ganga snan

महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2022) दिवशी मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत १ लाख ८० हजार भाविकांनी प्रयागराजमध्ये गंगा स्नान (Ganga Snan) केल्याची माहिती मिळाली आहे.

    प्रयागराज : माघ मेळ्यामधील अंतिम स्नान पर्व असलेल्या महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2022) दिवशी मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत १ लाख ८० हजार भाविकांनी प्रयागराजमध्ये गंगा स्नान (Ganga Snan) केल्याची माहिती मिळाली आहे. दारागंजमधील नागवासुकी मंदिर आणि यमुना किनारी स्थित मनकामेश्वर मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी दिसून येत आहे. शिवभक्त जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करताना दिसत आहेत.

    माघ मेळ्याच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीसाठी प्रशासनाकडून ६ घाटांवर स्नानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांनी सांगितलं की, याशिवाय या भागात ६५० शौचालयांची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. जिथे शौचालये नाहीत तिथे मोबाईल शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

    अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मेळा असलेल्या भागामध्ये ३ प्राथमिक चिकित्सा केंद्रे आणि एक हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे. त्यांनी सांगितलं की, महाशिवरात्रीच्या स्नान सोहळ्यामध्ये शिवदर्शनाला महत्त्व असल्याने सोमेश्वर महादेव, मनकामेश्वर मंदिर आणि नाग वासुकी मंदिराच्या आसपास आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. तसेच पार्किंगचीही सोय करण्यात आली आहे.