
थंडीत फुटलेल्या ओठांना पेट्रॉलियम जेली लावली जाते. त्यापेक्षा व्हिटॅमिन ‘ई’ने युक्त असलेल्या ‘लिप केअर’ उत्पादनांचा वापर करावा. तसेच आपण वापरत असलेले उत्पादन ब्रँडेड असेल याचा विचार करावा.
दिवाळी संपून आता नाताळचे वेध लागले आहेत. राज्यभरात काहीप्रमाणात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. उकाडा कमी झाल्याने ही थंडी काहीशी आल्हाददायक वाटत असली तरी त्याचा त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे आहे (Winter Care). यामध्ये शरीराचे तापमान योग्य राहावे यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, थंडीत कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी काय उपाय करावेत, केसांच्या कोरडेपणासाठी काय करता येईल यांसारखे प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात. कोणताही ऋतू त्रासदायक न ठरता तो जास्तीत जास्त आनंददायी व्हावा.
त्वचा
साबण त्वचेच्या कोरडेपणासाठी कारणीभूत असतो. त्यामुळे थंडीत अंगाला साबण लावणे टाळावे. याऐवजी उटणे किंवा हळद, दूध आणि डाळीचे पीठ लावावे. मॉईश्चरायझरमुळे त्वचा तात्पुरती मऊ होते नंतर ती जास्त कोरडी होते. त्यामुळे हातांवर किंवा चेहऱ्यावर केमिकल असलेली उत्पादने वापरण्यापेक्षा नैसर्गिक उत्पादनांचा वापर केला पाहिजे. बटर, लोणी, तेल, कोरफड आणि ऑलिव्ह ऑईल ही उत्पादने उपयुक्त ठरतात.
ओठ
थंडीत फुटलेल्या ओठांना पेट्रॉलियम जेली लावली जाते. त्यापेक्षा व्हिटॅमिन ‘ई’ने युक्त असलेल्या ‘लिप केअर’ उत्पादनांचा वापर करावा. तसेच आपण वापरत असलेले उत्पादन ब्रँडेड असेल याचा विचार करावा. कोरड्या ओठांना तूप, लोणी लावणे हेही नैसर्गिक आणि उत्तम पर्याय ठरू शकतात.
टाचा
ज्यांना टाचांना भेगा आहेत, त्यांना थंडीच्या दिवसात जास्त त्रास होतो. या भेगा कालांतराने इतक्या वाढतात की त्यातून काही गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तळव्यांना कायम स्क्रब करा, त्यानंतर त्याला मॉईश्चरायझर लावा. कोमट पाण्याने पाय दोन ते तीन वेळा धुवा. त्यामुळे हा भाग कोरडा न पडता मऊ राहण्यास मदत होईल.
आहार
थंडीचा सामना करताना शरीरातील उष्णता टिकवून ठेवणे गरजेचे असते. यामध्ये आहाराची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे थंडीत गरम पदार्थांचा आहारात समावेश ठेवावा. यामध्ये अक्रोड, बदाम, पालक यांचा समावेश होतो. याशिवाय शरीराला पोषण देणारे पदार्थ या दिवसांत आहारात घ्यावेत. मशरूम, तृणधान्य, ओट्स, जवस, मोड आलेल्या कडधान्याचाही समावेश करावा. शतावरी, कांद्याची पात, लसूण, रताळे, कोबी, सफरचंद आणि हिरव्या पालेभाज्या आवर्जून खाव्यात.
केस
थंड, शुष्क हवामानामुळे केस चटकन तुटू शकतात तसेच ते खूप गुंततात. गरम केलेले खोबरेल तेल कंडिशनरचे काम करते आणि ते टाळूला तसेच केसांना आवश्यक पोषण देऊन आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. तसेच गरम तेलामुळे टाळूच्या त्वचेचे पापुद्रे निघत नाहीत आणि केसात होणारा कोंडा रोखण्यास याची मदत होते. अंडी आणि कोमट खोबरेल तेलाचं मिश्रण केसांना लावल्यामुळे केसांना उत्तम कंडिशनिंग मिळते, जे थंडीत अत्यंत आवश्यक असते.