आयटी क्षेत्रातील पती-पत्नींमधील विसंवादात वृद्धी; उच्चशिक्षित दाम्पत्याच्या तक्रारीत वाढ

तू मला जेवण वाढले नाही, हातात चहा दिला नाही, वेळेवर नाश्ता दिला नसल्याचे कारण देत आयटीतील पतीकडून पत्नीला दुय्यम ठरविले जात आहे.

दिल्ली. मुलींच्या शिक्षणानंतर तिला आयटी क्षेत्रातील जोडीदार शोधण्यासाठी पालकांकडून भर दिला जात आहे. प्रत्यक्षात मात्र, दोघेही उच्चशिक्षित असल्यामुळे किरकोळ कारणांमुळे एकमेकांचा अहंभाव दुखावला जात आहे. तू मला जेवण वाढले नाही, हातात चहा दिला नाही, वेळेवर नाश्ता दिला नसल्याचे कारण देत आयटीतील पतीकडून पत्नीला दुय्यम ठरविले जात आहे. तर पत्नीकडूनही नवऱ्याला तुझ्याएवढे काम मी पण करते, पगार मी पण कमविते, आपण जबाबदारी वाटून घेतली पाहिजे असे म्हणत खिल्ली उडविली जात आहे. त्यामुळे उच्चशिक्षित आयटी क्षेत्रातील दाम्पत्याच्या कुरबुरी आणि तक्रारी भरोसा सेलकडे वाढल्या आहेत.नात्याकडे दुर्लक्ष

उच्चशिक्षित असल्यामुळे पती-पत्नीकडून नोकरी करण्यावर भर दिला जातो. मात्र, कंपनीचे टारगेट, वेळेची बंधनामुळे नात्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्यातील सुसंवादाची दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एकमेकांना वेळ देता येत नसल्यामुळे आयटीतील दाम्पत्याचा तक्रारीचा सूर वाढला आहे. पत्नीने बनविलेल्या नाश्त्यापासून जेवणापर्यंतच्या किरकोळ तक्रारी भरोसा सेलकडे करण्यात येत आहेत.

आम्ही संसारच करू शकत नाही
आम्ही संसार करूच शकत नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. आयुष्यभर साथ देण्यासाठी सात फेरे घेतलेल्या दाम्पत्याकडून सात महिन्यांपर्यंतही संसार केला जात नसल्याचे तक्रारींवरून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांश दाम्पत्याचा प्रेमविवाह झाला आहे. त्यानंतरही मला असला नवरा नको गं बाई असे म्हणत पत्नीकडून तक्रार केली जात आहे. मात्र, आलेल्या तक्रारींचा अभ्यास करून भरोसा सेलकडून दाम्पत्याचे समुपदेशन करून समझोता केला जात आहे.