडे जास्त लक्ष दिलेत आणि त्या उपायांची चर्चा सहका-यांशी केलीत, तर त्यांचाही मदत करण्याचा, इन्व्हॉल्व होण्याकडे कल होईल.

निगोसिएशनची तयारी : कोणताही संघर्ष संवादानेच कमी होतो. काही वेळा दोन्ही पार्टीची कॉम्प्रमाईजची तयार असेल, तर लवकर पर्याय निघू शकतो. तुम्ही कोणत्या गोष्टीवर तडजोड करायला तयार आहात आणि कोणत्या गोष्टींवर ठाम आहात, हे स्वतःशी ठरवा आणि मगच संवादाला सुरुवात करा. बोलणी करतानाही फ्लेक्सिबल राहण्याचा प्रयत्न करा आणि दोघांनाही पटेल, अशा निर्णयावर येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा.

माघारीची तयारी ठेवा : अनेकदा आपण वादात योग्य न्याय मिळावा म्हणून वाद चालूच ठेवतो. कारण, माघार घेणे म्हणजे पराभव अशी समजूत असल्याने आणि आपला इगो मध्ये येत असल्याने मनाची माघारीची तयारी नसते.तेव्हा माघार घ्यायची तयारी ठेवा.

कंपनीची पॉलिसी समजावून घ्या : तुमच्या ऑफिसची संघर्षाबद्दलची पॉलिसी काय आहे, त्यासाठी काय करायला हवे, हे ‘एचआर’ विभागाकडून समजावून घ्या. कारण, वाद कोणाशी आहे, यावर तो सोडवण्याकरीता कोण इन्व्हॉल्व होतो, हे बदलत जाते.