११ प्रकारचे असतात रेल्वेचे हॉर्न; प्रत्येक हॉर्नला असतो विशेष अर्थ

चालकाने जर दोन वेळा दीर्घ आणि दोन वेळा लहान हॉर्न वाजविले, तर गार्डने त्वरित इंजिनमध्ये येण्यासाठीचा हा संकेत असतो. चालकाने सतत दीर्घ हॉर्न अनेकवेळा वाजविल्यास ट्रेन...

  ट्रेनच्या इंजिनाचा हॉर्न आपल्या सर्वांच्याच चांगला परिचयाचा आहे. पण हा हॉर्न अकरा निरनिराळ्या प्रकारे वाजविला जात असतो हे मात्र फार कमी लोकांना ठाऊक असेल. या प्रत्येक प्रकाराचा अर्थ निरनिराळा असून, रेल्वे इंजिनाचा चालक आणि ट्रेनच्या सर्वात शेवटच्या गार्ड बोगीमध्ये असलेल्या गार्डसह इतर रेल्वे कर्मचारी यांच्यामधली ही एक प्रकारची सांकेतिक भाषा म्हणता येऊ शकेल. अकरा निरनिराळ्या प्रकारे वाजविल्या जाणाऱ्या हॉर्नचा अर्थ नेमका आहे तरी काय, हे जाणून घेऊया.

  जर इंजिन चालकाने एकदाच अगदी काहीच सेकंद हॉर्न वाजविला, तर त्याचा अर्थ ट्रेन यार्डामध्ये जाण्यासाठी तयार आहे असा असतो.

  तर काहीच सेकंदांसाठी पण दोनदा हॉर्न वाजविला गेला, तर चालक गार्डकडून ट्रेनचा प्रवास सुरु करण्यासाठी परवानगी मागत असल्याचा हा संकेत आहे. ट्रेन चालत असताना चालकाने तीन वेळा हॉर्न वाजविल्यास इंजिनावरील चालकाचा ताबा सुटल्याचा हा धोक्याचा इशारा आहे. ट्रेनमध्ये असलेल्या गार्डने अशा वेळी त्याच्या बोगीमध्ये असलेल्या व्हॅक्यूम ब्रेक्सचा वापर करण्याविषयीची ही सूचना असते.

  ट्रेन चालत असताना इंजिनमध्ये अचानक बिघाड होऊन ट्रेन थांबल्यास, किंवा कोणत्या दुर्घटनेमुळे ट्रेन पुढे जाऊ शकत नसल्यास याची सूचना चालक चार वेळा हॉर्न वाजवून देत असतो. जर चालकाने एक दीर्घ हॉर्न आणि एक छोटा हॉर्न वाजविला, तर गार्डने ट्रेन चालू लागण्याच्या आधी ब्रेक पाईप सिस्टम तपासून पाहण्याविषयीची ही सूचना असते.

  या शिवाय चालकाने जर दोन वेळा दीर्घ आणि दोन वेळा लहान हॉर्न वाजविले, तर गार्डने त्वरित इंजिनमध्ये येण्यासाठीचा हा संकेत असतो. चालकाने सतत दीर्घ हॉर्न अनेकवेळा वाजविल्यास ट्रेन पुढल्या स्टेशनवर न थांबता पुढे निघून जाणार असल्याचा हा संकेत असतो, तर चालकाने काही सेकंदांच्या अंतराने पुन्हा पुन्हा दीर्घ हॉर्न वाजविल्यास हा संकेत पुढे एखादे रेल्वे क्रॉसिंग आहे असे सूचित करणारा असतो. या रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांसाठीही ही सावधगिरी बाळगण्याविषयी सूचना असते.

  चालकाने एक दीर्घ आणि एक छोटा हॉर्न वाजविला तर ट्रेनचे रूळ पुढे विभाजित होत असल्याचा हा संकेत असतो, तर चालकाने दोन छोटे आणि एक दीर्घ हॉर्न वाजविल्यास प्रवाश्यांपैकी कोणी तरी आपात्कालीन साखळी ओढली असल्याचा, किंवा गार्डने व्हॅक्यूम ब्रेक्स लावल्याचा हा संकेत असतो. चालकाला ट्रेनच्या मार्गामध्ये मोठा धोका समोर दिसत असल्यास सतत सहा वेळा हॉर्न वाजवून चालक याची सूचना देत असतो.