नात्यातील ‘या’ गोष्टी ठरतात डोकेदुखी

नातं एका बाजूने टिकत नाही त्यामुळे एकाने सुखी व आनंदी नात्यासाठी कितीही जीवापाड प्रयत्न करुदेत जोपर्यंत दुसरा त्याला साथ देत नाही तोपर्यंत परिस्थिती बिघडलेलीच राहू शकते.

नातं ( relationship) कमजोर ( unhealthy) झाल्यावर किंवा तुटण्यापर्यंत गेल्यावर मोठ्या मोठ्या गोष्टींवर चर्चाविमर्श होते पण खरंतर सत्य हे असतं की काही छोट्या छोट्या कारणांमुळेच नात्यात नकारात्मकता येऊ लागते. याच छोट्या छोट्या गोष्टी पुढे जाऊन मोठ रुप धारण करतात व नातं तुटण्याच्या मार्गावर घेऊन जातात. जरी या गोष्टींमुळे नातं तुटले नाही किंवा जोडप्याने वेगळा होण्याचा निर्णय नाही घेतला तरी या गोष्टी एकप्रकारे डोकेदुखी बनून राहतात, ज्यामुळे प्रेम दिवसेंदिवस कमी होत जाते.

नातं एका बाजूने टिकत नाही त्यामुळे एकाने सुखी व आनंदी नात्यासाठी कितीही जीवापाड प्रयत्न करुदेत जोपर्यंत दुसरा त्याला साथ देत नाही तोपर्यंत परिस्थिती बिघडलेलीच राहू शकते. प्रेम दिसते तितके निभावणे सोपे नक्कीच नसते. एकदा त्या फिलींगमध्ये अडकलं तर वाद झाल्यावर धड नात्यातून बाहेरही पडू शकत नाही आणि नात्यात आनंदाने राहूही शकत नाही. म्हणून अशा गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात ज्या नात्यातील डोकेदुखी ठरतात.

जोडीदाराचे डॉमिनेटींग असणे

कोणतेही नातं तेव्हाच हेल्दी बनू शकते जेव्हा त्यात प्रत्येक गोष्टीमध्ये समानता असेल. कोणी एकजण दुस-या व्यक्तीवर हावी होऊ लागला तर आनंदी नात्याचा समतोल बिघडू शकतो. यासोबतच नातं कमजोर होऊ लागतं. डॉमिनेटींग लोक आपल्या जोडीदाराच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट आपल्या मर्जीप्रमाणे करुन घेऊ लागतात. त्यामुळे जोडीदाराला असं वाटू लागतं की त्याला कोणीतरी पिंज-यात कैद केलंय किंवा त्याचा श्वास त्या नात्यात कोंडू लागतो.

पैसे खर्च करण्यावर कंट्रोल नसणे

नात्याशी निगडीत प्रॅक्टिल प्रॉब्लेम्स मध्ये मनी फॅक्टर सर्वात वर आहे. मनी मॅनेजमेंट करताना पैसे खर्च करण्यावर कंट्रोल ठेवणे अत्यंत गरजेचे असते. जोडप्यापैकी कोणा एका व्यक्तीचे अति प्रमाणात पैसे खर्च करणे, काटकसर करण्याची सवय नसणे, उधारी घेण्याची वाईट सवय असणं अशा गोष्टी नात्याला ब-याच अंशी उध्वस्त करतात. या बाबतील एका मर्यादे पर्यंत प्रेमाच्या नावाखाली लाड खपवून घेतले जाऊ शकतात पण त्यानंतर मात्र कठोर पावले उचलावीच लागतात.

छोट्या छोट्या गोष्टींवर रुसून बसणे

या गोष्टी बाबत आपण न जाणो किती लोकांकडून ऐकतो की, त्यांचा दिवसातील अर्धा वेळ हा जोडीदाराची समजूत घालण्यातच जातो. असं तेव्हा दिसून येतं जेव्हा नात्यातील एखादी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवरुन रुसून किंवा नाराज होऊन बसणारी असते. अर्थातच प्रेमात असणारी जोडपी आपल्या जोडीदाराला हसताना पाहण्यासाठी त्याचा राग घालवून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करणारच पण हे जास्त काळ चालू शकत नाही. काही कालावधीनंतर तो व्यक्ती वैतागून रूड होतो किंवा नातं तोडणेच पसंत करतो.

टाइम मॅनेजमेंट

डेटवर कायम उशीरा पोहचणे, जोडीदाराला कायम वाट पाहायला लावणे, जोडीदारासाठी वेळ न काढणे अशा गोष्टी वाईट टाइम मॅनेजमेंटची लक्षणे असतात. बहुतांश जोडपी याकडे दुर्लक्ष करतात पण व्यवस्थित लक्ष देऊन विचार केला तर समजेल की, वेळीचे नियोजन न करता आल्यानेच अनेक समस्यांची सुरुवात होते व वाद जन्म घेऊ लागतात. असे यामुळे होते कारण जोडीदार वैतागल्यामुळे संवाद टाळतो. संवाद टाळल्याने गैरसमज होतात व गैरसमज वाढल्याने नाते कमजोर होते.

पर्सनल स्पेसचा आदर न करणे

जोडीदाराची पर्स किंवा पाकिट तपासणे, तो/ती कुठे जातोय कुठे नाही याचा ट्रॅक ठेवणे, न विचारता त्याच्या वस्तू वापरणे, मित्रमंडळींसोबत वेळ घालवू न देणे, मोबाईल तपासणे, मोकळा वेळ फक्त आपल्यासोबत घालवावा अशी इच्छा व्यक्त करणे या सर्व गोष्टी थेट पर्सनल स्पेसवर परिणाम करतात. एका नात्यात एक मर्यादा ठेवणे किंवा एक बारीक रेखा आखणे अत्यंत गरजेचे असते. हेल्दी नात्यासाठी हे अत्यंत गरजेचे असते. वरील गोष्टी टाळा व आनंदी आयुष्य जगा.