Choose your life relationships carefully

कुढल्याही नात्याची भिंत ही विश्वासावर उभी असते. इथे आपण एकतर विश्वास मिळवितो अन्यथा तो पूर्णंतः कोलमडून पडतो. मग, कोलमडून पडण्यापेक्षा चाचपडून पाहणं कधीही योग्यच नाही का?

    माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे त्याच्या सभोवताल नेहमीच पुष्कळ माणसांची लगबग असते. यातील काही माणसे आपल्या आवडीची असतात तर काही नावडती. परंतु, आपण आवडीच्या आणि नावडीच्या दोन्ही माणसांबद्दल आपण आपल एक मत तयार करीत असतो. आपल्या समोर एखादी व्यक्ती आली की, त्या व्यक्तीच्या तोंडातून एखादा शब्द बाहेर पडण्याआधीच आपण त्या व्यक्तीच्या बाह्य पेहरावावरून त्याच्याबाबतीत आपल मत ठरावीत असतो. परंतु, ते मत नेहमीच बरोबर असत अस नाही. कित्येकदा आपण जेव्हा त्या व्यक्तीला जवळून ओळखतो तेव्हा ती व्यक्ती आपणास कळायला लागते. परंतु, मानवी मन फारच चंचल आहे. त्या चंचल मनाच्या जोरावर आपण सर्व निर्णय घेत असतो. त्या व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या स्वभावाच्या बाबतीत निर्णय घेऊन मोकळे होतो. पर्यायाने कधी कधी हा निर्णय चुकतो आणि आपणास पश्चाताप होतो. त्यामुळे, कुणालाही  लगेच  ‘जज्ड’ करणे योग्य नव्हे.  
    पाहता क्षणी एखाद्याच्या बाबतीत मत बनविणे हा मानवी स्वभाव आहे. परंतु, एकदा बनविलेल मत कायमस्वरूपी रेटत राहणे हे फारच चुकीचे ठरते. कधी कधी व्यक्तीच्या पेहरावावरून, हालचालींवरून आपल्याला त्या व्यक्तीबद्दल चुकीचा ग्रह होऊ  शकतो. वास्तविक पाहता ती व्यक्ती तशी नसेलच कदाचित. आपण जोपर्यंत त्या व्यक्तीच्या सहवासात येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या बाबतीत कायमस्वरूपी मत बनविणे योग्य नव्हे. याच मतावरून आपला त्याच्यावरील विश्वास ठरतो. जो आपल्या पुढच्या नात्यांचा आधार बनणार असतो.
    आजकाल आपण सर्व खूपच सोशल नेटवर्कींग साईटवरून एकमेकांना भेटतो. चॅटव्दारे एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांविषयी ‘मत’ तयार होत. एकमेकांकडे आकर्षित होतो. पण, काय नेहमी समोरची व्यक्ती आपल्याला हवी तशीच असते ? हा मोठा प्रश्न आहे. डोळ्यांच्या पडद्याआळ समोरची व्यक्ती त्याला हव तस स्वतःला प्रेझेंट (प्रस्तुत) करू शकते. आपणास त्याची भूलन पडून, आपण फसल्या जातो. आपले असलेले समज गैरसमजात बदलतात व आपल्या भावनांची खिल्ली उडविली जाते. हे सगळ फक्त यामुळे होत की, आपण पुढच्या व्यक्तीच्या बाबतीत लगेच मत तयार करून मोकळे होतो. एखाद्या व्यक्तीला ‘जज्ड’ करण्याआधी आपण त्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती घेण फारच आवश्यक आहे. अथवा, आपण त्या व्यक्तीच्या सहवासात राहून त्या व्यक्तीस ओळखण्याचा प्रयत्न करायला हवा. कुढल्याही नात्याची भिंत ही विश्वासावर उभी असते. इथे आपण एकतर विश्वास मिळवितो अन्यथा तो पूर्णंतः कोलमडून पडतो. मग, कोलमडून पडण्यापेक्षा चाचपडून पाहणं कधीही योग्यच नाही का?
    इथे मुळ मुद्दा हाच आहे की, आपण पाहताक्षणी आपल मत तयार करू नये. त्या व्यक्तीस लगेच ‘जज्ड’ करण्याचा प्रयत्न करू नये. कारण कधी कधी डोळ्यांनी पाहिलेल्या, कानांनी ऐकलेल्या गोष्टीही विश्वासार्ह नसतात. तिथेही आपणास भ्रम होतो. म्हणूनच, मित्रांनो आपल्या आयुष्यातील महत्वाची  नाती निवडतांना चूक होता कामा नये. ही चूक आपणांस आयुष्यभरासाठी महागात पडू शकते. याच सगळ्यांचा विचार करून समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत आपल मत तयार करा. आणि आपल्या आयुष्यात योग्य नात्यांची निवड करा.