घामामुळे केसांचा दुर्गंध येतो?; मग वापरा हेअर परफ्यूम

अनेक कंपन्याही केसांचे सौंदर्य वाढविणारी विविध उत्पादने बाजारात आणतात. यामध्ये गेल्या काही वर्षांत ‘हेअर परफ्यूम’चा समावेश झाला आहे.

  केस म्हणजे स्त्रियांच्या सौंदर्यातील महत्त्वाचा भाग. आपल्या केसांचे सौंदर्य अधिकाधिक खुलून येण्यासाठी सतत स्त्रिया काहीना काही करत असतात. कोणी केस कलर करतात तर कोणी सरळ, तर काही कुरळे केस करवून घेतात. अनेक कंपन्याही केसांचे सौंदर्य वाढविणारी विविध उत्पादने बाजारात आणतात. यामध्ये गेल्या काही वर्षांत ‘हेअर परफ्यूम’ (Hair Perfume)चा समावेश झाला आहे.

  – दररोज कामाला जाणाऱ्या महिलांनी डोके धुतले असेल तरीही कामामुळे, प्रवासामुळे त्यांच्या केसांना दुर्गंधी येते. या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी या परफ्यूमचा केसांवर वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे केसांवर खूपवेळ सुगंध राहतो.

  – याशिवाय केस कोरडे न राहता त्यातील मऊपणा टिकून राहतो.

  – या परफ्यूममधून आपल्याला केरॉटिन हे प्रोटीन मिळते. तसेच हे परफ्यूम केसांसाठी कंडिशनरचे काम करतात. हे परफ्यूम लावताना मुळांना लावू नये. फक्त वरचेवर याचा वापर करावा.

  – बाजारात लवेंडर, रोझ या सुगंधांमध्ये हे हेअर परफ्यूम उपलब्ध आहेत. तसेच ऑइलबेस परफ्यूमही मिळतात. त्यामध्ये जास्त सुगंध उपलब्ध आहेत.

  – स्त्रियांनी केस न धुता या परफ्यूमचा वापर केल्यास केसांमध्ये कोंडा होण्याची शक्यता असते.

  – याच्या अतिवापराने केस कोरडे होऊ शकतात. ज्यांचे केस पातळ असतील आणि स्त्रिया अधिक प्रमाणात हे परफ्यूम वापरत असतील तर त्यांना लगेचच केसांच्या समस्या उद्भवू शकतात. कारण हा परफ्यूम पातळ केसांच्या मुळांपर्यंत लगेच पोहचू शकतो.

  – यामुळे मुळांची पकड सैल होऊन केस गळू शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक आणि नामांकित कंपनीचे परफ्यूम वापरावे.