उन्हाळा झाला सुरु ! शरीरात उष्णता निर्माण करणारे ‘हे’ पदार्थ करा सेवनातून कमी

उन्हाळ्यामध्ये काही भाज्यांचे सेवन टाळावे किंवा कमी करावे. आज आपण अशा काही भाज्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्या उन्हाळ्यामध्ये खाणे टाळावे.

    यंदा लवकरच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अगदी मार्च महिन्यामध्ये उन्हाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. कडक उन्हामुळे शरीराची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी अनेकांनी आपल्या दैनंदिनीमध्ये बदल देखील केला असेल. पण त्यांचबरोबर आहारामध्ये देखील बदल करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये शरीराला गारवा देणारे आणि पाण्याचे प्रमाण अधिक असणारे जिन्नस घेत असतो. त्याचप्रमाणे अशा देखील काही भाज्या आहेत ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये काही भाज्यांचे सेवन टाळावे किंवा कमी करावे. आज आपण अशा काही भाज्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्या उन्हाळ्यामध्ये खाणे टाळावे.

    उन्हाळ्यामध्ये आपण शीतपेय, थंडगार पेय आणि फळे याचे जास्त सेवन करतो. त्याचबरोबर असे देखील काही पदार्थ आहेत जे शरीरामध्ये उष्णता वाढवू शकतात. ते पदार्थ उन्हाळ्यासाठी जेवणातून कमी करणे गरजेचे आहे. यामध्ये एक आहे ते म्हणजे पालेभाजी असणारी पालक. पालकमध्ये जस्त, सेलेनियम आणि लोहसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेली भाजी उन्हाळयात जास्त प्रमाणात खाणे टाळावे. यामुळे शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे शरीरासाठी गुणयुक्त असलेली पालक उन्हाळ्यामध्ये खाणे कमी करावे.

    तसेच उन्हाळ्यामध्ये अंडी खाणे देखील कमी केले पाहिजे. कारण, अंड्यांमध्ये (egg) प्रथिने अधिक असतात. याचे सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. उन्हाळ्यात याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळ्यात अंड्यांचे सेवन कमी करावे. त्याचबरोबर आले देखील उन्हाळ्यामध्ये खाणे टाळावे. आल्याचा स्वाद जेवणामध्ये रंजकता आणतो. चहामधील आले देखील त्याची चव वाढवते. मात्र आल्यामध्ये उष्णता अधिक प्रमाणात असते. उन्हाळ्यात याच्या सेवनाने पोटात उष्णता वाढते. त्यामुळे आल्याचे संतुलित प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे.

    त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये जिन्नस खाऊ नये यामध्ये शेंगदाण्याचा देखील समावेश आहे. शेंगदाणे शरीरातील चयापचय गतिमान करतात. ज्यामुळे रक्त परिसंचरण वाढते. उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढते. तसेच पित्ताचा त्रासही होतो. त्यामुळे उन्हाळ्याचा मौसमामध्ये शेंगदाणे खाणे कमी करणे गरजेचे आहे. तसेच सुकामेवामध्ये सर्वांचा आवडता बदाम देखील उन्हाळ्यामध्ये कमी खावा. बदाम किंवा इतर ड्रायफ्रूट्स शरीरासाठी उष्ण असतात. उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने अपचनाचा त्रास वाढतो. यासाठी प्रमाणात खावे.