नात्यात घडत असतील या गोष्टी तर समजून घ्या बाहेर पडण्याची वेळ आली आहे

तुम्ही जेव्हा कोणत्याही नात्यात जोडीदारासह असता तेव्हा तुम्हाला या गोष्टीचा आनंद असतो की, तुमचे नाते हे स्थिरता, इमानदारी आणि योग्य दिशेने प्रेमाने जात आहे. तुम्ही तुमच्या नात्याला अत्यंत परफेक्ट मानता. पण तुम्हाला जेव्हा असं वाटतं की या नात्यामध्ये आनंदच नाहीये आणि हे नातं काहीच कामाचं नाही.

  नात्यात अडकणे सोपे आहे मात्र ते निभावणे फारच कठीण आहे. कोणतंही नातं निभावणं इतकं सोपं नाही. नात्यांमध्ये अनेक चढउतार येत असतात. तसंच नात्यामध्ये तुम्हाला अनेक संकटांनाही सामोरं जावं लागतं. पण तुम्ही तुमचं नातं कसं सांभाळता, कसं जपता यावर तुम्ही ते नातं पुढे किती टिकवू शकता हे अवलंबून असते. प्रत्येकाच्या आयुष्यात नात्यातून बाहेर पडावं अशी फेज येत असते. पण तरीही ते नातं टिकविण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. पण आता या नात्याला काहीच अर्थ नाही आणि या नात्यातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे हे नक्की कसं समजायचं? नात्यातून विशेषतः प्रेमाच्या नात्यातून बाहेर पडणं फारच कठीण असतं. मग अशावेळी नक्की कोणते संकेत असतात जेव्हा तुम्ही या नात्यातून बाहेर पडणंच तुमच्यासाठी चांगलं ठरू शकतं ते जाणून घ्या.

  एका चांगल्या नात्याचा सर्वात पहिला नियम म्हणजे नात्यातील पारदर्शकता आणि विश्वास. विश्वास असेल तर तुमचे नाते नेहमीच जोडीदारासह मजबूत राहाते. कितीही संकटं आली तरीही तो विश्वास डगमगत नाही आणि कितीही चढउतार आले तरीही तुम्ही एकमेकांच्या आधाराने त्यावर मात करता. पण जेव्हा नात्यामध्ये समोरचा जोडीदार गोष्टी लपवू लागतो तेव्हा त्या नात्याला तडा बसणं सुरू होतं. हे खरंच तुमच्यासाठी योग्य नाही. कारण कधी ना कधीतरी लपवलेली गोष्ट समोर आल्याने समोरच्या व्यक्तीला धक्का बसतो आणि विश्वासाला तडा जातो. जेव्हा तुम्ही अशा फेजमधून जाता तेव्हा तुम्ही नात्यामध्ये राहणं योग्य नाही हा मोठा संकेत असल्याचे समजून जा.

  हे नातं काहीच कामाचं नाही असं वाटणं

  तुम्ही जेव्हा कोणत्याही नात्यात जोडीदारासह असता तेव्हा तुम्हाला या गोष्टीचा आनंद असतो की, तुमचे नाते हे स्थिरता, इमानदारी आणि योग्य दिशेने प्रेमाने जात आहे. तुम्ही तुमच्या नात्याला अत्यंत परफेक्ट मानता. पण तुम्हाला जेव्हा असं वाटतं की या नात्यामध्ये आनंदच नाहीये आणि हे नातं काहीच कामाचं नाही. यामध्ये कोणतंच समाधान मिळत नाहीये, तेव्हा ते नातं संपवणंच योग्य ठरतं. तुम्ही या नात्यामध्ये जेव्हा सतत रडत राहता आणि तुम्हाला सतत त्रासच होत राहतो अशी वेळ आली असेल तर तुम्ही या नात्यातून बाहेर पडण्याचेच हे संकेत आहेत. तुम्ही चुकीच्या व्यक्तीबरोबर आहात असं जेव्हा तुम्हाला मनातून वाटायला लागतं तेव्हा तुम्ही त्वरीत त्या नात्यातून बाहेर पडा.

  तुमचा जोडीदार जेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत गृहीत धरतो

  तुमचे नाते तेव्हाच खराब होते जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक गोष्टीत दोष द्यायला लागतो अथवा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत गृहीत धरायला लागतो तेव्हा तुम्हाला या नात्यातून बाहेर पडण्याचा सर्वात मोठा संकेत आहे. तुम्ही काय करत आहात किंवा तुमची काळजी असणं, तुमची गरज असते तेव्हा जोडीदाराने गोड बोलणं बाकी वेळी दुर्लक्ष करणे, कोणत्याही गोष्टीचे श्रेय तुम्हाला न देणे अशा गोष्टी जेव्हा नात्यात घडत असतील तेव्हा तुम्ही वेळीच या नात्यातून बाहेर पडा. तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हे नातं योग्य नाही हे मात्र नक्की.

  तुमच्यामध्ये केवळ भांडणं शिल्लक राहिली आहेत

  कोणत्याही नात्यात भांडणं होणं हे साहजिक आहे. त्याने प्रेम वाढतं असं म्हणतात. पण कोणत्याही गोष्टीसाठी जेव्हा तुम्ही लहानसहान गोष्टीवरून कोणाहीसमोर भांडण करता तेव्हा ते नातं योग्य नाही. तुम्ही आणि तुमचा जोडीदार आता एकत्र राहू शकत नाही असं तुम्हाला वाटू लागणं हे तुमच्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी एक संकेत असणं आहे. या भांडणांमुळे तुम्हाला जर सतत मानसिक त्रास होत असेल तर तुम्ही या नात्याचा पुनर्विचार करावा. कारण यामुळे मनात केवळ आणि केवळ कडवटपणा येऊ शकतो.

  जोडीदारावर शंका घेणे

  जोडीदारावर शंका घेणे हे नात्यातील अत्यंत वाईट बाब ठरते. तुमचा जर एकमेकांवर विश्वासच नसेल आणि तुम्ही एकमेकांवर शंका घेत असाल तर तुम्ही या नात्यात राहणे योग्य नाही. आपला जोडीदार विश्वासू नाही असं वाटणं ही नात्यातून बाहेर पडण्याचीच वेळ आहे. कारण यामुळे नात्यावर आणि मनावर विपरित परिणाम घडू शकतो.

  तुम्हाला तुमचे नाते टॉक्झिक वाटणे

  तुमच्या नात्यामध्ये जेव्हा अशी वेळ येते की तुम्हाला हे नाते अतित्रासदायक अथवा टॉक्झिक (Toxic Relationship) वाटू लागते, तुमच्या नात्यात कोणतीही सकारात्मकता तुम्हाला दिसत नाही अथवा तुम्हाला मानसिक त्रास अधिक वाटू लागतो तेव्हा नात्यातून बाहेर पडण्याचा हा संकेत आहे समजावे. तुम्ही एका चांगल्या आणि समाधानी नात्याच्या शोधात असाल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी योग्य नाही. अशा स्थितीत तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. एकदा शांतपणे विचार करून मगच निर्णय घ्या आणि नातं तोडण्यापूर्वी आपल्या जोडीदाराशी एकदा बोलण्याचा प्रयत्न करा. पण अगदीच कठीण आहे असं वाटलं तर मात्र या नात्यातून बाहेर येणंच योग्य आहे.

  तुम्हीही अशा परिस्थितीत अडकला असाल तर योग्य विचारपूर्वक निर्णय घ्या आणि नात्यातून वेळीच बाहेर पडा.