प्रवासात काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होत असेल, खुशखुशीत आणि खमंग ‘पालकाचे शंकरपाळे’ बनवून घेऊन जा!

गोडाचे शंकरपाळे आपल्या सगळ्यांनाच परिचीत आहेत. गोडे/खारे शंकरपाळे तर आपण नेहमीच घरी करतो, परंतू यंदा मात्र बदल म्हणून ‘पालकाचे खारे शंकरपाळे ‘बनवून पहा.

  नुकताच दिवाळसण आटोपला आहे. त्यासोबत घरी बनवलेला फराळही संपला असेल. मात्र, कधीतरी आपल्याला चिवडा, चकली, शंकरपाळे खाण्याची इच्छा होते. तर प्रवासात जातानाही काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होते. तेव्हा गोडे/खारे शंकरपाळे तर आपण नेहमीच घरी करतो, परंतू यंदा मात्र बदल म्हणून ‘पालकाचे खारे शंकरपाळे ‘बनवून पहा. तांबूस,पोपटी रंगाचे व खमंग खुसखूषीत असे शंकरपाळे छानच लागतात. प्रवासात तुम्ही हे स्नॅक्स सहज कॅरी करू शकता. तसेच तुमच्या प्रवासाचा आनंदही यामुळे द्वीगुणीत होईल. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांनाही हा नवीन पदार्थ नक्की आवडेल.

  साहीत्य :-

  मैदा २ वाट्या

  रवा १/४ वाटी

  पालक प्यूरी १/२ वाटी ( कमी-अधिक होऊ शकते)

  मोहन २ टीस्पून

  मीठ चविनूसार

  हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून

  ओवा १/४ टीस्पून

  धना-जीरा पावडर १ टीस्पून

  हींग चिमूटभर, तिळ ऐच्छिक

  तळणीसाठी तेल

  कृती :-

  प्रथम मैदा चाळून एका पसरट भांड्यात घ्या. त्यामधे रवा व वरील इतर सर्व कोरडे साहीत्य घालून नीट मिक्स करा. आता मोहन घाला. परत मिश्रण हाताने नीट सगळीकडे चोळून घ्या. आता शेवटी पालक प्यूरी अंदाज घेऊन बघत बघत मिश्रणात घालावी. पुरीच्या किवा नेहमी शंकरपाळ्या करतो, त्या कणकेप्रमाणे घट्ट कणिक मळावी. पंधरा मिनिट झाकून ठेवा. पंधरा मिनिटानंतर तयार कणकेची पोळी लाटावी. फार जाड अथवा पातळ नको. सुरीने अथवा पिझ्झा कटरने चौकोनी तुकडे कापून गरम तेलात खरपूस तळा. खुसखूषीत कलरफूल खारे शंकरपाळे तयार ! थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. केव्हाही नुसते किवा चहासोबत खा.