तरुण पिढीचा लग्नातला रस संपला; अभ्यासात धक्कादायक माहिती समोर

गेल्या काही काळात महिलांच्या शिक्षणात आणि सक्षमीकरणात मोठा बदल झाला आहे. आता महिना वेगाने पुढे जात आहेत. अशा स्थितीत आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असलेला जीवनसाथी निवडण्यावर त्यांचा भर आहे. मात्र या स्पर्धेत अनेक पुरुष निरनिराळ्या कारणांनी मागे पडताना दिसत आहेत.

   ४२ टक्के तरुणांची अविवाहित राहण्यास पसंती

  नवी दिल्ली – भारतात प्रतिताशी २७ हजार लग्न होतात, दर महिन्याला ही आकडेवारी लाखांत तर वर्षाचा विचार केला तर एक कोटींहून अधिक आहे. विवाहसंस्था ही परिवाराचा पाया मानला जातो, मात्र हळूहळू हा पायाच ढासलू लागला आहे की काय, अशी स्थिती निर्माण होते आहे.

  अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासानुसार जगभरात तरुणाई लग्नाच्या बंधनात अडकण्यास कुचराई करण्याच्या मनस्थितीत दिसते आहे. महिलांपेक्षाही जास्त संख्येने पुरुष हे अविवाहित राहू इच्छित आहेत.

  अमेरिकेत इतके पुरुष अविवाहित

  पेव रिसर्चने २०१९ च्या अमेरिकन कम्युनिटी सर्वेच्या आधारे हा दावा केला आहे की, अमेरिकेतील बहुतांश पुरुष लग्नच करु इच्छित नाहीत. अमेरिकेत सद्यस्थितीत २५ ते ५४ वयोगटातील ३८ टक्के पुरुष असे आहेत की ज्यांनी लग्नच केले नाही आणि लग्न करण्याची त्यांची इच्छाही नाही. यात ४० ते ५४ वयोगटातील २० टक्के पुरुष असे आहेत की जे अविवाहित आहेत, आणि आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहेत. या ३८ टक्के आकडेवारीची तुलना २००० सालासोबत केली, तर अविवाहीत तरुणांची संख्या ही २९ टक्के होती. गेल्या ३० वर्षांत अविवाहित असलेल्या पुरुषांची संख्या अविवाहित स्त्रियांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचेही समोर आले आहे.

  भारतात ४२ टक्के तरुण लग्न करु इच्छित नाहीत
  २०२० साली असाच एक सर्वे देशातही जाला होता, त्यात २६ ते ४० वयोगटातील ४२ टक्के तरुणांनी लग्न करण्याची आणि मुलं जन्माला घालण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं आहे. भारतात असा विचार करणाऱ्या महिला आणि पुरुषांची संख्या सारखीच आहे.

  आर्थिक परिस्थिती हे लग्न नाकारण्याचे कारण
  जगभरातील तरुण वर्गाचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, असे आपल्याला वाटत असेल, तर तसे नाहीये. लग्न नाकारण्यामागे सर्वाधिक मोठे कारण हे आर्थिक परिस्थिती हे आहे. अमेरिकेत अविवाहित राहणाऱ्यांमध्ये कमी शिक्षण झालेले आणि कमी उत्पन्न असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. चांगली नोकरी आणि चांगले आर्थिक उत्पन्न असणारे तरुणच लग्न करण्याची मनिषा बाळगून आहेत.

  हीच स्थिती भारतातही आहे. प्रतिमहिना १० हजारांहून कमी उत्पन्न असलेले ३९ टक्के तरुण लग्न करु इच्छित नाहीत. तर ज्यांचे मासिक उत्पन्न ६० हजारांहून अधिक आहे, त्यातील २१ टक्के तरुण अविवाहितच राहू इच्छितात. कमी आर्थिक उत्पन्न असल्याने, लग्न नाकारणाऱ्या पुरुषांची संख्या देशात महिलांपेक्षा जास्त आहे.

  लग्नाचे बंधन नकोसे
  अमेरिकेसह पाश्चात्य जगातील समाजात जो बदल होतो आहे, त्याचे परिणाम अनेक वर्षांनी भारतासारख्या देशातही पाहायला मिळतो आहे, हे विशेष. देशात भलरेही वर्षाला काही कोटी जण लग्नबंधनात अडकत असले, तरी हळूहळू अनेक जण लग्नगाठीत अडकून पडण्याला राजी होत नसल्याचे दिसतायेत, किंवा ताक फुंकून पिण्याचा तरी त्यांचा प्रयत्न आहे. ज्या समाजाचा पायाच विवाहसंस्था होता, तो पायाच हळूहळू बदलतो आहे की काय, अशी शंका या निमित्ताने निर्माण होऊ लागली आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीतून विभक्त कुटुंब पद्धती आणि त्यानंतर आता सिंगल पॅरेंट संस्कृतीकडे हा प्रवास सुरु झाला आहे.

  गेल्या काही काळात महिलांच्या शिक्षणात आणि सक्षमीकरणात मोठा बदल झाला आहे. आता महिना वेगाने पुढे जात आहेत. अशा स्थितीत आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असलेला जीवनसाथी निवडण्यावर त्यांचा भर आहे. मात्र या स्पर्धेत अनेक पुरुष निरनिराळ्या कारणांनी मागे पडताना दिसत आहेत. सात जन्मजन्मांतरीचं हे नातं आता महिला आणि पुरुषांनाही एक पिंजरा वाटू लागलं आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.