कानाला संसर्ग होऊ नये म्हणून ‘ही’ खबरदारी घ्या

    पावसाळ्यात जंतू आणि विषाणूजन्य रोग डोके वर काढतात. त्यामुळे, या मोसमात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: कान, नाक, घशा संबंधी आजार या काळात आढळतात. सर्दी, खोकला, त्वचा रोग यासह कानात संसर्ग झाल्याचे अनेक प्रकार पुढे येतात. कानाच्या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास कानाला मोठी इजा देखील होण्याची शक्यता असते.

    पावसाळ्यात कानात बुरशीजन्य संसर्ग होण्याची समस्या सामान्य आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने किंवा योग्य उपचार न मिळाल्याने कानाच्या पडद्यावर कायमस्वरुपी परिणाम होण्यासह इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. आपल्या कानात असलेल्या ग्रंथींमध्ये सेरुमेन तयार होते आणि त्याचे स्वरूप वेगवेगळ्या व्यक्तींच्या कानात भिन्न असू शकते.

    काही लोकांच्या कानात ते पातळ अवस्थेत राहते. काहींच्या कानात ते किंचित कडक तर काहींच्या कानात ते जास्त कोरडे आणि कडक असते. सेरुमेन कानांसाठी नैसर्गिक संरक्षण म्हणून काम करते आणि बाहेरील धूळ आणि बॅक्टेरिया कानाच्या आतील भागात जाण्यापासून प्रतिबंधित करते. परंतु, पावसाळ्यात जेव्हा वातावरणातील आर्द्रता वाढते तेव्हा ते अनेकवेळा ओलावा शोषून घेते आणि फुगते. त्यामुळे कानाच्या नळीत अडथळा निर्माण होतो. यामुळे अनेक वेळा कान बंद होणे आणि दुखणे किंवा खाज येणे किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यताही वाढते.

    ईयर बडही सुरक्षित नाही अनेक वेळा लोक केसांचा चिमटा, माचिस आणि इतर गोष्टींनी कानातले मळ साफ करतात. केसांच्या चिमट्यांच्या वापरामुळे कानाच्या आतील त्वचेला, अगदी कानाच्या पडद्यालाही इजा होऊ शकते. इअर बड हा देखील कान स्वच्छ करण्याचा सुरक्षित मार्ग नाही. कारण याचा वापर केल्याने बहुतेकदा कानातले मळ बाहेर येण्याऐवजी कानात जाते. आपल्या शरीराची रचना अशा प्रकारची आहे ज्यात शरीरातील जवळजवळ सर्व अंतर्गत अवयवांची स्वच्छता ही आपोआप होते. तसेच कानात जास्त मळ असल्यास तो आपोआप कानातून बाहेर पडतो.

    परंतु काही कारणास्तव हे शक्य नसेल तर कानाला इजा होईल अशा वस्तूंचा अजिबात वापर करू नये. स्वत: औषधोपचार करण्याऐवजी डॉक्टरांना दाखवावे कानात दुखणे, कान बंद झाल्याचे वाटणे किंवा सतत शिट्टी वाजणे, कानात टोचल्या सारखे वाटणे किंवा सूज येणे, जळजळ होणे, वेदना होणे आणि कानात पू होणे यासह कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास स्वत: औषधोपचार करण्याऐवजी ईएनटी तज्ञाशी संपर्क साधणे खूप महत्वाचे आहे.